RSS

॥पंचमपुराण॥

14 ऑगस्ट

pancham

आर.डी.च्या संगीताशी पहिली ओळख कधी झाली ते नक्की आठवत नाही.पण बहुतेक माझ्या पिढीच्या बर्‍याच जणांना पंचम हा प्रकार ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ नंतरच कळला.नदीम-श्रवणच्या संगीतालाच ‘मेलोडीयस’ म्हणणार्‍या आम्हा सर्वांना तो एक जोरदार झटका होता! त्यानंतर मी जो पंचमभक्त बनलो तो आजतागायत…
‘काळच्या पुढे’; ‘व्हर्सटाईल’ इ.इ.विषेशणे पंचमच्या बाबतीत एकतर अपुरी पडतात आणी ती अतिवापराने गुळगुळीत झाली आहेत.मी ते सर्व पुन्हा सांगणार नाही.त्याची गाणी ऐकता ऐकता त्यांच्या निर्मीतीचे किस्से गोळा करण्याचा,त्याच्या अफाट प्रयोगांना समजून घेण्याचा छंद लागला.हे त्यातलेच काही किस्से…
नवेनवे सांगितीक प्रयोग आणि रिदम पॅटर्न हा आरडीचाच प्रांत.एकाच वेळी भारतीय रागदारी आणि पाश्चिमात्य कॉर्ड सिस्टीमचा मिलाफ तोच करु जाणे.पहा (खरंतर ऐका!) अमरप्रेम मधलं ‘कुछ तो लोग कहेंगे’.हे गाणे खमाजच्या जवळपास जाते पण वाद्यरचना मात्र पूर्णपणे कॉर्डवर आधरित आहे.अमरप्रेममधेच आरडीने अजून एक गंमत केलीय;तोडी हा खरंतर सकाळचा राग पण त्याने त्यात ‘रैना बिती जाए’ सारखी अदभुत रचना केली.आणखी एक अजब प्रकार त्याने ‘आजा पिया तोहे प्यार दूं’ (बहारों के सपने) मधे केलाय;नीट ऐका,या गाण्यात सगळा ताल केवळ इलेक्ट्रॉनिक गिटारने सांभाळला आहे-कुठेही तबल्याचा वापरच नाही! याच सिनेमात त्याने डबल ट्रॅक रेकॉर्डींगचा वापर सर्वात पहिल्यांदा केला (क्या जानूं सजन),आणि हेच तंत्र पुन्हा अत्यंत प्रभावीपणे ‘कतरा कतरा मिलती है’ (इजाजत) मधे वापरले.
स्केल बदलाचे खेळ हे तर त्याचे वैशिष्ठ्य म्हणावे लागेल.त्याचे अत्यंत ठळक उदाहरण म्हणजे ‘कारवां’ मधले ‘ऐ मै कहाँ आ फसी’.यात अचानक शेवटी स्केल वर जाते आणी मुळातल्याच विनोदी प्रसंगात अजुन धमाल उडते.पण या प्रकारातले माझे आवडते गाणे म्हणजे ‘घर’ मधले ‘तेरे बिना जिया जाए ना’.त्यातल्या कडव्याच्या प्रत्येक ओळीत गाणे एकएक घर खाली उतरत जाते आणि शेवटच्या ओळीनंतर व्हायोलीनचा एकच तुकडा सर्व सुरावट पुन्हा मुळ स्केलवर घेऊन जातो.हे सर्व चालू असताना ‘मादल’चा संथ ठेका मात्र बदलत नाही.
मादलवरुन आठवलं,अशीच अनेक नवी वाद्ये पंचमने प्रथमच वापरात आणली.मादल हे मूळ नेपाळी वाद्य,ते त्याने त्याचा वादक रणजीत गजमेरसकट मुंबईत आणले आणि भरपूर वापरले (कांची रे कांची,ऐसे न मुझे तुम देखो,इ.इ.).इलेक्ट्रॉनिक ऑर्गनचा पहिला वापर त्यानेच ‘तिसरी मंजील’च्या ‘ओ मेरे सोना’ मधे केला.शोलेतले ‘मेहबूबा मेहबूबा’ सुरु होताना जे वाद्य आपण ऐकतो ते ‘फ्लँजर’ही पंचमचीच देणगी.पण आरडीचे ‘सिग्नेचर’ ठरलेले वाद्य अर्थातच ‘रेसो-रेसो’.त्याची निर्मीतीच त्याने केली.’मेरे सामनेवाली खिडकी में’ हे गाणं आपल्याला या वाद्याच्या आवाजापासूनच आठवते. जाताजाता सांगतो,पहिला रेसो-रेसो त्याने दुधीभोपळ्याला तारा पिळून तयार केला होता! ही तर झाली ‘कन्व्हेनशनल’ वाद्यांची हकिकत,मात्र आरडीने याही पुढे जाऊन अशक्य गोष्टी वापरुन सुरावटी तयार केल्या आहेत.’चुरा लिया है तुमने’ मधला चमचा-ग्लासचा किणकिणाट कोणाला आठवतं नाही? गुलझारच्या ‘किताब’ मधल्या ‘मास्टरजी की आयी चिठ्ठी’ या मॅड गाण्यात त्याने शाळेतली खरोखरीची बाकडी रिकॉर्डींगसाठी आणून बडवली होती.आरडीच्या पडत्या काळतले ‘बटाटावडा’ हे गाणे घ्या;रिकाम्या बाटलीवर आघात करुन ती पाण्यात बुडवल्यावर येणारा आवाज यात वापरला आहे.

आरडीची सर्वात मोठी ताकद कुठली असेल तर ती म्हणजे चित्रपटातला प्रसंग,ती सिच्युएशन ओळखून तिला,त्यातल्या पात्रांना साजेशी रचना करणे.त्याने संगीताचा वापर नेहमीच सिनेमाच्या संदृभातच केला.

‘हरे रामा हरे कृष्णा’ साठी पंचम हा देव आनंदचा पहिला चॉईस नव्हता यावर तुम्ही विश्वास ठेवाल? तो एसडीसाठी हटून बसला होता.एसडीने त्याला परोपरीने समजावले की या सिनेमाची जातकुळी पंचमच्या शैलीला साजेशी आहे,त्यालाच संगीत देऊ दे.त्यावर देवने तोड काढली की ‘वेस्टर्न’ प्रसंगाची गाणीच फक्त आरडीला मिळतील बाकी सर्व सिनेमा दादा बर्मननी करावा.त्यांनी हा प्रस्ताव नाकारला आणि अत्यंत अनिच्छेने देवने संगीत आरडीला दिले.यावरही कडी म्हणजे ‘दम मारो दम’ गाणे सिनेमात ठेवण्यास देव आनंद राजी नव्हता.त्या गाण्याच्या रेकॉर्डने ब्रिटनमधले काऊंटडाउन पादाक्रांत केल्यावर त्याचा नाईलाज झाला!! अनेक वेळा आपल्याला त्याचे गाणे त्या प्रसंगासकटच आठवते,याबाबतीत त्याच्या समोर नक्कीच एस.डीचाच आदर्श असावा.एक किस्सा सांगतो-अमरप्रेमच्या गाण्याचे सिटींग चालले होते,’एक भजन हवे आहे’;शक्ती सामंतानी पंचमला सांगितले.ते करत असतानाच एस.डी. ने त्याला हटकले-‘काय करतोयसं,अरे नुसते एक भजन केलेस तर त्यात काय विशेष? लक्षात घे सिच्युएशन भजनाची नाहिये,एक स्त्री जी कधीही आई होणार नाही आणि तरी जिच्या मनात ममता भरुन वाहतेय ती हे गाणं गाते आहे,आता पुन्हा विचार कर आणी मग दे संगीत’ आर.डी.ने सल्ला मानला आणी ‘बडा नटखट है ये’ तयार झालं.
चित्रपटात मिसळून जाणारे संगीत द्यायच्या याच ताकदीमुळे पंचमने ‘बॅकग्राऊंड म्युझिक’ तयार करतानाही अनेक माईलस्टोन्स करुन ठेवले आहेत.हिंदी चित्रपटात बॅकग्राऊंड म्युझिकचा वेगळा विचार करणारा आरडी हा पहिला संगीतकार असावा असे माझे मत आहे.त्याआधी बर्याच वेळी केवळ ‘स्टॉक’ तुकडे वापरले जात,मारामारी आली वाजवा व्हायोलिन;दु:खी प्रसंग आहे लावा सारंगी इ.इ.अगदी मुगल-ए-आझम वा मदर इंडीया सारख्या क्लासिक्समधेही हाच प्रकार दिसतो.मात्र प्रत्येक सिनेमाचा बाज,त्यातल्या पात्र व प्रसंगांचा विचार करुन त्याची वेगळी ओळख,थीम तयार करणारे पार्श्वसंगीत पंचमनेच रुजवले.’तिसरी मंझील’ मधला शम्मीला प्रेमनाथच खुनी आहे हे कळते तो सीन आठवा- शम्मीचे विस्फारलेले डोळे,कोटाचा क्लोजअप आणि जोडीला ट्रंपेट्सचा किंचाळणारा आवाज;त्या आवाजासकटच तो प्रसंग आठवतो.
sholay02
आणि अर्थातच-शोले.याततर आरडीची प्रतिभा पुर्ण भरात आहे;किती प्रसंग सांगावेत की जे त्या पार्श्वसंगीताने अजरामर करुन ठेवले आहेत वेस्टर्नपटांच्या जगात तात्काळ घेऊन जाणारा तो टायटल ट्रॅक,गब्बरच्या एंट्री सीनमधे चिरकणारी बासरी (जी आरडीने त्या प्रसंगासाठी विशेष बनवून घेतली),माउथ ऑर्गनची ती अजरामर धुन आणी जय-राधाची प्रेमकथा,गब्बर जेंव्हा ठाकूरच्या कुटूंबाला संपवतो तेंव्हाचा झोपाळ्याच्या कड्यांचा करकराट,आणि अर्थातच शांततेचा-सायलेन्सचा अंगावर येणारा वापर;पार्श्वसंगीताचे पाठ्यपुस्तक आहे हा चित्रपट.
आरडीच्या प्रतिभेची ही काही रुपे.जसेजसे आपण त्याचे संगीत ऐकत जातो तसेतसे त्याच्या नव्यानव्या आविष्कारांची ओळख होत जाते. अजून खुप मनात आहे -त्याच्या स्वतःच्या गायनाबद्दल,त्याच्या सहकारी वादक,गायकांबद्दल,ऑर्केस्ट्रेशनबद्दल आणि अर्थातच गुलजार-पंचम या जादूबद्दल,पण ते पुन्हा केंव्हातरी,पंचमपुराणाच्या पुढच्या अध्यायात.

एका दुर्मीळ प्रसंगी स्व. पंचम, स्व. किशोरदा, आ. लतादीदी आणि आ. आशाजी…

post4201097250375

aagauu | 10 जानेवारी, 2009 – 12:08 : Satyajeet

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: