वेताळ: राजा, तुझ्या निर्लज्जपणाची देखिल कमाल आहे हा, कितीदा हाकलला तरी कोडग्यासारखा पुन्हा – पुन्हा येतोसच काम मागायला.
विक्रम: भो वेताळा, रात्री वाईट आल्या आहेत बाबा, मोठ्या मोठ्यांची तंतरलीय. मी तर सामान्य निशाचर, पाठीवर पोट बाबा माझ्यासारख्याचं. म्हणजे तु पाठीवर आहेस तोवर तुझे प्रश्न आहेत. तुझे प्रश्न आहेत तोवर त्यावर पुस्तके लिहीली जातील…रॉयल्टी मिळते रे मला !
वेताळ: हा..हा..हा…! फ़ार जोरात नाही ना रे हसलो. कालच माझी सासु जिवंत झाली म्हणुन म्हटलं. नाहीतर वेताळीण बाई म्हणणार,” बघा माझी गरीब, बिचारी (?) आई जिवंत झाली आणि हे हसताहेत. जेवायला मिळणार नाही बाबा आठवडाभर. आधीच या कॉस्ट कटिंगने हैराण केलंय.
विक्रम: वेताळा, तुला काय रे कॉस्ट कटींगचं.
वेताळा: बा विक्रमा, कालच ‘कारणे दाखवा’ नोटीस दिलीय, यमाने,
विक्रम: “गेल्या कित्येक वर्षात देखील तुम्ही विक्रमाला पटवु (का कटवु ?) शकलेले नाही आहात, बरोबर…!
वेताळ: अगदी बरोबर, त्यामुळे यमपुरी इनकॉर्पोरेशनमधली एक जागा विनाकारण गुंतुन राहिलेली आहे. तुमच्या अकार्यक्षमतेबद्दल तुम्हाला घरी बसवुन तुमच्या जागी ब्रम्हसमंधाची नेमणुक का करु नये?”
विक्रम: म्हणुनच म्हणलं वेताळा, रात्री वाईट आल्या आहेत.
वेताळ: अरे बाबा, पण तुला सांगायला आज माझ्याकडे गोष्ट नाहीये रे ! अलिकडे वाचन खुप कमी झालंय बाबा. वय झालं आता. डोळ्यालाही कमी दिसतं आजकाल.
विक्रम: अरे वा, बरा सापडलास. नेहेमी मला त्याच त्या जुन्या , रटाळ कथा ऐकवुन बोअर करतोस. भोग आपल्या कर्माची फळं. आज मी तुला नव्या युगातल्या, नव्या भारताची, नवी गोष्ट सांगतो.
वेताळ: बोल बाबा, हर कुत्तेकी रात आती है…..!
विक्रम : तर ऐक वेताळा, एकविसाव्या शतकात, इंडिया नामक देशी, मुंबई नामे एक शहर होते. देशाची आर्थिक राजधानी म्हणुन ओळखले जाणारे मुंबई शहर खुपच समृद्ध असे.
वेताळ: म्हणजे इंडियाच्या बगलेत राहणारा पाकिस्तान नामे नापाक शेजारी नेहेमीच काही ना काही नापाक कृत्ये करुन इंडीयाला त्रास देत असेल.
विक्रम: हे बघ, वेताळा, तु जर असा मध्ये मध्ये बोलणार असशील तर …
वेताळ: विक्रमा टँप्लीज हा… पन आधीच सांगतो मी गोष्ट सांगताना तुला मौनाची अट असते, ती मला लागु होत नाही ,म्हणजे मी मध्ये मध्ये पचकणार हे नक्की !
विक्रम: ठिक आहे बाबा, तुम्ही काय आकाशातल्या, म्हणजे यमपुरीतल्या बापाचे. तुम्हाला कोण अडवणार. तर मी काय सांगत होतो. इंडियाच्या नापाक शेजार्याने या वेळेस मुंबईवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले. ठरवल्याप्रमाणे त्याने काही भाड्याचे …..
वेताळ: म्हणजे तुझे.. ….
विक्रम: म्हणजे पैसे देवुन ठरवलेले…तुझ्या आकाशातल्या बापाचे नव्हे, सशस्त्र मारेकरी मुंबईवर आक्रमण करण्यासाठी पाठवले. त्या नराधमांनी मुंबईनगरीत पाशवी हिंसाचार मांडला.
वेताळ: हे म्हणजे तु माझ्या झोपेच्या वेळेवर हल्ला करुन माझ्या स्वप्नांची धुळधाण करतोस तसं झालं…
विक्रम: वेताळा, थोडा गंभीर होशील का, पुढे ऐक… तर या भाडोत्री मारेकर्यांनी मुंबईनगरीवर पाशवी हल्ला चढवला. इथे वेताळी हल्ला असे म्हटले तर तुझ्या भावना दुखावतील का ?
वेताळ: ऑफ़ कोर्स, मग मी आमच्या समाजाच्या वतीने त्याच्या विरोधात असेंब्लीत एक निषेधपत्र देइन. अल्पसंख्यांक म्हणुन माझ्यावर हा अन्याय होतोय असे प्रतिपादन करीन.
विक्रम: मग काही हरकत नाही. अरे , आपल्या निषेधपत्रांना ते नापाक राष्ट्र देखिल भिक घालत नाही, आपली असेंब्ली तर सोडुनच दे. तर या हल्ल्याच्या निषेधार्थ …..
वेताळ: निषेधपत्रके पाठवुन थकलेल्या इंडिया देशीच्या राजाने युद्धाचा निर्णय घेतला. आणी हि दोन्ही राष्ट्रे अण्वस्त्रधारी असल्याने त्यांनी एकमेकावर अण्वस्त्रवर्षाव करण्याचा निर्णय घेतला.असंच ना ?
विक्रम: तुला सगळं माहीत असतं, पण मध्ये मध्ये पचकायलाच हवं का ? इंडिया नामक राष्ट्राच्या राजाने ही सुचना आपल्या अष्टप्रधान मंडळास देताच त्यांनी अण्वस्त्रहल्ला करणे योग्य ठरेल कि नाही यावर विचार करण्यासाठी अतिशीघ्र एक समितीची स्थापना केली. या समितीने फ़क्त एका महिन्यात सर्व शक्यतांवर विचार करुन आपला निर्णय घ्यावा असा ठराव मांडण्यात आला.
वेताळ: फ़क्त एक महिना ? हा अन्याय आहे. निदान ही समिती व्यवस्थित काम करते कि नाही हे पाहण्यासाठी आणखी एक त्रिसदस्यीय समिती नेमायला हवी. या दोन्ही समितीच्या सभासदांना विचार करणे आणि लक्ष ठेवणे सुलभ जावे यासाठी कुठल्या तरी थंड हवेच्या ठिकाणी पाठवायला हवे.
विक्रम: अगदी तसेच झाले, आणि दोहोंनाही स्वित्झर्लँड या तटस्थ राष्ट्राच्या दौर्यावर पाठवण्यात आले.
वेताळ: दरम्यान सदैव घाई असलेल्या नापाक राष्ट्राने लगेचच आपली अण्वस्त्रे सज्ज करुन हल्ला करण्याचा आदेश लागु केला असेल….
विक्रम: गप्प बसुन ऐकायला काय घेशील, वेताळा, असो तुझा अंदाज अगदी बरोबर आहे, पण प्रत्यक्ष कार्यवाहीच्या वेळी अण्वस्त्र कार्यक्रम अजुन अर्धवट अवस्थेत असल्याचे लक्षात आल्याने त्यांना हल्ल्याची तारिख पुढे ढकलावी लागली.
वेताळ: इकडे भारतियांची समिती बर्फाचे गोळे एकमेकावर फेकण्यात मग्न असेल, नाहीतरी इथेही असेंब्लीत हेच चालु असतं त्यांचं.
विक्रम: पुढे ऐक, दरम्यान परदेशी दौर्यावर गेलेल्या इंडियाच्या समितीने आपला अहवाल ७ : ३ अशा प्रमाणात सरकारला सादर केला.
वेताळ: या पैकी ७ सदस्य हे सत्ताधारी पक्षाचे पक्षपाती असल्याचा आरोप करुन विरोधी पक्षाने सभात्याग केला असेल.
विक्रम: वेताळा, तुझं कोणी आय.एस.आय. मध्ये आहे काय रे? नाही….आपल्या बातम्या सी.बी.आय. किंवा रॉ च्या आधी आय. एस. आय. ला मिळतात म्हणुन म्हटलं. असो, पण ते सत्य आहे, म्हणुनच अण्वस्त्रासंबंधीचा निर्णय घेण्यासाठी नवीन पुर्णपणे निरपेक्ष अशी द्वि-सदस्यीय समिती नेमण्यात आली. या समितीवर १५ दिबसात आपला निर्णय देण्याची सक्ती करुन त्या दिवशीची सभा बरखास्त करण्यात आली.
दरम्यान…..
वेताळ: अरे राजा, थोडा श्वास घेशील की नाही. नाहीतर तुला इथेच टाकुन मी सभात्याग करेन.
विक्रम: लिंक तोडु नकोस वेताळा, नाहीतर मला पुढची कथा आठवणार नाही.
वेताळ: काळजी करु नको,आपल्या श्रीरंग गोडबोलेंना फोन कर, त्यांना विक्रम वेताळाच्या गोष्टी माहीत आहेत सगळ्या.
विक्रम: मी बोलु आता ?… तर दरम्यान शेजारी नापाक राष्ट्राने आपला अण्वस्त्रकार्यक्रम अद्ययावत करुन अण्वस्त्रहल्ल्याचे शिंग फुंकले. पण तंत्रज्ञान कमी पडल्याने त्यांची काही अण्वस्त्रे उडालीच नाहीत.
वेताळ: आणि जी उडाली त्यांचा नेम चुकुन ती लक्ष्यापासुन बर्याच अंतरावर पडली. तेव्हा अजुन सुधारणा करण्याची तंबी देवुन हल्ला पुढे ढकलण्यात आला.काय, वळिकला का नाय ?
विक्रम: अगदी बरोबर आणि इथे इंडियातील नव्या समितीने आपला अहवाल सादर केला. पण यावेळी मानवाधिकार समितीने या प्रस्तावाला विरोध दर्शवल्याने हा अहवालही बासनात गुंडाळण्यात आला व या विषयावर तोडगा काढण्यासाठी एक सर्वपक्षीय समिती नेमण्यात आली.
वेताळ: या समितीचे सदस्य कुठे दक्षीण धृवावर पाठवले काय ?
विक्रम: या समितीतील सदस्य या विषयावर तोडगा काढण्यासाठी लगेचच हॉलंड या दुसर्या एका तटस्थ राष्ट्रातील अज्ञात ठिकाणी रवाना झाले.दरम्यान शेजारी नापाक राष्ट्राने आपली अण्वस्त्रे सज्ज करुन पहिला हल्ला इंडियावर केला.
वेताळ: पण मुळातच त्यांच्या देशात ज्ञान आणि बुद्धीमत्तेची वानवा असल्याने आणि तंत्रज्ञान कमजोर असल्याने त्यांचा नेम पुन्हा चुकला. शेवटी या नापाक राष्ट्राच्या राजाने राजसंन्यास घेवुन वानप्रस्थाश्रम स्विकारला, आता बोल ?
विक्रम: वेताळा, आता तर मला शंका येवु लागलीय, तु नक्कीच आय.एस.आय. ला मिळालेला आहेस. असो इकडे इंडियाच्या समितीलाही योग्य निर्णय न घेता आल्याने त्यांनी अण्वस्त्रयुद्धाचा निर्णय रहित केला.
वेताळ: हुम्म्म…..रोचक आहे कथा, बोल राजा पुढे बोल.
विक्रम: कथा संपली वेताळा…आता मला सांग…नापाक राष्ट्राच्या राजाने संन्यास का घेतला ? शेजारी राष्ट्राने आपला अण्वस्त्र कार्यक्रम सुधारण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? इंडियातील समितीने आपला निर्णय सरकारदरबारी सर्वानुमते मान्य करुन घेण्यासाठी काय करावे? हे वेताळा, या सर्व प्रश्नांची जर तु योग्य आणि शीघ्र उत्तरे दिली नाहीस तर तु या कामास अयोग्य आहे असे प्रतिपादन करुन मी यमपुरी इनकॉर्पोरेशन मध्ये वेताळाच्या नौकरीसाठी अर्ज करीन.
वेताळ: हे विक्रमा, साहजिक आहेय..आम्ही एवढे अपयशी हल्ले करतो आहोत तरी समोरचा प्रतिकार करत नाही म्हणल्यावर त्या राजाला विरक्ती येणे साहजिकच आहे. तंत्रज्ञान सुधारण्याची काय गरज, ते तंत्रज्ञान दुसर्या एखाद्या चोर राष्ट्रांकडुन तस्करी करुन आयात करता येइल. आणि तुझ्या तिसर्या प्रश्नांचे उत्तर देण्यापेक्षा मी सरळ इंडिया या देशात अण्वस्त्रविषयक सल्लागार म्हणुन नौकरीसाठी अर्ज का करु नये. प्रश्नांची उत्तरे मला विचारण्यापेक्षा तु थेट माझ्या जागी नोकरीवर रुजु होवुन टाक म्हणजे मी तिकडे नोकरीसाठी अर्ज करायला मोकळा. माझा कॉस्ट कटिंगचा प्रॉब्लेम सोडवल्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद !!!
(त.टी. : २६ नोव्हें. २००८ च्या घटनेनंतर एक मेल आली होती मला. तिचा आधार घेवुन हे छोटंसं स्किट लिहीलय.)
विशाल कुलकर्णी.