RSS

भक्षक…!

15 डिसेंबर

“ए रम्या, कशापायी भाव खातुस? सांग की काय झालं हुतं त्ये? ”

गोपाळनं रम्याच्या पाठीत एक दणका घातला. तसा सगळ्यांनीच गलका केला. संज्या, नान्या, पाठकाचा औध्या, म्हटलच तर कुलकर्ण्याचा जन्या…. सगळेच रम्याच्या मागे लागले.

“सांग ना बे, कशाला भाव खातो फुकटचा?”

“आरं… आरं… वाईच, चा तरी पिऊ देशीला का न्हायी?”

रम्यानं चहाचा कप संपवला. मिशीला लागलेले चहाचे कण उलट्या मुठीने निपटून काढले. औध्याकडनं तंबाखु मागुन घेतली. चुना लावून व्यवस्थीत चोळली. कचरा काढून टाकत भुकटी ओठांच्या कोपर्‍यात सरकवली. हात झटकले आणि सावरुन बसला…

तर मंडळी, ऐका कहानी गायब झालेल्या पोरांची …..! पर दोस्तानु येक गोष्ट पैलेझुटच सांगुन टाकतोय, म्या काय समद्याच गोष्टी डोळ्यानी बिगिटलेल्या न्हायीत. तर काही बिगिटलेल्या, काही पाटलांकुन कळ्ळेल्या, पोलिसांकुन ऐकलेल्या आन काही तर म्या दोन आन दोन चार आसा साधा सरळ हिसाब लावलेल्या. तवा सांगण्यात काय गोंदुळ झालाच तर समजून घेवा…काय?……..
********************************************************************************
हंबीरराव कोळपेकर-पाटील उर्फ आबा पाटील रोजच्यावाणीच वसरीवरच्या शिसवी झोपाळ्यावर बसलेलं व्हतं. तोंडात तमाखुचा बार भरलेला. झोपाळ्यावर शेजारीच पानाचा पितळी डबा ठिवलेला. त्यातलीच दोन पिवळीजर्द पानं चुना लावुन उजव्या मांडीवर ठिवलेली. बसल्या बसल्याच पायाने हलकंच झोपाळ्याला झोका देत हातातल्या अडकित्त्याने सुपारी कातरण्याचं काम अगदी निगुतीनं चाललेलं. समुरच्या वसरीवर हातरलेल्या हातरीवर गावातली रिकामटेकडी मंडळी (पाटलीण बाईंच्या भाषेत टोळभैरव) आशाळभुत नजरेने पाटलांच्या शेजारी ठेवलेल्या पानाच्या डब्यावर नजर लावुन बसलेली व्हती. कधी एकदा पाटलांचं पान लावुन व्हतया आन डबा खाली आपल्याकडं येतुया याची वाट बघत. आता त्येस्नी भायीर पान मिळत न्हाय अशातल्या भाग न्हाय, पन भायीर कुटंबी टपरीवर पान खायाचं म्हनलं की पैका टाकनं आलं, आन हितं फुकाटचं मिळत असताना पैका कामुन खरचायचा बा?

तसं बगाया गेलं तर पाटलास्नी म्हायत व्हतंच की ही टाळकी रोज सकाळच्याला कशापायी जमत्यात वाड्यावर त्ये. फुकाटची पान-तमाखु आन पाटलाची मर्जी झालीच तर फुकाटचा चा बी मिळतुया रोजच्या रोज. पन आजच्या काळात जितं वतनदारी पार खतम झालीया अश्या येळी लै खर्च न करता गावात आपली पत टिकवुन ठिवायची आसल तर असली भुतं पदरी बाळगावी लागत्यात हे पाटलांना ठावं हायेच की! गावात काडी दिकुन हालली की त्याची बातमी पाटलांपत्तुर बिनबोभाट पोचती ती कुणामुळं वं? पाटीलकी सपली, पन गेली आठ वरसं गावात दुसरा सरपंच झालंला नाय… कशामुळं?

“आवं…., जरा आत यिताय काय?” माजघराकडनं आवाज आला आन आबांनी सुपारी कातरता कातरताच मान वळवुन आवाजाच्या दिसंला बगिटलं. कपाळावरच्या आठ्या अजुनच गडद झाल्या….! तसा पाटलीण बाईनी आबांचा नुर वळकला. त्या गपचिप म्हागं वळल्या….

“आता आलाच हायसा तर वाईच चा टाकायला सांगा रकमाबाईस्नी….., समद्यास्नी कप-कप!बरुबर शंकरपाळीबी द्या मनावं उलशिक !”

पाटलांनी कातरलेली सुपारी तोंडात टाकली. मांडीवरचं पान उचलुन दाताखाली घितलं. काताचा तुकडा तोंडात टाकत, जिभंनीच व्हटाच्या कोपर्‍यातली तमाखु पानाच्या लगद्यात वडुन घिटली आन फुडं बसलेल्या मंडळीकडं पानाचा डब्बा सरकावला….!

“घ्या, पान तमाकु घ्या !”

तसा समुरच बसल्याला शिंप्याचा शिवा माजघराच्या तोडाकडं आधाशासारका बगत म्हनला..

“आबा, आता चा न शंकरपाळं खाऊनच पान खाऊ की! कस्सं?….”

हा कस्सं? बाकीच्यांसाटनं व्हता.

“व्हय्,व्हय. चा व्हवु द्याच आता. उगाच रकमातैंची म्हेनत वाया जाया नगो ना!” मागची टाळकी एकासुरात बोलली.तसं आबानी मुंडी हालवली…

“का रं शिरपा… काय म्हनती आमची कोळपेवाडी?”

“आता तुमी आमचं राजं पाटील. तुमच्या राज्यात समदं झ्याकच हाय तसं, फकस्त गेल्या म्हैन्यात त्यो इभुत्याच्या संज्या रानाकडं म्हुन गेला त्यो गेलाच, परत दिसलाच न्हाय. तेवडी गोस्ट सोडली तर …………

“आबा… आबा…. माझा रंग्या……

नायकाचा इजुआबा पळतच वाड्यात शिरला. त्येच्या मागं त्याची बायकुबी व्हती. रडुन रडुन दोगांचंबी डोळं सुजल्यालं व्हतं.

“आबा, माजा रंग्या हारवलाय. कालच्याला रानाव गेल्याला परत आलाच नाय बगा. सांजच्याला आला नाय त मला वाटलं रायला आसल वस्तीला रानावर संभाबरुबर. तसं लेकरु लै येळा राहतं बगा रानावर रातच्याला. पन आज सकाली संभा येकटाच परत आला. त्यो सांगतुया की रंग्या रातच्यालाच गावाकडं परत आलाय म्हुन. आबा, आवं, दिड मैलाचं अंतर न्हाय गावापासुन शेताचं माज्या. आवं चौदा वरसाचं पोर गायब झालं. त्याचं आयनं तर रडुन रडुन गोंधूळ घाटलाय….!”

एवढं ऐकलं आणि त्याच्या बायकोनी परत रडायला सुरुवात केली. पाटलीणबाई लगुलग भायीर आल्या, आबाबी लककन झोपाळ्यावरुन उटलं आणि इजुआबाकडं सरकलं…

“आरं सापळल पोर! हितंच आसल कुटं तरी. रातच्याला भ्या वाटती येकट्यानं याची, म्हुन झोपलं आसल कुनाच्या तरी कोठ्यावर. उठुन यिल गप थोड्या येळानं. कारं इजु, तु रागं भरला न्हवता ना कालच्याला रंग्याला?” पाटलीणबाई कळवळुन बोलल्या.

“न्हाय वो वयनीसायेब, तसं काय बी झालं न्हवतं पगा! आन रंग्या घाबरणारा न्हाय वो. आर्ध्या रातीला येकटा येतु न्हवं रानातनं. आबा…., आवं गेल्या म्हैन्यात हरवल्याला इभुतेआण्णाचा संज्या अजुन सापडला न्हाय, आन आज त्येच्याच बरुबरीचा माजा रंग्याबी…..

बाईनं पुन्यांचान गळा काडला….. तसं पाटलाच्या कपाळावरच्या आठ्या अजुन दाट झाल्या.

काय चाललंया गावात? येका म्हैन्याच्या आंतरानं दोन पोरं गायब.

“आमी येतो पाटील? ” समुर बसल्याली टाळकी परसंग बगुन पळायच्या तयारीत आली.

“आता कुटशिक जाताय रं फुकट्यानु? रोजच्याला हितं बसुन फुकटचा चा नं शंकरपाळी खायाला लै चव वाटतीया न्हवं? आता गावावर संकाट आलय तर थोबाड लपवुन पळताय व्हय. कुटं नाय जायचं. आता समद्यांनी मिळुन येक काम करा. गावातल्या परत्येक घराकडं, शेतावरल्या वस्त्यांमधुन निरुप द्येयाचा. कुणाला तरी पाटवुन आजुबाजुच्या चार गावातुन सांगा ग्रामसेवकांना यायला. सांजच्याला समद्याला चावडीवर बलिवलय म्हनाव आबा पाटलांनी. या संकटाचा सामना कसा करायचा त्ये ठरवायलाच होवं. मी इजुआबाला घेवुन तालुक्याच्या गावाला जातुया, पोलीसात तक्रार नोंदवाया होवी. सांजच्याला मला समदे चावडीवर पायजेत. चला फुटा आता. इजु चल आपण जावुन येवु तालुक्याला. आवं, त्या रम्याला जिपडं काडायला सांगा. आन या इजुच्या बायकुला आत घिवुन जा. इजु , तु बस जरा, म्या कापडं घालुन आलु.”

“च्यायचं इज्याबी, आत्ताच यायचं व्हतं याला? चांगला चा आन शंकरपाळं मिळत व्हते फुकाटचे.”

आत शिरता शिरता आबांनी शिरप्याच्या तोंडचं कुजबुजणं ओझरतं ऐकलं आन येक सणसणीत शिवी हासडली. आन आतल्या खोलीत शिरलं.आबा लै गंभीर झाले व्हते. कालच शेजारच्या रातांब्याहुन निरुप आला व्हता….. रातांब्याच्या निकाळजेआण्णांचा १३-१४ वर्षाचा पोरगा राजा बी धा पंदरा दिवसापास्नं गायब व्हता.
आन म्या वाड्याभायीर पडलो, गाडी काडायला…..

******************************************************************************
दोन म्हैन्यामागची गोष्ट …….
………………
…………………………
आज आठवड्यातला डाक्टरचा वार. म्हंजी आज न्हेमीपरमानंच फिरता दावखाना गावात येनार. दावखाना कसला तर एक मारुती गाडी. आजुबाजुच्या चार पाच गावात दावखाना नसल्यानं गावात येणारा फिरता दावखाना चावडीवरच थांबायचा!

डाक्टर फर्नांडो म्हंजी आक्षी देवमाणुस. परदेसात शि़क्षाण घिवुन आलेलं डाक्टर फर्नांडो म्हंजी आजुबाजुच्या दहा गावातल्या लोकांसाठी जनुकाय देवच व्हते की! तालुक्याच्या गावी त्यांचा लई मोटा दावखाना होता. खोर्‍याने पैसा खेचणारा माणुस. एकदा कसल्यातरी कामासाठी म्हणुन डाक्टरसायब रातांब्याला आलं व्हतं. तवा त्येंच्या धेनात आलं की आजुबाजुच्या दहा गावांत म्हणावा तसा दावखाना नाही. नाही म्हणायला सरकारनं शिष्टर नेमल्या व्हत्या परत्येक गावात. पण त्या गावात कमीच असायच्या. असल्या तरी त्येंच्याकडे असलेला औषिदाचा साठा लैच कमी असायचा. लोकांस्नी अगदी सर्दी खोकल्यावरच्या उपायासाठी तालुका गाठायची पाळी यायची. ती हालत बघुन डाक्टरसायेबांसारख्या देवमाणसाचं काळिज खालवर झालं नसतं तरच नवल…..

तवापासनं बगा औषिदांनी भरलेल्या अशा दोन मारुती गाड्या आमच्या या भागात फिराया लागल्या. डाक्टर सोता हप्त्यातला येक दिस या गाडीबरुबर असायचं. बाकिच्या टायमाला त्याचं दुसरं डाक्टरलोक, शिष्टरबाया गाडीवर असायच्या. या गाडीवर एखादं बारकंसं आपरेशनपण करायची सोय व्हती बरं ! आन पुना पैशाची झिगझिग नाय. आसंल तर द्या नसल तर नंतर द्या, आणि नाहीच दिलं तरी कुणालाबी नाय म्हनायची न्हायीत ही मंडळी. दरबी येकदम परवडनारं बगा. त्यामुळं लोक डाक्टरसायेबांना लै मानायचे. डाक्टरसायेबांचं कुठच्याबी गावात येकाद्या घरच्या माणसांसारखं स्वागत असायचं.

आज डाक्टरसाहेबांची स्वारी शिरगावात होती. न्हेमीपरमानंच हासुन खेळुन, अगदी आपलेपणानं इचारपुस करत पेशंट बघणं चालु व्हतं.

“हं…सुमाकाकु, कशी आहे तुझी लेक आता? परत नाही ना आला ताप? आता पाण्यात खेळु नको म्हणाव तिला काही दिवस.” कुणाच्यातरी हाताला पट्टी बांधता बांधता समूर आलेल्या बाईकडं बघत डाक्टर सायेबांनी हासत हासत ईच्चारलं.

“आता बरी हाये माजी सवी, डाक्टरसायेब तुमी देवासारकं धावुन आलासा पगा. तुमी व्हता म्हुन वाचली वो माजी पोर. पर डाक्टरसायेब तुमची फी द्याला पैका न्हाय वो माज्याकडं. म्हुन यो शेरभर जुंधळा घिवुन आली व्हती. त्येवडा ठिवुन घ्या. नगं म्हनु नगासा. आमच्या गरिबाकडे दुसरं काय बी न्हाय द्यायला.”

सुमाकाकुच्या डोळ्यात पाणी उभं राहीलं होतं.

खरं तं ती शेरभर ज्वारी घ्याचं डाक्टरसायेबांच्या लै जिवावं आलं व्हतं. पर त्या भाबड्या जिवाचं मन मोडायचं नाही म्हनून त्यांनी ती शेरभर ज्वारी ठिवुनशान घेतली बगा. हळुहळु त्यांचं सगळं पेशंट संपत आलं. शेवटची एक नजर टाकली त्यांनी तर एका कोपर्‍यात अंग चोरुन हुबं आसल्यालं येक जोडपं त्यांना दिसलं. आसं बगा, चाळीशीला आलेला बाप्या आणि त्यांची बत्तीस- तेत्तीस वयाची बाईल. दोघांची तोंडं उदास, काळवंडलेली, कुठ्ल्यातरी काळजीनं सुकल्याली.तशी त्यांनी त्या दोगास्नी जवळ येण्याची खुण केली. दोघांनाबी गाडीत आत घेतलं. एक शिष्टर सोडली तर गाडीतल्या समद्यांना त्यांनी गाडीच्या भायेर काढलं.

“ये रे अर्जुनभाऊ, बस ! पारूवैनी तुम्ही पण बसा ! कमलाबाई , यांची फाईल काढा बघु जरा. ”

कमलाबाईंनी दिलेली फाईल डाक्टरांनी पुन्यांदा चाळली. तशी ती फाईल त्यांनी या आधीपन लैयेळा बिगिटली होती. पर समूर बसल्याल्या जोडप्याला आता जे काही सांगायचं व्हतं त्येच्यासाठी थोडी सोताच्याच मनाची तयारी करायला त्यांस्नी थोडा येळ फायजे व्हता.

“अर्जुनभाऊ, पारूवैनी.. असं बघा देव सगळ्यांना सगळं देतोच असे नाही. ते म्हणतात ना दात आहेत तर चणे नाही आणि चणे आहेत तर दात नाही. माफ करा, खरे तर हे तुम्हाला सांगताना खुप वाईट वाटतेय मला पण खरे ते कही ना कधी सांगायला हवेच. तुम्ही दोघे पहिल्यांदा माझ्याकडे आलात तेव्हाच साधारण कल्पना आली होती मला. पण तुम्हाला काहीही सांगण्याआधी मला त्या क्षेत्रातल्या तज्ञ डॉक्टरचा सल्ला हवा होता. म्हणुन मी मागच्या वेळेला तुम्हा दोघांनाही काही चाचण्या करायला सांगितल्या होत्या. त्यासाठी माझ्या ओळखीच्या तालुक्याच्या प्रसिद्ध डॉक्टरना मी माझी चिठ्ठीही दिली होती.

आज तुमचा रिपोर्ट माझ्या हातात आहे.

मन घट्ट करुन ऐका. पण तुम्हाला मुल होणं खुपच कठीण आहे. नाही…! पारूवैनी अगदी व्यवस्थित आहेत. त्यांच्यात काही दोष नाही. दोष असलाच तर तो अर्जुनभाऊ तुमच्यामध्ये आहे. आमच्या वैद्यकीय भाषेत याला ‘वेरिकोसील’ असे म्हणतात. तुम्हाला कळावे म्हणुन सोप्या भाषेत सांगायचे तर आपल्या शरीरात, विशेषतः जननेंद्रियाला रक्तपुरवठा करणार्‍या ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांचा आकार काही जणांच्या बाबतीत रेग्युलर आकारापेक्षा मोठा असतो, म्हणजेच त्या ठिकाणी या रक्तवाहिन्या खुपच रुंद असतात. साहजिकच रक्ताभिसरणाचे प्रमाण जास्त असते. रक्त हे मुळातच उष्ण असल्याने त्या भागातील उष्णता खुप मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे शुक्राणु एकतर निर्माणच होत नाहीत किंवा झाले तरी अतिषय कमजोर असतात आणि उष्णतेमुळे लगेचच मृत होतात, किंवा हवे तितके मोबाईल, प्रवाही होवू शकत नाहीत. त्यामुळे स्त्रीबीजांशी संकर होईपर्यंत ते नष्ट होवुन जातात किंवा तिथपर्यंत पोहोचूच शकत नाहीत. व त्यामुळे गर्भ धारणा होत नाही. तुमच्या बाबतीत अगदी हेच समस्या असल्याने तुम्हाला मुल होणे दुरापास्तच आहे.

दोगांच्याबी तोंडावर गोंधूळ, त्येस्नी कायबी कळ्ळं नव्हतं.

मंग डाक्टरसायेबांनी समद्या गोष्टी दोगांनाबी येकदम बैजवार समजावुन सांगिटल्या.

हं आता यावर उपाय काय?….. तर आहे, उपाय आहे!

पण दुर्दैवाने आज तरी कुठलाही डॉक्टर या उपायांचा उपयोग होईलच अशी खात्री देवु शकत नाही. काही ठराविक शस्त्रक्रिया करुन शरीरातील त्या विवक्षित क्षेत्रातील रक्तवाहिन्यांचा आकार कमी करुन उष्णता कमी करता येवु शकेल. पण ही शस्त्रक्रिया पुर्णपणे उपयोगी ठरेलच असे १००% नाही सांगता येणार. आणि पुन्हा ती खर्चिक आहे. निदान किमान ४०-५० हजार तरी खर्च येतोच. अगदी मी शस्त्रक्रियेसाठी माझ्या हॉस्पिटलमधली सुविधा मोफत पुरवेन. पण तरीही जे डॉक्टर शस्त्रक्रिया करणार त्यांची फी निदान २०-२५ हजाराच्या घरात जाते.अर्थात, दुसरेही पर्याय आहेत. ” डाक्टरानी आणकीबी काय काय सांगिटलं त्येस्नी.

“बघा तुम्ही आपापसात बोला, ठरवा आणि मग तुमचा निर्णय मला सांगा, मग पुढे काय करायचे कसे करायचे ते मी समजाविन .काळजी करु नका वैनी, सगळे काही ठिक होईल.”

डाक्टरसायेबांनी अर्जुनाच्या पाटीवरुन हात फिरवला आन त्या दोगांकडं बगत वर आबाळाकडं बोट दाखिवलं….

“तो आहे ना !”

अर्जुनानं खालमानंनंच मुंडी हालवली व डाक्टरची नजर चुकवून येकदा पारुकडं, आपल्या बायकोकडं बिगितलं. त्याच्या डोळ्यात येगळीच चमक व्हती. पारूनं त्येच्याकडे बगत मान हालवली आन ती दोगंबी मागारी वळ्ळी.

*******************************************************************************
“रामराम पाटीलसाहेब, आज आमच्याकडे कशी काय पायधुळ झाडलीत? या..या…बसा ! चव्हाण चार स्पेशल सांगा आणि बिस्कीटंही आणायला सांगा बरोबर. बसा आबा!” नाईकनवरेंनी हसत हसतच स्वागत केले आबांचे.

“इनिस्पेक्टर सायेब, तुमचा चा प्यायला लई आवडलं आसतं बगा आमास्नी. आवो तुमी आमचे खास दोस्त. तुमास्नी नाय म्हनाची हिंमत हाय का आमच्यात? पण आजच्याला लै इंपार्टण कामासाठी आलो हाये बगा.”

आबांनी तंबाखुची फक्की भरली आणि खुर्चीवर बसकण मांडली. इजुआबा तिथेच आवघडुन उभा राहीला. तसं इन्स्पे. नाईकनवरेंनी त्येला बसायची खुण केला. पण त्यो काय बसंना.

“न्हाय सायेब, मी बरा हाये हितंच!” इजु तसाच आंग आकसुन कोपर्‍यात हुबा रायला.

“त्ये न्हायी बसायचं आमी सांगिटल्याबगर, आमच्यासमुर आसं! ए इजु, बस बाबा ! सायबांच्या दरबारात आलुया आपण.”
आबांनी सांगिटलं की इजुआबा लगीचच खुर्चीवर बसला.

तसं नाईकनवरेसायेब त्याच्याकडे बगुन गालातल्या गालात हासाया लागले, त्यो आजुनच आकासला.

आबांनी आपल्या येण्याचं काराण सांगितलं.

“नाईकनवरे सायेब ही आमच्या पंचक्रोशीतली तिसरी घटना हाये. तिन पोरं गायब झाल्याती. दोन आमच्या गावची आन एक ४ कोसावरच्या रातांब्यातलं. लोकं लई घाबरल्याती सायेब. काल या इजुचा पोरगा रंगनाथ गायब झालाय बगा. इज्या सांग रे समदं सायबांना बैजवार.”

तसा इजुआबा रडायाच लागला. नाईकनवरेंनी पाण्याचा ग्लास त्येच्या हातात दिला आन एका हवालदाराला हाक मारली.

“चव्हाण, यांची फिर्याद लिहुन घ्या. त्यांना एक प्रत द्या त्याची, आणला असेल तर पोराचा एखादा फोटो द्या विजुभाऊ! नाहीतर नंतर आणुन द्या, जा चव्हाणांबरोबर जावुन व्यवस्थित सर्व सांगा त्यांना.”

इजुआबानं मान डोलवली आणि चव्हाण हवालदारासोबत तो भायिर गेला. तसं नाईकनवरेसायेब सावरुन बसलं. इजुआबा गेला त्या दिशेनं बगत गंभीरपणे म्हणालं…

“आबा, तुमचा विजुभाऊ घाबरुन जाईल म्हणुन मी काही बोललो नाही. पण तुम्हाला सांगतो, मला नाही वाटत त्याचा मुलगा जिवंत असेल म्हणुन. आबा, अहो ही तिसरी नाही…, गेल्या दोन महिन्यातली ही सातवी घटना आहे. विशेष म्हणजे ही साती मुले एकाच वयोगटाची आहेत, साधारण १४ ते १६ च्या दरम्यानची. माफ करा आबा, पण त्यातल्या पाच जणांची प्रेते अतिषय वाईट अवस्थेत सापडली आहेत. अगदी पोस्ट मार्टेम करायलाही काही शिल्लक ठेवलेले नाही. शरीराचे बारीक बारीक तुकडे करुन पोत्यांमध्ये भरुन टाकण्यात आली होती दोन प्रेते. दोन प्रेतांचे तर पुर्ण अवयवही मिळाले नाहीत. काही दातांवरुन तर काही प्रेतांची शरीर- खुणांवरुन ओळख पटवण्यात आली.

हे एक प्रकारचे सिरियल किलींग आहे आबा ! या सगळ्यांच्या मागे कुणीतरी एकच व्यक्ती आहे. कारण एक गोष्ट इंटरेस्टिंगली पुढे येतेय. प्रत्येक प्रेताच्या कपाळावर एक गुणाकाराचे चित्र कोरण्यात आलेय कुठल्याशा तिक्ष्ण हत्याराने. काही प्रेतांपाशी लिंबु, सुया असल्या विचित्र गोष्टी सापडल्या आहेत. आमचा अंदाज असा आहे की एकतर कोणीतरी विकृत माणुस हे करतोय किंवा कदाचित कोणीतरी अघोरी साधक. आम्ही कसोशीनं तपास करतोय आबा. हे आत्ताच या विजुभाऊंना सांगु नका. कदाचीत लवकरच आम्ही परत बोलवुच त्यांना.”

आबा, तुम्ही आता जा परत. शक्य असेल तर आजुबाजुच्या गावच्या लोकांची एखादी सभा घेवुन त्यांना सावध राहायला सांगा. शक्य असेल तर गावकर्‍यांची गस्त चालु करा गावोगाव. आबा, मला खरेतर कसेसेच वाटतेय हे सांगताना,पण पोलीसबळ कमी आहे हो इथे. दहा गावांना इथले मोजके पोलीस कसे पुरेसे पडणार. आम्ही प्रयत्न करतोच आहोत. तुमची साथ मिळाली तर लवकरच सुटेल ही केस.”

आबा उठलं.

“तुमी काय बी काळजी करु नगासा, नाईकनवरे सायेब. आमी जमल ती सारी मदत करुच. आज रातच्याला सबा बलीवली हायेच म्या गावात. गस्ती बी सुरु करतो. तुमी काळजी नगा करु. पन काय बी नवीन कळ्ळं की आमाला कळवा. नमस्कार, येतो आमी. इजु झालं का रं..चल, सायेब्..काडतील शोदुन तुझ्या रंग्याला.!

********************************************************************************
चावडी आणि मारुतीच्या पार यांच्या मध्ये असणार्‍या मोकळ्या मैदानात सभा भरल्याली. तसं शिवा न्हाव्यानं दोपारच्यालाच दोन पेट्रोमॅक्सचं दिवं आणुन ठिवलं व्हतं. लोक जमलेले. समद्यांच्याच तोंडावर भीती, ताण यांची मिक्स भावना पसरलेली. चारी बाजुला तसं मोकळं मैदानच असल्यानं वार्‍याचा आवाज लैच जोरात हुता. मारुतीच्या देवळापासला उंबर तर रातीच्या अंदारात लैच भ्याव घालत व्हता. पेट्रोमॅक्सच्या दिव्याच्या प्रकाशात देवळाची सावली या टोकापासुन त्या टोकापत्तुर पसरली व्हती तीनं अजुनच भ्याव वाटत व्हतं. समदी मंडळी कशी धरुन आणल्यासारखी बसली व्हती.

पंचक्रोशीतल्या चार पाच छोट्या छोट्या गावातली मिळुन बरीच माणसं सभंसाठी जमली व्हती. गावं कसली वो वस्त्याच त्या. शिरगाव, रातांबा, कोळपेवाडी, सालसं, भोकरं. त्यातल्या त्यात आबांची कोळपेवाडीच काय ते जरा मोठालं गाव. आबांचा या सगळ्याच वस्त्यातुन चांगलाच वट. लोक मानायचे त्यास्नी. आज येवु घातलंल्या किंवा आलंल्या या संकटानं समदीच धास्तावली व्हती.

“का रं जगु, कशापायी बलीवलं आसल आबा पाटलानी?”

“आता…, आसं काय करतु रामभाऊ? आरं आजकाल काय इचितर घडतय म्हायीत न्हाय का तुला? आरं पोरं गायब झालीत चार – पाच. कोळपेवाडीची तं दोन पोरं जणु काय इरघळुन गेल्यात. मला तं वाटू लागलय की त्येच्या बाबत कायतरी बोलणी करण्यासाटनंच बलिवलय आबानी. त्ये बग ना रातांब्याचा निकाळजेआण्णा, शिरगावचं आन भोकर्‍याचं तलाठीबी आल्याती.”

“आसंल बाबा आसंल…….”

“तर मंडळी…..

आबा उठुन उभे राहीले…. लोकांमदली कुजबुज थांबली आन लोक आबा काय म्हनत्यात ते ध्यान दिवुन ऐकाया लागलं.

“तर मंडळी, मला वाटतं समद्यास्नी थोडीभोत आयडीयेची कल्पना आली आसलच आपण हितं कशापायी जमलो हावो त्याबद्दल. दोस्तानु, आजपत्तुर लै येळेला आपण एकत्र आलो. मंग ती आळंदीच्या माऊलीची पालखी असो, तुकाराम म्हाराजांचा सप्ता असो की रातांब्याच्या पिराचा उरूस असो. आपन समद्यांनी समदे सन वार येकत्र साजरे केलेत. येकमेकाच्या सुकादुकात येकत्र आलो, सामील झालो. पन आजचा परसंग थोडा येगळा हाये. तुमा सम्द्यास्नी म्हायीती आसलच आपल्या या चार पाच गावाच्या परिसरात गेल्या महिन्या दिड महिन्यात लै इपरित गोष्टी घडल्या हायेत. हे आपलं निकाळजेआण्णा, इभुते आण्णा, इजुआबा यांची लेकरं रानातल्या जिमीनीवर पाणी वतल्यावर ढेकूळ इरघाळुन जातो तशी इरघळुन गेल्याती.

दोस्तानु म्या काल तालुक्याच्या गावी जावुन इनिस्पेक्टर सायबांनाबी भेटलु. त्येस्नी स्पेशल इनंती केली …

“म्हनलं सायेब, काय बी करा. पर ह्येचा तपास लावा. या चार पाच गावातली माणसं म्हंजी माजी फ्यामिली हाये. तवा कुटुंबपरमुक या नात्यानं त्यांची काळजी म्याच करायला पायजे का नको. तुमाला सांगतो मंडळी गेल्या चार्-पाच दिसात मला झोपबी लागली नाय. काय रं शिवा?….”

आबांमदला राजकारनी जागा झाला व्हता, आल्या परसंगाचा सोतासाठी कसा फायदा करून घ्याचा हे त्यास्नी लै झ्याक कळतं बगा.

“व्हय की आबा, तुमचं सुजल्यालं डोळंच सांगत्याती की!” शिवानं लगेच लाचारी दाकवत आपली धन्यासाठीची निष्टा परकट केली. तसं तर काल रातच्याला सुंदरा सातारकरणीच्या फडावर आबांबरुबर त्योबी व्हताच ना, आबांच्या खरचानं.

“तर दोस्तानु, सायेब बोलले की आपल्या परिसरात ही साव्वी का सातवी घटना हाये. मंडळी , पोलीस त्यांचं काम करत रयतीलच. पन आपल्याला बी काय तरी करायला पायजे का नगो. पोलीस काय सारकं आपल्याबरुबर थोडीच असनार हायती. म्हुन आप्ल्याला आता सावद र्‍हायला होवं. आपुनच काय तरी कराया पायजे गड्यांनो.”

तशी कुजबुज परत सुरु झाली. लोक आपापसात बडबडाया लागलं.

“माज्या मनातलं बोललासा बगा आबा तुमी!” धोतराच्या सोग्यानं डोळं पुशीत निकाळजेआण्णा म्हनले.

“मंडळी, माजा राजा तर हरवलाच हाये. पन गावातल्या इतर लेकरास्नी तर आपन वाचवु शकतो. म्या काय म्हनतु, समद्यानी आपापल्या वस्तीत काही लोकांचे गट करुन गस्त घालाया सुरुवात करावी. काही मंडळी हरवलेल्या पोरांना शोदण्याचं काम करतील आन काही राखनीचं काम करतील. मला इचाराल तर आजपासुनच आपन हे काम सुरु कराया पायजे. काय आबा?”

“आक्शी माज्या मनातलं बोललासा आण्णा! आपनच जर आसं सावध रायलो तर जे कायबी चाललय त्याला थोडाफार तरी चाप लावता यिल बगा आपल्याला.”

“व्हय , व्हय आबा. आसंच करुया ! आमी समदी तयार हावो. गावातल्या लोकांबरुबर बोलुन त्येस्नी तयार करायचं काम आमच्याकडं लागलं. पन आबा आता मातुर तुमी आमचे नेते. या परकरणात तुमचं मार्गदर्शन असु द्या आमाला, मंग बगा कसं काम करतो आमीबी त्ये.”

काही उत्साही, धाडसी तरुणांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घिटली, तसं आबा खुश झालं. लै काय न करता आपसुक चार पाच गावचं नेतेपद मिळालं व्हतं.
चला आवंदा आमदारकीचं तिकीट पक्कं?

दुरवर मारुतीच्या पारापासुन थोडं लांब अंधारात बसुन चार डोळे कानोसा घित व्हते. सबा संपली तसं त्ये दोगंबी लगबगीनं उटलं.

“काहीतरी करायला पाहिजे. नाहीतर सगळा गोंधळ होइल बघ.” त्यांच्यातला येकजन हळुच बोलला आन दोगंबी रातीच्या अंदारात गुडूप जाले.

*******************************************************************************

वरच्या घटनंआदी सादारण येक महिन्यामागची गोष्ट …….
……………
………………………….

पाण्याची तर्‍हाबी काय औरच आसती बगा. दनक्यानं, जोरजोरात आवाज करणारं, खळखळ करत वाहणारं पाणी निचितच मनात एक परकारचं जबर्‍या भ्याव आणु शकतं. पर ईच्चार करा…..

मध्यरात्तीची येळ…,
नदीकाठची किर्र झाडी पर वाराबी लै शांत,गुमान वाहतुया. झाडाचं पानबी हालत नायये…….
समदीकडं आवस्येचा काळाकुट्ट अंदार पसरलेला. लांबपत्तुर कसलीबी जाग न्हायी. फकस्त रातकिड्यांची किर-किर. अशायेळंला नदीच्या शांत पाण्यात एक छोटासा दगुडबी पडला तरी त्या आवाजानं काळीज धाड धाड उडतया की. त्यो टप्प आवाज काळजात धडकी भरवाया फुरं आसतय बगा. आबाळातबी अंदाराची सत्ता. आसलाच परकाश तर कुठंतरी मधुनच चमकणार्‍या काजव्यांचा. त्यो काळजातल्या भीतीत आजुनच भर घालतूया…..

आन या समद्या अंदार्‍या, भीतीदायक परिस्तितीत नदीकाठच्या मसनवटीत शांतपणं जळणारं मडं. तसं त्ये बी आता हळु हळु ईझत आलंलं व्हतं म्हना. तरीबी त्येच्यातुन आबाळाकडं झेपावणारा पिवळसर लाल रंगाचा जाळ, आसमंतात जळ्ळेल्या प्रेताची दुर्गंधी भरुन राहीलेली व्हती, मदूनच प्रेताच्या जळत्या हाडांच्या फुटण्याचा… पिचकण्याचा आवाज मसनवटीतल्या शांततेचा भंग करुन जात हुता.

ॐ र्‍हिं क्लिं चामुंडायै विच्चै नमः

त्या भयाण, सुमसाम रातीत त्या काळ्यानं भयाण आवाजात आपलं मंत्र म्हणाया सुरूवात केली आन ती दोगंबी थरारुन गेली.

त्यो तसाबी दिसायला भयंकरच व्हता. काळाकुट्ट कोळशावाणी रंग, पाठीला आलेलं त्ये घाणेरडं, किळसवाणं वाटणारं कुबड. डोक्यावरचं अर्धवट झडुन गेल्यालं क्यास. अंगावर आणि कमरेला कायबी कापडं न्हायीत. नुकताच नदीच्या पाण्यातनं डुबकी मारुन थेट जळत्या मड्यासमुर हजर झालेला. त्याचं त्ये इस्तवासारखं लाल झालेलं डोळं. (आता ते देशीच्या दोन बाटल्या रिचवल्यामुळं झाल्याती हे त्या दोगास्नीबी म्हायीत न्हायी म्हना.) मंत्र म्हनताना चितंच्या त्या लालसर पिवळ्या उजेडात मधुनच चमकणारं त्याचं घाणेरडं पर सुळ्यावाणी वाटनारं दात. ती दोगंबी लै घाबारलेली. तिनं त्याचा हात आपल्या हातात घट्ट धरलंला आन रातीच्या त्या थंडीतबी त्येच्या कपाळावर घाम साचलंला …..!

हातातली ती वस्तु हवेत नाचवत त्या काळ्यानं दोगाना सांगिटलं….

“सांगटलेल्या समद्या गोष्टी आणल्या हायेत न्हवं? अंगावरची कापडं काडा …., सम्दी ! …………………. आन नदीत जावुन आंगुळ करुन या!”

यायेळेला पयल्यांदाच त्येच्या हातातली ती वस्तु तिनं बिगिटली आन ती हादरलीच की. ती एक बारकीशीच पण मानसाची कवटी व्हती. ती घाबरलेली बघताच तिच्या जोडीदारानं तिचा तळवा हातानं दाबुन तिला धीर देण्याची कोशीस केली. तसा त्यो बी टरकलाच व्हता. त्या दोगांना घाबरल्यालं बगुन त्यो काळ्या खदाखदा हंसला…

“भ्या वाटतय, नगा डरू…. फकस्त कवटी हाये… सा म्हैन्याच्या नवजात पोराची!”

तशी ती दोगंबी थरारली, ती भीतीनं त्याला घट्ट चिकाटली.

“जावा लवकर आटपा, पुन्यांदा येळ हातातुन निसाटली तर ही बया बी निसटल.”

“कोन्ती बया?”

तिनं घाबरत, घाबरत इच्चारलं…….

“ही बया…. त्यानं समुरच्या चितंवर जळनार्‍या मड्याकडं बोट दाखवत सांगिटलं….

“वली बाळंतीन व्हती न्हवं! बगा कशी सुकानं जळतीय, येकदा का सटकली की पुन्यांदा न्हाय घावायची.”

त्यानं पुन्यांदा हातातली कवटी तोंडाला लावली. ती दोगंबी टरकल्याली, त्याचा कार्यक्रम सुरूच व्हता. खांद्यावरल्या पिवशीतनं त्यानं आपलं सामान भायेर काडलं. कसल्या-कसल्या बाटल्या, हाडं, रंगीबेरंगी दोरे, चारपाच परकारची राख, कसली कसली भस्मं…..! ती दोगंबी आ वासुन बघतच व्हती, तसा काळ्या पुन्यांदा वसकला …

“जावा, लवकर या बुडी मारुन…. येकदम नागव्यानं!”

“पण आमचं काम नक्की व्हईल ना?” तिच्या जोडीदाराने घाबरत घाबरत इचारलं तसं काळ्यानं आपलं तांबारल्यालं डोळं वटारून त्याच्याकडं बिगितलं. त्यो एकदम घाबरुन मागं सरकला.

“आमी येतो लगीचच आंगुळ करुन….!”

दोगंबी नदीकडं गेलं आन काळ्या तयारीला लागला. कसले कसले जंतर मंतर म्हनत त्याचं अघोरी काम सुरू झालं. जराश्यानं ती दोगंबी आली. बाय भल्ली आकसलेली. परक्या बाप्यासमुर अशा अवस्थेत येण्याची ही पैलीच येळ. जोडीदाराने तिला धीर दिला. ती दोगंबी काळ्यासमोर येवुन हुबी रायली. तिची नजर पार जमीनीत घुसल्याली. काळ्यानं तिच्यावरुन खालपासुन वरपत्तुर येक नजर फिरवली. तिचा जोडीदार बघतुया हे ध्येनात आल्या आल्या मातुर लगीचच नजर फिरवीत दोगास्नी चितंसमोर राखंनी काडलेल्या एका वर्तुळात बसण्याची खुण केली आन सोता जोरजोरात मंत्र उच्चारत आपल्या पोतडीतून काढलेल्या त्या चित्र-विचित्र वस्तु एक एक करून त्या चितंत फेकत मड्याभवती फिराया लागला. थोड्या येळाने अचानक चितेची आग भडकली… सगळीकडे धुर धुर झाला. तसा काळ्या घुमाया लागला. त्येच्या तोंडातुन आता येगळाच , बाईमान्साचा आवाज भायेर पडत व्हता……

दोगंबी येड लागल्यासारकं त्याच्याकडं बगाया लागलं. काळ्या…, बाईच्या आवाजात कायबाय बडबडत व्हता… काय बोलतुया ते फारसं कळत नव्हतं. त्या दोगास्नी फकस्त एकच गोष्ट नीट कळ्ळी….

“मला दोन डोळ्यांचा नारूळ पायजे.”

दोगंबी एकमेकाला घट्ट धरुन त्याच्याकडं बगत हुती. जरायेळाने तो शुद्धीवं आला. त्यांनी त्याच्याकडं बिगिटलं तसा काळ्या नकारार्थी मान झटकत म्हनला.

“न्हायी बाबा, लै कठीन हाये. बया दोन डोळ्याचा नारुळ मागतीया. जमल का तुमास्नी आणाया?”

“दोन डोळ्यांचा नारूळ….? ह्यो कसला नारूळ आसतो अजुन?” तिच्या जोडीदाराने इचारलं.

तसा काळ्या खदखदुन हासला…. हातातली कवटी त्यानं परत तोंडाला लावली, दोन घुटकं घेतलं आन म्हन्ला…..

“दोन डोळ्याचा नारुळ म्हंजी माणुस….. नारळाला तीन डोळे आस्त्यात, मान्साला दोन !”

तशी ती दोगंबी चमाकली….

“कायबी काय बोलताय जंगम? आसं कंदी आसतय काय? म्हंजी यासाटनं मान्साचा बळी द्याचा. न्हाय न्हाय, काय तरी वंगाळ सांगु नगासा. कायतरी दुसरा उपाय सांगा.”

“ह्यो येकच उपाय हाये! जमत आसल तर फुडच्या आवसंला या तयारी करून. आता निगा. माजी सादनेची येळ झालीया.”

त्या दोगांनी कापडं घातली आन तिथनं पाय काडला. तसा काळ्या लगबगीनं उठला, जवळच पडल्याली त्याची लुंगी त्यानं कशीबशी गुंडाळली आन तिथनं पळाला.

त्ये तिगंबी तितनं पळाली तसं मसनवटीभायेरच्या पिपळाच्या मागुन एक सावली भायेर आली. येक पळभर त्या जळत्या मड्याकडं बगत थांबली आन मंग सोताशीच हासत तिथनं निघून गेली.

*****************************************************************************

दोस्तानु आता पुन्यांदा आजच्या काळात येवू म्हनं. जन्या, बार लावतु का जरा?……………

पुन्ना चालू काळात ……

…………………………….

……………………………………….

“येस डॉ. फर्नांडो हिअर !”

“…………”

दॉक्टर लगबगीने उठले, त्यांनी आपल्या केबीनचा दरवाजा बंद केला आणि पुन्हा फोन घेतला.

“तु इथे कशाला फोन केलास? तुला किती वेळा सांगितलेय इथे फोन करत जावू नकोस म्हणून.”

“……………….”

“ठिक आहे, पण…! परत इथे फोन करू नकोस.”

“………………..”

“हे बघ, हे अति होतय !”

त्यांनी दुसरा एक नंबर फिरवला…

“हॅलो डॉक हिअर….. थोडा सबुर करा!”

“……………………………”

“व्हू इज द बॉस स्टुपीड! डू अ‍ॅज आय सेड, अंडरस्टूड? ” नकळत डॉक्टरांचा आवाज चढला होता.

डॉक्टरांनी फोन खाली ठेवला आणि कपाळाला आलेला घाम पुसत टेबलावरची बेल वाजवली.

“याचं काहीतरी करायलाच हवं….!”

तेवढ्यात दारावर खटखट झाली.

“कम इन प्लीज!” डॉक्टरांनी आपल्या आवाजात शक्य तितके मार्दव आणत उत्तर दिलं. तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण आत्ताच केबीन आतुन लॉक केली होती, तसे त्यांनी उठून केबीनचा दरवाजा उघडला. तशी त्यांची सेक्रेटरी आत आली. डॉक्टरांचा चेहरा बघून ती थोडी चरकलीच.

“सर, आर यु ओके? बरं वाटत नाहीये का तुम्हाला?”

“काही नाही गं! थोडंसं अनकंफर्टेबल वाटत होतं. नाऊ आय एम फाईन! तरीही मी आज घरी जातोय. आजच्या अपॉईंटमेंट्स कॅन्सल कर प्लीज. से देम सॉरी फ्रॉम माय साईड!”

डॉ. फर्नांडो गडबडीतच केबीनच्या आणि पर्यायाने हॉस्पीटलच्याही बाहेर पडले. त्यांची सेक्रेटरी पाहातच राहीली. गेल्या सहा महिन्यात प्रथमच डॉक्टरांनी आपल्या अपॉईंटमेंट्स कॅन्सल केल्या होत्या. आज ते थोडेसे टेन्सच वाटत होते.

*******************************************************************************

“साहेब, आमच्यावर विश्वास ठेवा. हे आसलं घाणेरडं काम आमी नाय केलेलं.कुणाचा जीव घेण्याची हिंमत नाय वो आमच्यामदे.”

त्यो आक्षी जिवाच्या आकांताने सांगत होता. ती तर कुठल्याबी क्षणी ढसाढसा रडायला लागंल आसच वाटत व्हतं.

नाईकनवरें सायबांनी कोपर्‍यात हुब्या आसलेल्या त्या दोघांकडे एकदा खालपासुन वरपत्तुर बगुन घितलं. तशी त्यानं नजर झुकवली.

“कदम…. काय म्हणणं आहे यांचं!”

“साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी या दोघांवर तसेच त्या मांत्रिकावर देखील नजर ठेवली होती. या दोघांना मुल बाळ नाही साहेब. म्हणुन त्या रघ्या कडे गेले होते दोघेही. त्याने यांच्याकडे दोन डोळ्याच्या नारळाची मागणी केलीय. ”

“हूं….. दोन डोळ्यांचा नारळ…. म्हणजे नरबळी ! साऊंड्स इंटरेस्टिंग ! ते जावु दे मी बघतो यांच्याकडे. तुला मी आणखी एका व्यक्तीवर नजर ठेवायला सांगितली होती. त्याचे काय झाले?”

“साहेब, ते भारी प्रकरण आहे बघा. माझे खबरी त्याच्यावर नजर ठेवून आहेत. त्याचे हात खुप वरपर्यंत जावून पोचलेत साहेब. खुप मोठ्या मोठ्या माणसात उठबस आहे त्याची.”

” तू त्याचं टेन्शन घेवू नकोस. माझ्याकडं स्पेशल ऑर्डर्स आहेत गृहमंत्रालयाच्या. ही केस खुप वरपर्यंत जावुन पोचलीय कदम. आपल्याला कुणालाही संशयाच्या नावाखाली उचलायची, तपास करायची परवानगी मिळालीय. हा आठवडाच काय तो आपल्या हातात आहे. नाहीतर केस सी.आय. डी. कडे जाईल आणि आपली नाचक्की होइल. तेव्हा मला रिजल्टस हवेत. मला खात्री आहे कदम तिथेच नक्की काहीतरी पाणी मुरतेय.”

नाईकनवरेसायेब अगदी ठामपणानी बोललं.

“ठिकाय साहेब, या दोघांचं काय करायचं?” कदमनं इच्चारलं.

“मी बोलतो त्यांच्याशी. वरकरणी तर वाटतेय की तेच खरे गुन्हेगार आहेत, ही पोरं गायब करुन त्यांना बळी देण्याचं कृष्णकृत्य या दोघांनीच केलय म्हणून…..! पण का कोण जाणे माझ मन, माझी सदसद विवेकबुद्धी त्यांना निदान या प्रकरणात तरी गुन्हेगार मानायला तयार नाहीये. तु त्या व्यक्तीवर नजर ठेव, अजुन चार जणांना सोड त्याच्यावर हवेतर. त्याच्या सगळ्या माणसांमागे आपला एक एक माणुस हवाय मला. पैशाची काळजी नको करूस. हि केस या आठवड्यात सुटायलाच पाहीजे. तु निघ आता. मी बघतो या दोघांकडे!”

“तुम्ही काहीही म्हणा साहेब. पण ही दोघेही वाटतात तेवढी साधी आणि सरळ नाहीत. मला पक्की खात्री आहे, की आपल्याला मुल व्हावे म्हणुन या दोघांनीच ती पोरं गायब करून त्यांचे बळी दिलेत. तो मांत्रिक सद्ध्या फरारी आहे पण जातो कुठे? एक दोन दिवसात त्याला पकडतोच आणि हजर करतो तुमच्यासमोर. तो समोर आला की मग पोपटासारखे बोलतील दोघे.”

सब इन्स्पेक्टर कदमांनी एक जळजळीत नजर त्या दोघांकडे टाकली आणि ते तिथुन निघुन गेले.

” हा बोल आता, काय नाव म्हणालास तुझं?

“साहेब, आम्ही काहीही केलेलं नाही. आमी कोणचीबी प्वॉरं पळवलेली नाहीत की त्यांचे बळी…..

ती मुसमुसून रडाया लागली.

“पारु, गप्प बस की आता, आपण काय केलेलच न्हाय तर घाबरायचं कशापायी?”

“मी तुला तुझं नाव विचारलं होतं बाबा… चल तुझ्या बायकोचं नाव पारू आहे एवढं कळलं. अर्थात तुझं नाव पण माहीत आहे मला अर्जुन. पण जे काही झालं ते तुझ्याच तोंडुन ऐकायचं आहे मला. बोल तुझा त्या रघ्या मांत्रिकाबरोबर काय संबंध? मागच्या महिन्यात त्या मध्यरात्री ऐन स्मशानात काय करत होता तुम्ही दोघे त्या रघ्या बरोबर.”

दोघेही चपापले. पारु अजुनच जोरजोरात रडायला लागली.

“साहेब मी तुम्हाला सगळे सांगतो. पण विश्वास ठेवा हे पाप आमी नाय केलेलं. सायेब, आमाला मुलबाळ नाय. डॉक्टरकडं बी गेलो होतो. पन त्यानं सांगितलं की तेबी कसलीच खात्री देवू नाय शकत. मग येक दिवस आमाला कमलाबाईंनीच रघ्या मांत्रिकाबद्दल सांगितलं.”

“ही कमलाबाई कोण?”

तसं त्यानं आपल्या बायकोकडं, पारुकडं पाह्यलं आन घडा घडा बोलायला लागला……..

…………………………………………………………………………………………

चव्हाण या दोघांनाही लॉक-अपमध्ये टाक. आणि ते पोस्टमार्टेमचे रिपोर्ट आले का?”

“मघाशीच आलेत साहेब. तुमच्या टेबलावरच ठेवलीय फाईल?”

नाईकनवरेंनी फाईलवर झडपच घातली. सगळे रिपोर्ट वाचत गेले. ते वाचत असताना जे मुद्दे समोर आले ते वाचताना नाईकनवरे साहेब अतिषय गंभीर झाले. पण एक गोष्ट त्यांना सगळीकडे कॉमन जाणवली आणि त्यांच्या चेहर्‍यावर ही केस सुरू झाल्यापासुन पहिल्यांदाच हास्य आले.

तेवढ्यात फोन वाजला. त्यांनी फोन उचलला आणि ……

“दॅट्स इट ! उचला दोघांना पण, थर्ड डिग्री लावा, पोपटासारखे बोलतील!”

मग त्यांनी आणखीही काही ठिकाणी फोन केले.

“बस्स आणखी एखादा दुसरा दिवस ! तुझी घटका भरलीच म्हणुन समज चांडाळा !” समाधानाने त्यांनी आपल्या खुर्चीच्या पाठीवर डोके टेकले आणि डोळे मिटून घेतले.

*******************************************************************************

आजच्याला चौकीवर लै मोट्या-मोट्या आसामी हाजर हुत्या बग औध्या.

पुन्यांदा तमाकुचा बार लावीत रम्यानं फुडची गोष्ट सांगाया सुरुवात केली.

“मोट्या मोट्या म्हंजी…..

फुकणीच्या शब्दात पकडाया नगो बगू. समजून घी. नायतर आपून चाल्लो. रम्या भडकला तसा बाकिच्यांनी औध्याला आवरला.
तु बोल रं रम्या. तवर म्या अजुन येक चाय मागिवतो.

हांग आश्शी ! आता कसं मनातलं बकलास बरं…….. मागिव, मागिव….

तर चौकीवर नाईकनवरे सायेब, आबा पाटील, फर्नांडू डाक्टर,म्हनलंच तर फौजदार कदम सायेब आन पंचक्रोशीतली कायबाय राजकारनी लोकंबी व्हती. म्या नाईकसायबाच्या केबीनभायेरच खिडकीखाली आसलंल्या बाकड्यावर बसलू व्हतू. समदं सपष्ट आयकू येत व्हतं….

इनिस्पेक्टरसायेबांनी खाकरून घसा साफ केला आन बोलाया हुबं र्‍हायलं…

…………………………………..

………………………………………………..

मंडळी, गेले दोन-तीन महीने, किंवा कदाचीत जास्तच काळ आपण सगळेच धास्तावलेल्या , घाबरलेल्या अवस्थेत जगत होतो. आज कुणाला वाईट बातमी ऐकायला मिळेल याच काळाजीत दिवस ढकलत होतो. याची सुरुवात झाली ती कोळपेवाडीच्या संजय विभुते याच्या गायब होण्यापासून. नंतर एका मागून एक ६-७ मुले गायब झाली. विशेष म्हणजे ही सर्व मुले एकाच वयोगटातली होती. आम्ही शांत बसलो नव्हतो, आमच्या पद्धतीने शोध घेणे चालूच होते. आधी आम्हाला संशय होता की ही मुलांना पळवून नेवून त्यांना भिक मागायला लावणारी एखादी टोळी असावी. त्यानुसार आम्ही पंचक्रोशीतल्या अनेक जणांना संशयाखाली ताब्यात घेतले. पण शेवटी या निष्कर्षापर्यंत आलो की हे प्रकरण काहीतरी वेगळेच आहे.

माझे खबरी सगळ्या पंचक्रोशीत शोध घेत होते. त्यातल्याच एकाने खबर आणली की शिरगावाभाहेरच्या स्मशानात त्याने काही संशयास्पद गोष्टी पाहील्या होत्या म्हणुन. आम्ही त्या रोखाने शोध घ्यायला सुरूवात केली आणि हे दोघे हातात सापडले.

नाईकनवरेसाहेबांनी जमीनीवर बसलेल्या अर्जुन आणि पारुकडे बोट केले. तशा जमलेल्या लोकांच्या नजरा त्येंच्याकडे वळ्ळ्या !

अर्जुन आणि पारु खालमानेनंच उटून हुबं र्‍हायलं…

“बोल अर्जुन, त्या दिवशी मला जे सांगितलस त्ये आज नीट सांग परत सगळ्यांना …….

“साहेब मी तुम्हाला सगळे सांगतो. पण विश्वास ठेवा हे पाप आमी नाय केलेलं. सायेब, आमाला मुलबाळ नाय. डॉक्टरकडं बी गेलो होतो. पन त्यानं सांगितलं की तेबी कसलीच खात्री देवू नाय शकत. मग येक दिवस आमाला कमलाबाईंनीच रघ्या मांत्रिकाबद्दल सांगितलं.”

“ही कमलाबाई कोण?”

“डॉक्टर फर्नांडोसायबाकडं नर्सबाई म्हुन हाये ती. तशी लै चांगली बाई हाये. मला म्हनली दादा, हे दुकणं डॉक्टरच्या हातनं बरं होण्यासारखं नाही. तुमी दोगं रघ्याला भेटा. तो कायतरी उपाय सांगल. मग आमी त्या रघ्याला भेटलु. तर त्यो म्हनला नुकत्याच मेलेल्या ताज्या बाळंतिणीचं प्रेत पायजे. त्याची पुजा करावी लागत्ये नागव्यानं. मंग ती जर खुश झाली तर लेकरू हुतया.

म्हुन त्या रातच्याला आमी दोगंबी ततं गेलो. त्यो म्हनला तशी पुजाबी ………

इथे अर्जुननं खाली मान घातली आणि पारु पुन्हा रडायला लागली…….!

साहेब लेकरू पायजे म्हनुन हे सम्दं केलं आमी. पन आईची आण घिवून सांगतो जवा रघ्यानं सांगितलं की दोन डोळ्याचा नारूळ पायजे, म्हनजे माणसाचा बळी पायजे तवा आमी ठरवलं की बास्स, आता परत म्हनुन ह्येच्या नादाला लागायचं न्हायी. नंतर दोन तीन येळेला त्या रघ्यांनी निरुप पाटिवला पन आमी नाय गेलो. तिसर्‍या येळंला तर रघ्या म्हनला तुमी ती ओली बाळांतीन जागावलीय आता तिला पायजे ते दिल्याबिना ती मानायची न्हाय. न्हाय तर येक दिस ती तुमालाच घेवुन जायीन.

पन सायेब आमी पक्कं ठरिवलं होतं की कायबी होवु दे. आता जिव गेला तरी बेहत्तर पन आपल्याला पोर व्हावं म्हनुन दुसर्‍याच्या पोराबाळावर टाच नाय आणायची. मग भले आविष्यभर आसंच का र्‍हावं लागंना. त्या बाळंतिणीच्या भुतानं आमाला मारलं तरी चालल. परवा कुटंतरी आईकलं म्या की भुतांची बी एक हद्द असतीया, त्याच्या भायेर न्हायीत जात ती. म्हनुन मग आमी शिरगाव सोडुन लांब हिच्या म्हायेरी जावुन र्‍हायलो होतो. पण तुमच्या त्या सायबांनी आमाला तिथुन पकडलं आन हितं परत आनलं. आमच्यावर इश्वास ठिवा सायेब, पोराच्या आशेनं सुरूवातीला आमी त्या रघ्याच्या नादी लागलो होतो पन आम्ही कुणाचीबी पोरं न्हाय पळवली सायेब. मारली तर अजाबात नाय. सायेब आमाला पोर न्हाय म्हनुन आमची काय हालत झालीय आमाला म्हायीत, आमी एकाद्या आई-बहिणीचं पोर मारण्याचं वंगाळ काम कसं करु साहेब.”

आतामातुर अर्जुन आन पारु दोगंबी रडाया लागले.

“हम्म्म्म ! माझीच शंका खरी ठरतेय असे वाटतेय. पण अर्जुना , तुझ्यावर कसा विश्वास ठेवू मी. सगळे पुरावे तुमच्याकडे बोट दाखवताहेत. प्रेतं ज्या अवस्थेत सापडलीत ती अवस्था, आजुबाजुची परिस्थिती सांगतेय की ती कुणीतरी विकृत माणसाने कुठल्यातरी अघोरी कामासाठी बळी दिलेली आहेत.
आणि सापडलेले पुरावे व तत्कालीन परिस्थिती ओरडून -ओरडून तुमच्याकडे बोट दाखवतेय.

‘तुज्या आयला तुज्या….. जिवच घेतू म्या तुजा!”

इजुआबा दात्-ओट खातच अर्जुनावर धावून गेला. तसं एका हवालदारानं त्येला पकाडलं.

“थांबा विजुभाऊ, अजुन त्याच्यावरचा आरोप सिद्ध झालेला नाहीये. सद्ध्या फक्त त्यांच्यावर संशय आहे. अजुन त्यांनीच हे खुन केलेत हे सिद्ध झालेले नाही.”

“आता आजुन काय र्‍हायलंय सायेब,माजं सोन्यासारकं प्वार गमवलंय म्या. आसल्या लोकांना चावडीवर हुबं करुन दगडानी चेचाया पायजे.” इजुआबाचा संताप काय थंड व्हईत न्हवता. पण पोलीसानी आवारलं त्याला.

“तुमी बसा एका कोपर्‍यात.” नाईकनवरेसायबांनी त्या दोगास्नी बसाया सांगितलं आणि फुडं बोलाया लागलं……

“मला शंका वाटत होती की यात आणखी काही वेगळंच असण्याची शक्यता आहे, म्हणुन आमचा शोध आम्ही चालुच ठेवला होता. तशात एक दिवस एका खबर्‍याने बातमी आणली की डॉ. फर्नांडोंच्या दवाखान्यात मागच्या यार्डात मध्यरात्रीच्या नंतर काही संशयास्पद हालचाली पाहील्याची!”

नाईकनवरे सायबांनी बारक्या डोळ्यांनी फर्नांडोकडं बिगिटलं आन गालातल्या गालात हासाया लागलं…

“ए रम्या, उगा पाचकळपना करु नगो, पटं पटं सांग फुडं काय झालं ते……..”
औध्या भडकला तसा रम्या हासला.

“बरं बाबा, सांगतु…., तस्सं डाक्टर येकदम हुबं रायलं.

” काय बोलता आहात इन्स्पेक्टर तुम्ही? काही पुरावे असतील तर आरोप करा? मी एक जबाबदार आणि प्रतिष्ठीत नागरीक आहे. एक विख्यात डॉक्टर आहे या भागातला. काहीही आरोप करु नकात.”

डाक्टर रागानं लाल-लाल झालं हुतं बघ औध्या.

“डॉक्टर प्लीज आरडा ओरडा करु नका. मी अजुनही तुमच्यावर कुठलेही आरोप केलेले नाहीत. मी केवळ तुमच्या हॉस्पिटलचा उल्लेख केलाय आणि मी पुरावे असल्याशिवाय काहीही बोलत नाही. तुमची उर्जा राखुन ठेवा, पुढे उपयोगी येइल कदाचित.”

सायबाच्या आवाजात आसा काय अंगार व्हता की डाक्टरची आवाजी बंदच झाली.

“पन रम्या, डाक्टरसायबांसारखा देवमानुस… ?” जन्यानं मधीच पिल्लु सोडलं…

आता गपचिप बसुनशान ऐकतु का? उगा मधीमधी काड्या करू नगं” रम्या डाफरला तसा जन्या गप्प झाला.

“डॉक्टर, त्या नंतर आम्ही सगळीकडेच नजर ठेवायला सुरुवात केली आणि एके दिवशी तुम्हाला एक फोन आला आणि तुम्ही भर दुपारीच सगळ्या अपॉईंटमेंट्स रद्द करुन घाई घाईत दवाखान्याच्या बाहेर पडलात. असं तुम्ही यापुर्वी कधीच केलं नव्हतं. काय झालं होतं नक्की त्या दिवशी?”

सायबानी बाँब टाकला आन डाक्टर हादरलं.

“तुम्हाला….., कसं…? कळलं हे सगळं?” डाक्टरचा आवाज नको तेवडा खाली आला हुता.

“डॉक्टरसाहेब, अगदी स्कॉटलँडयार्डच्या तोडीचे नसलो आम्ही तरी काय झालं, या छोट्या छोट्या गोष्टी फार अवघड नाहीत आम्हाला. सगळीकडे माणसं आहेत माझी. तुमचं फोनवर काय बोलणं झालं ते सांगु? कोण आणि कशासाठी ब्लॅकमेल करतय तुम्हाला?”

“क क्क कोण ब्लॅकमेल करतय? तुमचा काहीतरी गैरसमज झालाय साहेब. असं काहीही नाहीये.”

नाईकनवरेसायबानी खांदं उडिवलं….

“ठिके तर, हवालदार त्या डॉक्टर वर्तकला घेवून या जरा.”

तसं फर्नांडो डाक्टर चमाकलं, हवालदार वर्तकला घिवुन आलं , वर्तकचा पडल्याला चेरा बिगिटला आन डाक्तरची ताकद सपली.

“ठिक आहे इनस्पेक्टर, मी सगळं सांगतो तुम्हाला. पण या सगळ्याचा ही लहान लहान पोरं गायब होण्याशी काही एक संबंध नाहीये. गेले कित्येक महीने आम्ही एका नव्या औषधावर प्रयोग करतोय. जर यशस्वी झालो तर कॅन्सरसारख्य रोगावर याचा खुप फायदा होवू शकेल. सुरूवातीला आम्ही या नव्या औषधाचा परिणाम चेक करुन पाहण्यासाठी आधी उंदीर, मग माकडे अशा प्राण्यांवर त्याचा वापर करुन पाहीला अ‍ॅंड वी वेअर सक्सेसफुल. मग ……..

“बोला डॉक्टर, पुढे बोला……..” इन्स्पेक्टरसायेब वरडले.

“नंतर आम्ही त्याचा माणसावर वापर करुन पाहायचा असं ठरवलं. पण असं कोणी सहजासहजी तयार होणार नव्हतं. म्हणुन आम्ही कुणाच्याही नकळत आमच्याकडे असलेल्या एका कॅन्सरच्या रुग्णावर त्याचा प्रयोग करुन पाहीला. त्याचा कॅन्सर तसा प्रायमरी स्टेजला होता, नियमीत उपचाराने तो कदाचित बराही झाला असता, पण आमच्या औषधाचा त्याच्यावर वेगळाच परिणाम झाला आणि तो रुग्ण दगावला……!”

डाक्टरसायबांची मान खाली झाली व्हती, डोळ्यात पाणी साठलं व्हतं.

तो तर गेलाच सर, पण माझ्यातला राक्षस जिवंत होता अजुन. नोबेलची लालसा होती मला. मी ते प्रकरण दाबुन टाकलं आणि माझे प्रयोग करत राहीलो. वर्तक माझे असिस्टंट होते त्या प्रोजेक्टवर. त्यांनी मला थांबवायचा खुप प्रयत्न केला पण मी थांबायला तयार नव्हतो. तो रुग्ण आमच्या औषधाने दगावला ही गोष्ट फक्त मी आणि वर्तक, अशा आम्हा दोघांनाच माहीत आहे अशी माझी समजुत होती. पण ते साफ चुकीचे होते. दुर्दैवाने माझी समजुत चुकीची होती.वर्तक मला एकनिष्ठ होते
पण …..

कुणीतरी अस्तनीतला निखारा होता. त्याने याचा गैरफायदा घेवून मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. सुरूवातीला त्याच्या फक्त पैशाच्या मागण्या होत्या. पण त्या दिवशी त्याचा फोन आला……

“येस डॉ. फर्नांडो हिअर !”

“नमस्कार डॉक्टर, मी बोलतोय !”

मी लगबगीने उठलो, माझ्या केबीनचा दरवाजा बंद केला आणि पुन्हा फोन घेतला.

“तु इथे कशाला फोन केलास? तुला किती वेळा सांगितलेय इथे फोन करत जावू नकोस म्हणून.”

“त्याचं काय आहे ना डॉक्टर. आजकाल जाम कडकी चालु आहे. हात जरासा तंग होता, म्हणुन म्हटलं तुम्हाला जरासा त्रास द्यावा. थोडी निकड होती डॉक्टर….”

“ठिक आहे, पण…! परत इथे फोन करू नकोस.”

“ठिक आहे, डॉक्टर, मी परत फोन नाही करणार. बस आज रात्री १० पेट्या तयार ठेवा आणि मी जर पुन्हा फोन करु नये असे वाटत असेल तर आपण एक डिल करुया आज. माझ्या माहितीप्रमाणे तुमचं संशोधन पुर्ण होत आलेय. आता परत तुम्हाला गिनीपिगची गरज पडेल. ते मी तुम्हाला पुरवेन, फक्त त्यासाठी औषधातुन तुम्ही जे काही कमवाल त्यात मला पण हिस्सा पाहीजे , जास्त नाही ५०-५० बस्स! ” फोनवरची व्यक्ती खदखदा हासली.

“हे बघ, हे अति होतय ! मला थोडा वेळ दे!”

“हवा तेवढा वेळ घ्या डॉक्टर, फक्त मला विसरु नका. नाहीतर……..!”

त्या आवाजातली गर्भित धमकी समजुन मी हादरलो आणि लगेच लॅबला फोन लावला…

“हॅलो डॉक हिअर, डॉ. वर्तक, सगळे प्रयोग थांबवा….. थोडा सबुर करा!”

पण सर, वी हॅव ऑलमोस्ट अ‍ॅचिवड दॅट! आपण आता यशाच्या उंबरठ्यावर आहोत.”

“व्हू इज द बॉस स्टुपीड! डू अ‍ॅज आय सेड, अंडरस्टूड? ” नकळत माझा आवाज चढला.

त्यानंतर मी लगेचच बाहेर पडलो. तात्पुरते का होईना सगळे प्रयोग थांबवायला हवे होते. त्याला रोखणे जरुरीचे होते. कारण मला हे औषध गोर-गरीबांसाठी, ज्यांना खर्च करणे शक्य नाही त्यांच्यासाठी आणायचे होते, तेच जर या ब्लॅकमेलरच्या हातात सापडले असते तर सगळीच मेहनत वाया गेली असती… !”

काहीही असो एका निरपराध व्यक्तीच्या मृत्युला मी कारणीभुत ठरलो आहे, त्याबद्दल मी स्वतःला कायद्याच्या स्वाधीन करतोय, कायदा देइल ती सर्व शिक्षा मला मान्य आहे. …..”
डाक्टर सायेब लैच हताश झालं हुतं…

“पण या मुलांच्या गायब होण्यात माझा काही एक हात नाहीये इन्स्पेक्टरसाहेब आणि वर्तकही निर्दोष आहेत, ते फक्त हुकमाचे गुलाम होते.”

“हम्म्म्म्म ! नाईकनवरे सायेबानी एक सुस्कारा सोडला… शोधायला गेलो एक आणि हाती आलं दुसरंच….. ! पण म्हणजे आपली मुळ समस्या अजुनही तशीच आहे.

बट, आय एम सॉरी टू से डॉक्टर, पण त्या सर्व मुलांच्या गायब होण्याचा अगदी तुमच्याशी नसला तरी डॉ. वर्तकांशी आणि पर्यायाने तुमच्या हॉस्पीटलशी संबंध आहेच. काय डॉ. वर्तक?”

इनिस्पेक्टरसायबांनी आता वर्तक डाक्टरकडं मोर्चा वळीवला….

तसा वर्तक घाबरून हुबा र्‍हायला….

“साहेब मी सगळं सांगतो, पण मी फक्त कठपुतळी आहे, यात हॉस्पीटलमधले अजुनही काही डॉक्टर सामील आहेत. आणि या सगळ्यांचा चिफ आहे ……..!”

एकदम कसलीतरी मोठी गडबड झाली, नाईकनवरेंसायबानी वर्तक डाक्टरला येकदम लांब ढकलला आणि कंबरेचं पिस्तुल काडुन फायर केला. जोरात वरडुन कुणीतरी खाली पडलं. तसं नाईकनवरे सायबांनी वाघासारकी झेप घेतली आन त्येच्या मुसक्या बांदल्या.

………….

……………….

………………………..

कदम फौजदाराच्या हातावरच गोळी बसली हुती. लै रगात व्हात हुतं. लगेच फर्नांडो डाक्टरानी आपल्या गाडीतली औषिदाची प्याटी मागवली आन त्येन्ला पट्टी बांधली. समदंच आ वासुन बगत रायलं हुतं. आबा तर जागवर उटून हुबंच रायलं.

“हे खुपच दु:खद आहे, क्लेषकारक आहे , संतापजनक आहे….., कदम. नाईकनवरे सायेब येकदम हळु आन थकलेल्या आवाजात बोलाया लागले.

“का केलस हे? कशासाठी आणि काय मिळवलंस यातुन?”

“साहेब हा मला फसवण्याचा डाव आहे. मला बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न आहे. स्वतःची मान बचावण्यासाठी हे डॉक्टरलोक मला अडकवू पाहताहेत.”

कदम अजुनबी कबुल करायला तयार न्हवता.

“बस्स, कदम ! खुप झालं ! आत्ता माझी सहनशीलता संपलीय. ”

नाईकनवरेसायेब लै चिडले व्हते.

“कदम, इथे कोणीही तुझं नाव घेतलेलं नव्हतं. वर्तकांनी चिफचं नाव घ्यायच्या आधीच तु त्याच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केलास, म्हणुनच मला तुझ्यावर गोळी चालवावी लागली. माझ्याकडे तुझ्या विरोधात सगळे पुरावे आहेत. अर्जुन आणि पारुला पुढं करुन आमची दिशाभुल करण्यासाठी तु वापरलेले रघु मांत्रीक आणि नर्स कमलाबाईंनी कधीच तुझ्याविरुद्ध जबाब दिलाय. तुला साथ देणारे डॉ.अभिजीत वर्तक, डॉ. साळुंके आणि डॉ. नियाझ अहमद यांना अटक केलीय आम्ही. त्यांनी आपलं तोंड उघडलय कधीच. तु एक निर्ढावलेला आहेस, पन पोलीसांच्या चौदाव्या रत्नाला तोंड देण्याइतकी ताकत त्या पांढरपेश्या लोकात नाहीये. एवढेच नाही तर ज्यांच्यासाठी तु हे निर्घूण कृत्य करत आलास, त्या मुंबईच्या गँग्जच्याही बहुतेक जणांची धरपकड झाली असेल आत्तापर्यंत. तु तुझ्या तोंडाने गुन्हा कबुल करतोस की ……

प्लीज एका पोलीसालाच थर्ड डिग्री लावण्याची वेळ आणु नकोस माझ्यावर. तुला माहिती आहे गुन्हेगारांशी बोलताना नाईकनवरे माणुस राहात नाही.”

“आयला तुला सांगतो, औध्या. नाईकनवरे सायबाला येवडा चिडलेला कंदीबी बिगिटला न्हवता म्या. लै डेंजर चिडलं हुतं ते. त्येंचा जमदग्नी झालेला बिगितला आन कदम पोपटासारका बोलाया लागला…..!

“फौजदाराची परीक्षा पास होवून चांगली खाती पिती पोस्टींग मिळण्यासाठी पंधरा लाख रुपये मोजले होते मी. सुरुवातीला मुंबईला मिळाले पोस्टींग. पण मला थांबायला वेळ नव्हता. मी पैसे कमवायला सुरुवात केली. नेमका एका मोठ्या प्रकरणात वरीष्ठांच्या नजरेत आलो आणि मोठ्यांना वाचवण्यासाठी म्हणुन मग साहजिकच माझ्यासारखी लहान मासोळी कापण्यात आली. माझी बदली मुंबईपासुन दुर या असल्या कोरड्या ठिकाणी करण्यात आली. इथे लहान सहान भुरट्या चोर्‍या, आपापसातले हेव्यादाव्यातुन होणारी क्षुल्लक भांडणे सोडली तर मेजर गुन्हे घडतच नव्हते. त्यात नाईकनवरे साहेब नको तेवढे इमानदार. कर्तव्याला देव वगैरे मानणे असल्या खुळचट कल्पना मनात बाळ्गुन बसलेले. इथे काही वरकमाईची अपेक्षा करणे अवघडच नव्हे तर मुर्खपणाचे होते. मी जवळ जवळ आशाच सोडली होती. तरी जुन्या संबंधीत वरीष्ठांशी संपर्क ठेवुन होतो, परत मुंबईला बदली करुन घेण्यासाठी प्रयत्नशील होतो. त्याच दिवसात मुंबई अंडरवर्ल्डच्या जुन्या लोकांकडून एक जण मला भेटायला आला. त्याने माझ्यापुढे एक प्रस्ताव ठेवला…..

इट वॉज अ‍ॅन टेम्प्टिंग ऑफर! माझ्यासारख्या बुद्धीमान माणसासाठी पैसे कमावण्याचा फार चांगला मार्ग होता तो. सुरुवातीला थोडी मेहनत करावी लागणार होती. पैसा ओतावा लागणार होता जो अंडरवर्ल्ड ओतणार होतं. मला फक्त कमिशन एजंट म्हणुन काम करायचं होतं. कमिशन म्हणुनच प्रचंड अगदी लक्षावधी रुपये मिळणार होते.

काम होतं साधारण दहा ते पंधराच्या वयोगटातली मुलं पळवायची. त्यातले जे हट्टेकट्टे असतील ते मुंबईमार्गे सरळ आखाती देशात पाठवले जाणार होते. उंटाच्या शर्यतींसाठी . जे धड नसतील त्यांच्या शरीरातील धड असणारे अवयव कामी येणार होते. मी डॉ. फर्नांडोच्या हॉस्पीतलमधील काही डॉक्टर्सना पैशाचा मोह दाखवुन, काहींना त्यांच्या काही विकपॉईंटसच्या जोरावर ब्लॅकमेल करुन या कामात सामील करुन घेतले. खरेतर आम्ही मुलांना, त्यांच्या आई वडीलांना मुंबईत काम मिळवून देण्याची लालच दाखवुन उचलत होतो. कामासाठी म्हणुन मुंबईत आलेली पोरं थेट आखाती देशात पाठवली जात तिथल्या उंटांच्या शर्यतींसाठी. आम्ही प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम त्या मुलांच्या घरी पाठवत असु, त्यामुळे त्या आघाडीवरही फारशी तकलीफ नव्हती. राहीलेल्या मुलांना इथेच संपवण्यात येत असे, मारण्यापुर्वी किंवा नष्ट करण्यापुर्वी त्यांच्या शरीरातील चांगल्या अवस्थेतील अवयव काढुन घेवुन ते परदेशी पाठवण्यात येत. या अवयवांना परदेशात प्रचंड मागणी असे. त्यासाठी डॉ. वर्तक आणि इतरांचा उपयोग होत होता. त्यातुनच मला डॉ. फर्नांडोंच्या नव्या शोधाची माहिती मिळाली. आणि मी त्यांना ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. पण मग माझा लोभ वाढायला लागला. आतापर्यंत आम्ही फक्त कामाचे आमिष दाखवुन मुले पळवत होतो. आता सरळ सरळ उचलायला सुरूवात केली. जर लक्षात आलेच तर ते डॉक्टरच्या माथ्यावर मारता येणार होते. कमलाबाईकडुन जेव्हा अर्जुन आणि पारुच्या समस्येबद्दल कळाले तेव्हा मी त्यांचा फायदा करुन घ्यायचे ठरवले. पुढे मागे त्यांचा व्यवस्थित वापर करुन घेता येण्यासारखा होता. मग पंचक्रोशीतलाच एक फुटकळ हातचलाखीची कामं करणारा रघ्या हाताशी धरुन मी त्या दोघांना अडकवण्याचा प्लान केला. पण ते दोघेही निसटले. सुदैवाने त्यांचा अडाणीपणा माझ्या पथ्यावर पडला. पोलीसात जायच्या ऐवजी भुताला घाबरुन ते दोघेही पारुच्या माहेरी लांब पळुन गेले.

हि सगळी रिस्क मी घेतली होती, ती डॉ. फर्नांडोंच्या गुड विलच्या जोरावर. माझे काम त्यांच्या हॉस्पीटलचा वापर करुनच व्यवस्थित चालु होते. पण डॉक्टर स्वतःच त्याच्या संशोधनात बुडालेला असल्याने त्याला इतर क्षुल्लक गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. ती जबाबदारी त्याने आपल्या विश्वासु डॉ. वर्तकवर सोपवली होती. आणि वर्तक माझा माणुस होता. डॉ. च्या देवमाणुस या किर्तीमुळे इतर कुणालाही त्यांचा किंवा त्यांच्या हॉस्पीटलचा साधा संशयही आला नाही. आमचे काम व्यवस्थीत चालु होते…..

पण पुन्हा या मुर्ख डॉक्टरलोकांचा हलगर्जीपणा गोतास काळ ठरला. हवे ते अवयव काढुन घेतल्यानंतर प्रेत पुर्णपणे नष्ट करुन टाकायचे असे स्पष्ट आदेश त्यांना दीले गेले होते. पण एक प्रेत त्यांनी तसेच जंगलात टाकुन दिले. नेमके ते पोलीस टिमच्या हाती सापडले आणि नाईकनवरे साहेबांच्या नाकापर्यंत वास गेला. मग त्यांची दिशाभूल करण्यासाठी मी अर्जुन आणि पारुचा वापर करण्याचे ठरवले. काही प्रेते मुद्दाम अशा अवस्थेत टाकुन देण्यात आली की त्यातुन नरबळीचा भास निर्माण व्हावा. मग माझ्या माणसांनी अर्जुन आणि पारुबद्दल नाईकनवरे साहेबांना बातमी मिळेल याची व्यवस्था केली. त्यानंतर मी स्वतः त्या दोघांना पकडुन नाईकनवरेंच्या स्वाधीन केले. खुन पाडणाराही मीच आणि शोध घेणाराही मीच… यामुळे मी निर्धास्त होतो. पण कुठे माशी शिंकली कोण जाणे…….!”
फौजदार कदम बोलायचे थांबले.

“पुढे मी सांगतो, कदम. तु अर्जुन आणि पारुला माझ्या स्वाधीन केलेस आणि अगदी ठासुन, तावातावाने सांगितलेस की तेच या प्रकरणाचे सुत्रधार आहेत. सुरुवातीला मी थोडा गोंधळलो होतो खरा. पण पोस्ट मार्टेमचा रिपोर्ट आला आणि बर्‍याच गोष्टी स्पष्ट होत गेल्या.

पहिली महत्त्वाची बाब उघडकीस आली ते म्हणजे प्रेताचे अतिषय कसबी कलाकाराने कागद कापावे तसे व्यवस्थितपणे, सराईतपणे तुकडे करण्यात आले होते. जे एखाद्या कुशल सर्जनलाच शक्य होते.

दुसरी गोष्ट म्हणजे सापडलेल्या प्रत्येक शवातील काही ना काही अवयव गायब होते. उदा. किडनी, डोळे……ई. विशेष म्हणजे शरीराचे तुकडे करण्यापुर्वी हे अवयव काढुन घेतल्यावर प्रेतं पुन्हा नीट शिवण्यात आली होती. ही चुक तुमची सगळ्यात मोठी चुक होती.

मग मी हात धुवुन डॉ. फर्नांडोच्या मागे लागलो. पण नंतर त्यातुन दुसरीच स्टोरी बाहेर यायला लागली. एका तपासातुन दोन गुन्हे उलगडणार होते. मी हॉस्पीटलच्या स्टाफवर नजर ठेवली. त्यातुन लक्षात आलं की त्यातले काही नामवंत डॉक्टर्स वारंवार तुझ्या संपर्कात असतात. मग मी मुंबई हेडक्वार्टर्सवरुन तुझे रेकॉर्डस मिळवले आणि तुझ्या मागे लागलो. कदम, तुला तुझा मोह नडला. निर्धास्तपणे चालु असलेलं कृष्णकृत्य सोडुन तु डॉक्टरला ब्लॅकमेल करायला लागलास. थोडा ट्रेस घेतल्यावर सगळ्या गोष्टी अगदी तुझ्यासकट माझ्या लक्षात यायला लागल्या. मग आम्ही तुझ्यावर नजर ठेवली. खरेतर त्याच वेळी तुझ्यावर हात टाकु शकलो असतो आम्ही, पण मग तुझे खरे बाप निसटले असते म्हणुन ते हराम….. हातात येइपर्यंत आम्ही कळ काढली. सगळे पुरावे आमच्या हातात आले आणि आज या सगळ्यांसमोर तु उघडा पडलास.

आय स्वेअर कदम, तुला कमीत कमी फाशी तरी होइलच याची खात्री देतो मी तुला ! एक पोलीस असुन जे कृत्य तु केले आहेस ते जनतेचा पोलीसांवरील विश्वास उडायला भाग पाडणारे आहे. तुझ्यासारखेच कायद्याचे रक्षकच जेव्हा भक्षक बनतात तेव्हा जनतेचा कायद्यावरील विश्वास उडायला वेळ लागत नाही. त्यांचा विश्वास उडु नये म्हणुन तुझ्यासारख्या नराधमांना मृत्युदंडच मिळायला हवा !

एकच शिक्षा To be hanged till death !

******************************************************************************

“तर गड्यांनो, अशी साठा उत्तराची कहानी एकदम ते काय सुफला काय म्हनत्यात तशी संपुर्न झाली बगा. चला आता भजी मागवा कुनीतरी. ”

रम्यानं परत तमाखुचा बार लावला. सगळेच सुन्न झाले होते, भजी मागवायचीही कुणाला शुद्ध राहीली नव्हती.

समाप्त.

(पुर्णपणे काल्पनिक)

 

5 responses to “भक्षक…!

 1. bhagyashree

  ऑगस्ट 19, 2010 at 4:51 pm

  khupach chan zali ahe katha!! shevat paryanat khilavun thevale!!

   
 2. विशाल कुलकर्णी

  ऑगस्ट 19, 2010 at 5:12 pm

  धन्यवाद भाग्यश्री !

   
 3. Gurunath

  ऑक्टोबर 11, 2012 at 7:05 pm

  सावरखेड एक गाव…….. पार्ट टू….. डीट्टो सेम थ्रील…… तसुभर पण फ़रक नाही………. काहीही अत्यर्क्य नाही साधा एक गुन्हा आहे हे माहिती असताना पण एक गुढ वलय पुर्ण गोष्ट वाचत असताना जाणवत राहातं…… थंडी वाजल्यासारखं….. धुकं असल्यासारखं!!!!

   
 4. Vaibhav Joshi

  जानेवारी 5, 2014 at 11:17 सकाळी

  चांगली कथा , आता मी वाचून झाली कि बृक्मार्क करून ठेवतो . म्हणजे ब्रूक मार्क ला क्लिक केले व आकडा ओल्डर पोस्ट ला क्लिक केले कि आधीची कथा लगेच समोर येते . गरज शोधाची जननी असते हि म्हण खरी आहे .

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: