RSS

“बोलावणे आले की …..!”

11 ऑगस्ट

bolavane_ale_ke-vishal

सगळ्याच घटना कशा झटपट घडत गेल्या. दोन आठवड्यापुर्वी सुशिक्षीत बेकार असलेला सन्मित्र भार्गव आज मात्र एका दोनशे एकर पसरलेल्या फार्म हाऊसचा मॅनेजर होता. महिना चक्क आठ हजार रुपये पगार मान्य केला होता माणिकरावांनी.गंमतच आहे नाही.

दोन आठवड्यापुर्वी असाच सकाळी (?) ११-११.३० च्या दरम्यान स्थानिक वर्तमानपत्रे चाळत असताना (सार्वजनिक मोफत वाचनालयात- वर्तमानपत्रे विकत घेवुन वाचण्याची ऐपतच नव्हती म्हणा) मधल्या पानावरची ती जाहिरात वाचण्यात आली. खरेतर ती जाहिरात दोन तीन दिवस रोज येत होती. मी वाचलीही होती पण का कोण जाणे दुर्लक्षच केले होते मी तिकडे.

पाहिजे : फार्म मॅनेजर.
फार्महाऊसच्या देखरेखीसाठी विनापाश, अविवाहित सुशिक्षीत तरुण हवा आहे.
राहणे, खाणे व सर्व सोयी पुरवल्या जातील.
पगार व इतर गोष्टी मुलाखतीदरम्यान ठरवल्या जातील.
भेटा: श्री. माणिकराव जामदग्नि, हॉटेल सर्वोदय, रुम नं. १३,
खाली एक फोन नंबर दिला होता. त्या नंबरवर संपर्क साधण्यास सांगण्यात आले होते. एक गंमत म्हणुन मी फोन केला. कोणीतरी खांडेकर म्हणुन गृहस्थ होते त्यांच्याशी बोललो. त्यांनी मागितला म्हणुन आमच्या घरमालकिणीचा नंबर दिला आणि विसरुन गेलो.

आणि चार पाच दिवसांनी असाच दिवसभर उंडगुन रुमवर पोहोचलो. खरेतर मी रात्री ११ च्या आधी कधीच घरी येत नाही. घरमालकिणीचा भाड्याचा तगादा चुकवायचा असतो ना ! स्मित सकाळी सात – साडे सातच्या दरम्यान गपचुप पळ काढायचा आणि रात्री उशीरा सगळे झोपल्यावर हळुच परत यायचं. तसाच आजही आलो तर चंद्या बाहेरच्या पडवीत अभ्यास करत बसला होता. चंद्या म्हणजे आमच्या घरमालकाचं एकुलते एक चिरंजीव. हा पोरगा गेले तीन वर्षे बारावीची परिक्षा देतोय. आजकाल रोज रात्री बाहेर अभ्यास करत बसतो..आई-बाप खुष. बापड्यांना कुठे माहितीये, आपले चिरंजीव रात्र रात्र जागुन कुठला अभ्यास करतात ते. खोटं कशाला बोलु मीच त्याला दर आठवड्याला आशक्याच्या दुकानातुन पिवळ्या कव्हरची पुस्तके आणुन द्यायचो. वाचुन झाली की पठ्ठ्या इमानदारीत परत करायचा, ती परत देवुन दुसरी आणुन द्यायची. त्या बदल्यात दररोज रात्री तो माझ्यासाठी घराचा मुख्य दरवाजा उघडुन द्यायचा.

तर त्या दिवशी परत आलो तेव्हा चंद्या बसलाच होता अभ्यास (?) करत. मला बघताच म्हणाला,” सन्म्या, तो कोण खांडेकर तुझ्यासाठी पेटलाय बघ फोनवर. सकाळपासुन चारवेळा फोन आलाय त्याचा. आईसाहेब तर सॉलीड पेटल्या आहेत. उद्या पुन्हा फुलं पडणार तुमच्यावर !

मी कशाला थांबतो घरात? सकाळी ६ वाजताच गुल झालो. ९.३० च्या दरम्यान पुन्हा खांडेकरला फोन केला. तर घरमालकिणीची कसर त्या भ@#ने भरुन काढली. माझ्या आणि मालकिणबाईच्या दोघांच्या नावाने मनापासुन शंख करुन झाल्यावर मग मुद्दलाची गोष्ट सांगितली.”हे बघा उद्या माणिकराव शहरात येणार आहेत, त्यांना तुम्हाला भेटायचे आहे. सकाळी दहा वाजता सर्वोदयला हजर राहा.”

माणिकरावांना भेटलो आणि मग नशीबाची चाकं अशी काय फिरली की यंव रे यंव !
माणुस तस्सा बरा वाटला. (बरा नसता तरी मी बराच म्हणलं असतं त्याला. दणक्यात आठ हजाराची नोकरी देणारा माणुस वाईट असेलच कसा?) माणिकराव साधारण साठीचे असावेत. धोतर, सदरा, कोट आणि टोपी असा साधाच पोषाख होता. पण कपडा मात्र उंची असावा. बोलायलाही एकदम फटकळ पण मिठ्ठास वाटला म्हातारा. काही गोष्टी मात्र खटकल्या मला. उदा. माझी पगाराची अट, राहण्याची सोय सगळं काही लगेच मान्य केलं त्याने. रजा मात्र पहिल्या वर्षात अजीबात मिळणार नाही म्हणाला. प्रश्न एकच होता…त्या खेड्यात वेळ कसा काढायचा? बघु पैसा महत्वाचा शेवटी.

अरे हो, खेड्यावरुन आठवलं, मुळ गोष्ट सांगायची राहुनच गेली. प्रतापनगरमध्ये माणिकरावांची २०० एकर बागाईत होती. एक जुना चिरेबंदी वाडा होता रानातच. मला त्या वाड्यावरच राहावं लागणार होतं. माणिकरावांना मुलबाळ काही नाही. जे नातेवाईक होते ते त्यांच्या जाण्याची वाट बघत होते. त्यांची पत्नी आजाराने अंथरुणाला खिळलेली. त्यामुळे त्यांना शेताकडे लक्ष देणे व्हायचे नाही. म्हणुन त्यांना शेती व वाड्यासाठी एक केअर टेकर हवा होता. अर्थात त्याने वाड्यावरच राहायला हवे ही त्यांची रास्त अट होती. इव्हन मला सकाळ , संध्याकाळ चहा, नाश्ता, दोन्ही वेळचं जेवण यासाठी एक नोकरपण पुरवण्याचे मान्य केले त्यांनी. त्यांच्या खर्चाने. म्हणजे महिना ८०००/- शिल्लक. क्या बात है, सन्मित्रशेठ, लॉटरीच लागली की तुमची?

तरीसुद्धा मी कोडगेपणा करुन एका महिन्याचा पगार आगाऊ मागितला तर म्हातार्‍याने थेट हातातच ठेवले पैसे. आतापर्यंत मी आपला मजेमजेत घेत होतो सगळं. पण आता मात्र नाही म्हणायला तोंडच उरलं नाही. दोन तीन दिवसात येतो असं सांगुन तिथुन निघालो. थेट रुमवर आलो. आल्या आल्या तुंबलेलं भाडं देवुन टाकलं. तरी सुद्धा ३-४ हजार शिल्लक होते खिशात. मग काही नवीन कपडे, एक बॆग, काही इतर रोजच्या वापरातल्या सटरफटर गोष्टी विकत घेतल्या. सगळ्या मित्रांना (माझ्या सारख्या कंगाल माणसाचे असे किती मित्र असणार म्हणा) भेटुन घेतलं. निघताना इमानदारीत चंद्याला सल्लाही दिला,” बाबारे बास झालं आता, सुधरा थोडं, अभ्यास करा आता.” खो खो

सरळ एस. टी. स्टॆंडवर आलो आणि कोल्हापुरकडे जाणारी एस. टी. पकडली. मधेच कुठल्यातरी पळसेफाट्यापासुन प्रतापनगरला जाण्याचा रस्ता फुटत होता. त्या फाट्यावर मला घ्यायला माणिकरावांची गाडी येणार होती. पळसेफाट्यावर उतरलो तर एक जिपडं वाटच बघत होतं. गावात पोहोचेपर्यंत बर्‍यापैकी रात्र झाली होती. त्या रात्री माणिकरावांच्या गावातल्या घरातच राहीलो. सकाळी उठल्यावर चहा वगैरे घेवुन माणिकरावांची भेट घेतली आणि गाव बघायला म्हणुन बाहेर पडलो. तसं छोटंसंच पण टुमदार होतं गाव. शंभर एक घरं असतील फार तर. पश्चीम महाराष्ट्रातील कुठल्याही टिपिकल खेड्याप्रमाणेच गाव होता. छोटीशी वेस, वेशीपाशीच मारुतीच मंदिर होतं. तिथुन थोडंसं पुढे आलं की चावडी होती. चावडीपाशीच पाण्याची एक मोठी विहीर होती. ती विहीर मात्र मला आवडली. विहीरीवर सगळे मिळुन एकुण आठ रहाट होते आणि विशेष म्हणजे विहीर पाण्याने गच्च भरलेली होती. क्षणभर मोह झाला की कपडे काढावे आणि मारावा सुर. पण आजुबाजुला पाणी भरणार्‍या, धुणी-भांडी करणार्‍या बायका बघितल्या आणि विचार कॅन्सल केला. अर्ध्या तासात सगळा गाव फिरुन मारुतीच्या मंदिरात येवुन विसावलो. दर्शन घेतलं आणि टेकलो थोडावेळ .
“घ्या प्रसाद घ्या”, कानावर एक स्नेहाळ आवाज आला तसा चमकुन वर बघीतलं तर समोर प्रसन्न चेहेर्‍याने हसत पुजारी उभे. मीही हसुन नमस्कार केला आणि प्रसाद घेतला.

“मी दिगंबर पाठक, मारुतीरायाचा पुजारी. गावात सगळे गाव मला आप्पाच म्हणतात. तुम्ही कुठले म्हणायचे पाहुणे? नवीन दिसताय म्हणुन विचारलं , राग मानु नका.”

“मी सन्मित्र, सन्मित्र भार्गव, कराडहुन आलोय. माणिकराव जामदग्निंचा नवीन फार्म मॆनेजर म्हणुन. तसा मी त्यांच्या रानातल्या वाड्यातच राहणार आहे आजपासुन.”

आप्पा एकदम दचकले. “काय..? माणिकरावांना वेड लागलय की काय? परत जा पोरा, आल्या पावली परत जा! काही खरं नाही, त्या वाड्याचं काही खरं नाही,” आप्पा स्वत:शीच बडबडत निघुन गेले.

मी त्यांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहतच राहीलो. पाच साडे पाच फुट उंची पण शरीर मात्र कमावलेलं व्यायामाचं होतं. याला काय झालं एकदम. मनात विचार आला तेवढ्यात….

“चला, शेवटी म्हातार्‍याला बकरा सापडला तर.”

मी चमकुन मागे बघितले, चावडीवर कुटाळक्या करत बसलेली पोरं माझ्याकडेच बघत होती. पण त्यांचं बोलणं ऐकल्यावर त्यांच्या चेहेर्‍यावर जे भाव मला अपेक्षित होते ते मात्र नव्हते, खरं तर ती पोरं खुपच गंभीर वाटत होती.

“पावणं, कराडहुन आला जणु …..? आत्महत्याच करायची होती तर कराडात काय कमी जागा होती काय? निदान बॉडी तरी सापडली असती..!!!

मी दचकलोच, उठुन त्यांच्या जवळ गेलो,” नमस्कार मी सन्मित्र भार्गव ! तुम्ही काय म्हणालात, जरा पुन्हा एकदा सांगाल का ? मघाशी ते आप्पाजी पण असंच काहीतरी असंबद्ध बोलुन निघुन गेले. मी इथे आत्महत्या करायला आलोय असं का वाटतंय तुम्हाला ?

“माफी करा देवा, आमी आपले मजाक करत होतो. च्यायला माणक्याशी कुणी वैर घा.” भराभर सगळे उठुन गेले. मी माणिकरावांच्या घरी परतलो.

आल्या आल्या त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. तसे माणिकराव सटपटले, पण लगेचच त्यांनी सावरुन घेतले.
“काही नाही हो, तुम्ही नका लक्ष देवु त्यांच्याकडे. अहो एवढी मोठी शेती, आता पर्यंत कोणी बघणारं नव्हतं त्यामुळे या लोकांना छोट्या मोठ्या चोर्‍या करता यायच्या. आता ते बंद होईल ना. या लोकांना स्वत:ला कष्ट करायला नको आणि दुसर्याला करु द्यायला नको.”

“पण ते आप्पाजी त्यातले नाही वाटले मला, भला माणुस वाटला तो तर.” मी माझी शंका सांगितली.

“माणुस भलाच आहे हो, पण आला होता गेल्याच महिन्यात माझ्याकडे, त्याच्या मुलाला वाड्याच्या आणि शेताच्या देखरेखीसाठी थेवुन घ्या म्हणुन. मी त्या बेवड्याला काम द्यायचे नाकारले म्हणुन तो आप्पाजी चिडुन आहे माझ्यावर झाले. बोलता बोलता आम्ही आतल्या खोलीत आलो. मला अचानक गुदमरल्यासारखं झालं. श्वास कोंडल्यावर कसं बेचैन व्हायला होतं ना तसं.

“सन्मित्र, तुम्ही साशंक असाल तर अजुनही नकार देवु शकता. तुम्हाला दिलेले पैसे मी परत मागणार नाही.” माणिकराव थोडेसे अस्वस्थ वाटले मला.

“नाही, नाही मी राहीन. एवढ्या हलक्या कानाचा निश्चितच नाहीय मी. तुम्ही बिनघोर राहा. एकदा तुमचे पैसे घेतलेत म्हणल्यावर काम नाकारण्याचा प्रश्नच येत नाही आणि एवढे चांगले काम कोणी का म्हणुन सोडावं?” माझ्यापुढे दुसरा पर्यायच नव्हता.
मनात अजुनही थोडी साशंकता होती. दोनशे एकराच्या शेतीवर मी एकटा कसा काय लक्ष ठेवु शकणार होतो. पण…..

दुपारी चारच्या दरम्यान मी रानाकडे जायला निघालो. माणिकराव दुसर्‍या दिवशी सकाळी येवुन पुर्ण मळा दाखवणार होते. एक गडी बरोबर घेवुन मी वाड्यावर पोहोचलो. वाडा कसला गढीच होती ती. पुर्णपणे दगडांनी बांधलेली. गड्याने ते एखाद्या किल्ल्याच्या दिंडी दरवाज्याप्रमाणे दिसणारे दार उघडले आणि …..

भर्रकन एक पाखरु उडाले. “पारवा होता काय रे तो.” मी उगाचच अक्कल पाजळली.

तर त्या गड्याने असं काही पाहीलं माझ्याकडे की मी समजुन गेलोय लोचा झालाय काही तरी.
“न्हाय दादा, वाघुळ होतं पगा !”

आत शिरल्यावर दाराच्या दोन्ही बाजुला छान पडव्या होत्या. त्या संपल्या की जुन्या वाड्यात असतं तसं मधोमध बरंच मोठं मोकळं अंगण. वाडा की गढी दुमजली होती. सगळीकडे स्वच्छ झाडुन घेतलेलं होतं.पण काहीतरी खटकलं मला. काय ते नाही लक्षात आलं पण काहीतरी कमी होतं तिथे. आणि का कुणास ठाऊक, एक विचित्र शांतता पसरलेली होती. एक कसलातरी दुर्गंध म्हणता येइल असा वास आसमंतात भरुन राहीला होता. गड्याला विचारलं तर म्हणाला, मागच्या वावारात कायतरी जनावर मरुन पडलं असंल.म्या घेतो की साफसुफ करुन उद्याच्याला.”

त्याने एका खोलीत माझं सामान टाकलं. खोली तशी प्रशस्त, स्वच्छ होती. एक कॊट, एक टेबल, अलमारी , दोन खुर्च्या असं आवश्यक ते सर्व सामान होतं. एक गोष्ट मला खटकली की खोलीला खिडकी मात्र नव्हती.
तुक्याला, म्हणजे गड्याला विचारलं तर तो म्हणाला,” दादा हितं कंच्याबी खोलीला खिडकी न्हाई! आता मी येतो दादा, रातच्याला जेवान घेवुन यीन. ”

“इथं मुक्कामाला कोणकोण असतं.” मी इतक्या वेळ मनात घोळणारा प्रश्न विचारला.तसा तुक्या दचकला इतका वेळ मनोमन टाळलेला प्रश्न आल्यासारखा.

“न्हाय दादा, रातच्याला आमी कुणी बी हितं र्‍हात न्हाय. दादा, तुमालाबी सांगतु शानं असाल तर अजुनबी निगुन जा परत. आन हितल्या कुटल्या बी चीज वस्तुला हात नगा लावु. ”

“का रे बाबा?” हे मात्र मला एकदम अनपेक्षित होतं.

एकदम काहीतरी आठवल्यासारखा तो घाबरला. इकडं तिकडं बघत, स्वत:च्याच थोबाडीत मारत म्हणाला,” चुकी झाली, मालक. पुन्यांचान नाय व्हनार. एकडाव माफी करा. मी येतो दादा, सांजच्याला यीन जेवान घेवुन. दार लावुन घ्या तेवडं.”

दार लावताना मला प्रथमच जाणवलं. बाहेर सुसाट वारा सुटला होता. वाड्याच्या मधल्या भागात मात्र वर मोकळच होतं तरी आत निरव शांतता होती. पानही हालत नव्हतं. पान…आत्ता लक्षात आलं, इथे झाड काय झुडुपसुद्धा नव्हतं एकही, पान कुठुन येइल.

आणि प्रथमच माझ्या लक्षात आलं आल्या आल्या काय खटकलं होतं ते.

जुन्या वाड्यांमधुन हटकुन आढळणारं तुळशी वृंदावन इथे कुठेच दिसत नव्हतं.

आता मात्र मला थोडंसं अस्वस्थ वाटायला लागलं होतं. अर्थात मी देवभोळा नाहीये. कदाचित लहानपणापासुन लादले गेलेले अनाथपण, जगण्यासाठी खावे लागलेले टक्केटोणपे यामुळे एकप्रकारचा बोथटपणा, बधीरता आलेली होती मनाला. पण तरीही मनात कुठेतरी अका अनामिक भीतीचा जन्म झाला होता. भुताखेतावर विश्वास नाहीये माझा, पण ती नसतातच असे ठामपणे नाही सांगु शकणार मी. म्हणजे कसय बघा, प्रकाश आहे तिथे अंधार आहे, खरेपणा आहे तिथे खोटेपणा आहे…तसंच जर देव असेल तर…….! नाही तर समतोल कसा साधणार निसर्गाचा. भुतखेतं नसतील कदाचित पण जशी सुष्ट शक्ती आहे तशा काही दुष्ट शक्तीही असण्याची शक्यता काही नाकारता येत नाही. कदाचित म्हणुनच तुक्याने सांगितल्याप्रमाणे मी अजुन कुठल्याही वस्तुला अगदीच अपरिहार्य असल्याखेरिज स्पर्ष केला नव्हता. घड्याळात बघितलं तर पाच वाजुन गेले होते. बाहेर पुरेसा उजेड होता. मी वाडा बघुन घ्यायचे ठरवले.

वर सांगितल्याप्रमाणे वाडा दुमजली होता. म्हणजे तळमजला आणि वरची एक माडी. याला एकमजली पण म्हणता येइल का? असो. तळमजल्यावर समोरच मध्यभागी एक मोठा हॉल व त्याच्या दोन्ही बाजुला दोन दोन अशा चार खोल्या होत्या. मी हॉलमध्ये शिरलो आधी दिवे चालु केले. सुदैवाने माणिकरावांनी इथपर्यंत वीज आणलेली होती. दिवे लावल्यावर लक्षात आला तो हॉलचा भव्य आकार. उजव्या बाजुला एक जुना लोखंडी साखळ्यांनी अडकवलेला सुरेख झोपाळा होता. छान पैकी काळ्याभोर शिसवी लाकडाची बैठक होती. क्षणभर मोह झाला बसण्याचा, पण वाडा पुर्ण बघायचा होता आणि इथेच राहायचे आहे आता पुन्हा बसु, असा विचार करुन हॉलचे निरिक्षण करायला सुरुवात केली. चारी भिंती व्यवस्थित रंगवलेल्या होत्या पण पांढरा रंग त्या उदास वातावरणात अजुनच भर घालत होता. एका भिंतीवर फ़क्त एक फोटो होता. झोपाळ्यावर बसलेला एक रुबाबदार पुरुष आणि मागे उभी त्याला साजेशी त्याची पत्नी. माणिकरावांशी मात्र त्यांचे काहीच साम्य नव्हते. असेल कोणीतरी. अचानक लक्षात आले की हॉलला आणखी एक दार आहे आत डोकावुन पाहीले तेव्हा कळाले की तिथे अजुन एक खुपच रुंद अशी खोली होती. बहुदा माजघर म्हणतात तशी. तीचा उपयोग कधी काळी सामान कोठीसारखा केला जात असावा, कारण तिथे मला बर्‍याच रिकाम्या धान्याच्या कणग्या आढळल्या. बाकीच्या खोल्यांमधुनही काही सटरफटर सामान होते. त्यापैकीच एक माझ्या वाटेला आली होती. वरच्या मजल्यावर पण हीच रचना. फक्त तिथे बाजुच्या खोल्यात जाण्यासाठी हॉलमधुनच जावे लागत होते. इथे मात्र हॉलमध्ये भींतीच्या कडेला एक टेबल ठेवलेले होते. दोन-तीन खुर्च्या ही होत्या. हॉलमध्य पाऊल टाकले मात्र , मनात एक कसलीतरी अनामिक भिती दाटुन आली. जणु काही आतुन आवाज आला…..नाही, नको !!

मी भित्रा नसलो तरी मनाचे आवाज ऐकतो, लगेचच बाहेर आलो. जीने उतरुन खाली आलो. संपुर्ण वाडा बघुन होईपर्यंत साडे सहा – सात वाजायला आले होते. मनातल्या मनात ठरवले उद्या सकाळी परत आप्पांना भेटायचे. त्यांच्या त्या उदगाराबद्दल विचारायचे आणि माणिकरावांनी सांगितलेले कारण खरे असेल तर आप्पांची क्षमाही मागायची होतीच. नकळता का होईना मी त्यांच्या मुलाच्या नोकरीवर हात मारला होता. आणि का कोण जाणे पण माणिकराव म्हणतात तसे आप्पांचा मुलगा दारुडा वगैरे असेल असे वाटत नव्हते. एवढ्या गोड, प्रसन्न आणि तेही मारुतीरायाच्या पुजार्‍याचा मुलगा असा वाईट मार्गाला लागेलच कसा? एकदम कसल्याशा आवाजाने लक्ष वेधले गेले आणि दचकलोच. मग लक्षात आले कोणीतरी दरवाजाची कडी वाजवत होते. मी पुढे जावुन दार उघडले तर तुक्या जेवण घेवुन आला होता. मी दारातुन बाजुला झालो,” ये रे आत ये!”

हा बाबा दारातुनच मला बाहेर यायच्या खुणा करतोय. मी चकीत ! पण बाहेर आलो. तसा त्याने डबा हातात दिला.

“माफी करा दादा, रातच्याला मी आत न्हाय येणाय, भ्या वाटतं. पण त्यांची हद्द फकस्त वाड्याच्या दरवाजापत्तुरच हाय. वाड्याच्या आत काय बी बोललं की त्यास्नी कळतया पगा. दादा, तरुण हायसा, दणकट दिसतासा, कुटंबी काम मिळंल की वो तुमाला. का जिवावर उदार झालासा. परत जावा दादा. ह्यो वाडा, लई वंगाळ हाये. कायतरी भायरचं हाय ततं. मगाशी चुकुन बोलुन गेलो तर पगा कसली शिक्षा मिळली मला.. त्याने माझ्याकडे पाठ केली आणि सदरा वर केला. आणि मी शहारलोच…

या टोकापासुन त्या टोकापर्यंत चाबुक मारावा तसा वळ उमटला होता.

“काय रे हे, कुणी मारलं तुला ? आणि हे ते, त्यांनी…. आहेत कोण ?” मी गोंधळलो होतो.

“ते म्हायीत असतं तर काय सांगायचं होतं दादा. पन आमच्या मालकाचा काय तरी संबंद हाये पगा. तुमी येक करा म्या सांगटल्यापरमानं कशालाबी हात लावु नगा. खोलीत झोपुबी नगा. आन जमल्यास उंद्याच्याला पयले आप्पांना भेटा. तेच कायतरी मार्ग काढतील. आता म्या जातो, मला उशीर झाला तर मालक वरडतील.”

एवढं सगळं ऐकल्यावर आणि तुक्याच्या पाठीवरचा तो वळ पाहिल्यावर खरेतर जेवायची इच्छाच राहीली नव्हती. पण जर हे सगळं खरं असेल, जर तुक्या सांगतो तसा खरोखरच इथे अमानवी शक्तीचा वावर असेल तर पळुन जाण्यासाठी का होईना अंगात ताकद असणे जरुरीचे होते. पण का कुणास ठाऊक मी जेवण बाजुला ठेवुन दिले. सकाळी पण बाहेरच जेवलो होतो. मला एकदम आठवलं, घरात जेवायला नको म्हणल्यावर माणिकराव क्षणभर चिडल्यासारखे झाले होते.

“च्यायला…. नाही, आता पासुनच पळायची भाषा. नाही असे होता कामा नये. जे काय असेल त्याचा सोक्षमोक्ष लावायचाच. आजची रात्र काढु उद्या आप्पाजींना भेटु.” मी मनाशी ठाम निर्णय घेतला.

सहज वर लक्ष गेले आणि एक गोष्ट लक्षात आली, तुक्या म्हणाला होता कुठंच खिडक्या नाहीत म्हणुन पण वरच्या हॉलला समोरच एक छोटीच पण काचेची खिडकी होती. नाही म्हणायला थोडी भिती वाटायला लागली होती. शेवटी मी एक निर्णय घेतला. मी सांगितलं ना , मी मनाचं म्हणणं शक्यतो टाळत नाही. एक केलं घराच सॉरी गढीचं दार उघडं ठेवलं आणि चक्क दाराबाहेर पथारी पसरली. दाराकडे डोकं ठेवुन झोपी गेलो. मस्त वारं सुटलं होतं. चांदण्या मोजता मोजता कधी तरी झोपेच्या आधीन झालो.

“सन्मित्र, ए सन्मित्र …. कुणीतरी जोरजोरात हाका मारत होतं. मला दचकुन जाग आली. घड्याळात पाहीलं तर फक्त साडे बाराच होत होते. यावेळी कोण हाका मारतय म्हणुन वैतागुनच उठलो. पाहतो तर वाड्याच्या दारातच आप्पाजी उभे होते. मी चकीतच झालो, आप्पाजी एवढ्या रात्री.

“अरे मला माहीत होतं तु घाबरला असशील, म्हणलं नवीन जागा, पोरगं घाबरुन जाईल, जावं सोबतीला, म्हणुन आलो झालं. सगळं आटपुन यायला उशीर लागला तर तु असा बाहेर झोपलेला. चल ये आतच झोपु दोघे मिळुन. आता मी आहे, घाबरु नको.”

मला इतकं छान वाटलं म्हणुन सांगु. एकदम धीर आला. शेवटी आप्पाजीच आले होते आधाराला. या अशा अनोळखी जागेत, या पछाडलेल्या घरात कुणाचीतरी सोबत हवीच होती. म्हणुन उठलो पथारी गुंडाळली आणि घरात जायला निघालो.

“चल, चल लवकर, घाई कर नाहीतर कुणीतरी येइल.” आप्पांना एवढी घाई कशाची झाली होती आणि कुणाची भिती वाटत होती. मी विचार करतच होतो, तोवर मागुन हाक आली,

” दादानु, नका जावु आत, त्ये आप्पा न्हायती !” हा तर तुक्याचा आवाज मी मागे वळुन पाहीलं तर खरेच तुक्या होता. वाड्यापासुन जवळजवळ फर्लांगभर अंतरावर उभा राहुन तो बोलावत होता. इकडे आप्पाजी घाई करत होते. “चल सन्मित्र , तो तुक्या नाही, पिशाच्च आहे.” मला काही कळेना नक्की कोण खरे बोलतोय. वारा सु सु करत वाहत होता. त्यातच झाडांची सळसळ रात्रीच्या भयावहतेत भर घालीत होती. घशाला भितीने कोरड पडली होती. एवढ्या थंडीतदेखील मला घाम फुटला होता.

संकटाच्या वेळी आपोआप मेंदुला धार चढते म्हणतात. माझ्या डोक्यात एक कल्पना आली आणि मी आप्पाजींना म्हणालो,” आप्पाजी, अहो तुम्ही बरोबर असताना कसली आलीय भीती, चला दोघे मिळुन त्या पिशाच्चाला घेरु.”

“नाही, नाही मी बाहेर नाही येणार आता, तुच लवकर आत ये! चल नाहीतर ते पिशाच्च जवळ येतय बघ. ”

मी वळुन पाहीलं तर खरोखरच तो तुक्या जवळजवळ येत होता. मला काही कळेना, आपोआपच मुखातुन ओळी बाहेर पडायला लागल्या…. “भिमरुपी, महारुद्रा, वज्रहनुमान मारुती…..!” आणि….

…….
…………

तसे आप्पाजी एकदम गायब झाले. तुक्या मात्र अजुन जवळ आला.
“दादा, मस्नी वाटलंच होतं पगा, आज राती कायतरी व्हनार, म्हुन म्या हितंच लपुन बसलो हुतो!”
“झोपा आता बिनघोरी, त्ये न्हाय यायचं आता, म्या थांबतु पायजे तर!”

माझा कंठ दाटुन आला, कोण कुठला तुक्या, माझ्यासाठी जिवावर उदार होवुन आला होता.
“नाही, तुका तु जा आता, मी सावध राहीन आता ! “, मी त्याला सांगितलं तसा थोडासा साशंकपणेच तो परत गेला.

झोपेचं खोबरं तर झालंच होतं. मग तसाच झोपेचा प्रयत्न करत राहीलो. कधीतरी पहाटेच्या सुमारास झोप लागली. सकाळी उठल्यावर आत जायला पण भीती वाटायला लागली. तसाच धीर करुन आत घेतलो. कपडे घेतले आणि बाहेर पडलो. शेतातली विहीर शोधुन काढली आणि सुर मारला………..

आता कसं प्रसन्न वाटत होतं. १० वाजता माणिकराव येणार होते. घड्याळ बघीतले तर ८ वाजायला आले होते. घाई करायला हवी होती. पटापट आन्हिकं उरकली. मनोमन मारुतीरायाला नमस्कार केला कारण वाड्यावर कुठेच, कुठल्याही देवाचा फोटो मला आढळला नव्हता.

माझे मलाच हसु आले. कर्‍हाडात एवढी मंदिरे होती पण मी कधी कुठल्याच देवाला दर्शन दिले नव्हते. काळ समोर दिसायला लागला कि त्याची आठवण होते म्हणतात ते काही खोटे नाही. कपडे बदलले आणि घाई घाईत गावाकडे जायला निघालो.

मध्येच तुक्या भेटला. नाश्ता घेवुन आला होता तो. मला बघितलं की म्हणाला,” दादा काल येक जेवलासा हितं, आजबी म्या नाश्ता घेवुन आलुया. पण नगा खावु हे खाणं. माझ्यावाणी अडकुन पडाल न्हायतर. लई वरसापुर्वी म्या चोरी करायला वाड्यात घुसलो होतो. येवस्तित तितनं पितळ्याची भांडी पळवली. ती इकली आन मयनाभर वापरला पैका. आन त्या नंतर अंगावर फोडं याया सुरुवात झाली. लई आग आग व्हायाची पगा.

चार दिसानंतर मालक आलं माज्याकडं. म्हणालं गुमान चल माज्यबरुबर, न्हायतर हि फोडं अशीच वाढतील आणि येक दिस घेवुन जातील वर.”

म्या मालकाकडं आलो तर तासात फोडं गायब. नंतर येकदा पळायचा इच्चार केला नुसता तर परत फोडं आली. तवापसनं नाद सोडला अन हितंच अडकलुया पगा. पन दादा, लई वंगाळ हाये हे समदं. काय करु. म्हनलं तुमालातरी हुश्शार करावं.”

का कुणास ठाऊक, मी त्याला पण सांगितलं नाही की काल रात्री मी जेवलोच नाही. त्याला सांगितलं हा नाश्ता असाच कुठल्यातरी कोपर्‍यात टाकुन दे, किंवा जमीनीत गाडुन टाक. आणि माणिकरावांजवळ काही बोलु नको. अगदी या भेटीबद्दलसुद्धा. मी आप्पाजींकडे चाललोय आता. कुणाला बोलु नकोस. तर त्याने थडाथडा थोबाडीत मारुन घेतल्या. “न्हाय, बा मला काय याड लागलय काय? हे समदं संपायला होवं दादा, संपायला होवं. तुमी आपांना भेटाच, त्यो देवाचा मानुस हाय. त्योच सोडवल पगा या समद्यातुन.”

मी मंदिरात आलो. मारुतीरायाला साष्टांग दंडवत घातला. त्यानेच तर वाचवलं होतं रात्री त्या महाभयंकर संकटातुन.

“उठा सन्मित्र, मला माहीत होतं तुम्ही येणार ते. आणि आज एकदम साष्टांग दंडवत. हनुमंतानं प्रचिती दिलेली दिसते रात्री.घ्या प्रसाद घ्या.”

मी आप्पांनाही नमस्कार केला. प्रसाद घेतला आणि त्यांना सगळं काही नीट सांगितलं.

“सन्मित्र मला वाटतं, यु आर द चोजन वन फ़ोर धिस जॉब!

मी बघतच राहिलो..आप्पाजी आणि इंग्लिश.

“असे बघताय काय, खेड्यात राहतो म्हणुन तुला काय मी अडाणी वाटलो काय? पुणे विद्यापिठाचा एम.ए. आहे मी फिलॉसॉफीचा. स्वामींची आज्ञा झाली म्हणुन इथे येवुन राहीलोय.”

” स्वामी ..?” मी चक्रावलोच.” आप्पाजी खरेतर मी माफी मागायला आलो होतो. नकळत का होईना माझ्यामुळे तुमच्या मुलाच्या पोटावर पाय आला. क्षमा करा.” मी अगदी मनापासुन बोलुन गेलो.

तर आप्पाजी खळखळुन हसायलाच लागले,

” अच्छा तर त्या माणिकरावांनी हे भरवुन दिलं तर तुझ्या मनात. अरे वेड्या, मी मारुतीरायाचा भक्त, समर्थ रामदास स्वामींचा शिष्य. समर्थांच्या शिष्यपरंपरेतली १४ किंवा १५ वी पिढी माझी. बालब्रम्हचारी आहे बाबा मी. शिक्षण सुरु व्हायच्या आधी आणि नंतर आयुष्याच्या ३२ व्या वर्षापर्यंत सज्जनगडावर आनंदस्वामींच्या चरण सेवेत होतो. दहा वर्षापुर्वी स्वामींची आज्ञा झाली की तुझी गरज आता प्रतापनगरात आहे. म्हणुन आलो इथे. तेव्हापासुन इथेच आहे. मला वाटतं याच कामासाठी स्वामींनी मला इथे पाठवलं होतं.”

“असो तु जा आता माणिकराव येतील थोड्या वेळात वाड्यावर. तुला, तु म्हणले तर चालेल ना?”

त्यांनी विचारले आणि मलाच शरमल्यासारखे झाले. “काय आप्पाजी, असं का विचारता? अहो, तुमचा अधिकारच आहे तो!”

“एक काम कर, जाताना ही मारुतीरायाची तसवीर घेवुन जा, वाड्यात गेलास की माणिकराव गेल्यानंतर योग्य जागा आणि योग्य वेळ बघुन वाड्यातच कुठेतरी प्रतिष्ठापना कर देवाची आणि हो हा गोफ बांध गळ्यात. चिंता करु नको, मारुतीरायावर विश्वास ठेव , संध्या़काळी मी येइन वाड्यावर, मला ही एकदा बघायचाच आहे तो वाडा.”

आता आप्पाजींच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली होती. ती बघुन मला पण कमालीचे आश्वस्त वाटायला लागले. मग त्यांनी मला तिथलाच एक मारुतीरायाचा फोटो आणि एक गोफ दिला आणि काही बोलायची संधी न देता ते पुन्हा गाभार्‍यात शिरले. मी मनोमन त्यांच्या पाठमोर्‍या आकृतीला नमस्कार केला आणि झपाझप वाड्याकडे निघालो. मनात अजिबात शंका नव्हती की माणिकराव येणार आहेत हे आप्पाजींना कसे कळले असावे. मारुतीराया धन्य आहेस बाबा.

गावातल्याच एका छोट्याशा “डिपार्टमेंटल टपरीतुन” पुजेचे सामान विकत घेतले आणि झपाझप पावले उचलत वाड्याकडे निघालो. साडे नऊ वाजुन गेले होते. माणिकरावांच्या येण्याआधी वाड्यावर पोहोचणे जरुरीचे होते. आप्पाजींच्या भेटीबद्दल त्यांना इतक्यात काही कळणे योग्य नव्हते.

मनात आप्पाजींचं वाक्य रुंजी घालत होतं, “यु आर द चोजन वन !”

त्यांना नक्की काय म्हणायचं होतं. या वाड्यातली त्या अमानवी शक्तीच्या विनाशासाठी तर नव्हती माझी निवड? पण मग मीच का? हे काम तर आप्पाजीही करु शकले असते. किंबहुना आप्पाजीच करु शकत होते. मग त्यांना दहा वर्षे वाट पाहात का बसावे लागले? आणि ती तथाकथीत अघोरी शक्ती…, नक्की काय होते ते? त्यासाठी इतके वर्ष आप्पाजी माझी वाट बघत या आडगावात थांबले होते? आणि गंमत म्हणजे माझ्याकडे असं काय होतं की……..? मेंदु पोखरल्यासारखा झाला होता. विचाराच्या नादात रानात कधी येवुन पोहोचलो ते कळालेच नाही. वाडा समोर दिसला आणि भानावर आलो.

समोरच तुक्या होता, ” दादा, मालक आल्याती, लई कावल्याती , जरा जपुन र्‍हावा !!!

मी मनाची तयारी करत वाड्यात शिरलो. का कुणास ठाऊक पण मनात भितीचा लवलेशही नव्हता. माझं मलाच आश्चर्य वाटलं. मी आत पाऊल टाकलं आणि माणिकराव सामोरे आले….

“सन्मित्र, तुम्हाला इथे कशासाठी ठेवलेय? आणि तुम्ही पहिल्या दिवसापासुनच गायब! मला हे चालणार नाही सांगुन ठेवतो. कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा मला खपत नाही.” म्हातारा भलताच पेटला होता.
पण कसं कोण जाणे, मी शांत होतो. माझं मलाच आश्चर्य वाटलं. कालपर्यंत कोणी या भाषेत बोललं असतं तर मी तिथंच त्याचं हाड ना हाड संगीतमय करुन सोडलं असतं, पण आज मात्र मी कधी नव्हतो इतका शांत होतो.

“माणिकराव, माझ्या माहितीप्रमाणे मला हा वाडा आणि संपुर्ण शेत याच्या देखरेखीसाठी ठेवले आहे. मग मला शेतावर एक नजर टाकावी वाटली तर बिघडलं कुठे? आणि कृपा करुन पुन्हा या भाषेत माझ्याशी बोलु नका? मला नाही आवडत ते !”

म्हातारा बिथरला,”तु माझा नोकर आहेस आता, लक्षात ठेव..माझं अन्न खाल्लं आहेस तु.” मी पटदिशी त्यांना सुनावणार होतो की मी तुमच्या अन्नाला स्पर्षही केलेला नाही. पण लगेच त्यातला धोका लक्षात आला आणि गप्प झालो. म्हातारा रागारागात पुढे आला. मला वाटलं आता येतो अंगावर, लगेच नैसर्गिकरित्या मी बचावास सिद्ध झालो. पण माणिकराव हात उगारुन माझ्या जवळ आले एकदम आणि अचानक फुटभर अंतरावर येवुन थांबले. मला काही कळेना.

एकदम सीन चेंज……

” माफ करा सन्मित्र, वय झालंय आता , त्यामुळे राग लवकर येतो आजकाल ! ”

“काही हरकत नाही माणिकराव, फ़क्त यापुढे भान ठेवा. ” माझे लक्ष सगळे त्यांच्या चेहेर्‍याकडे होते. त्या काही सेकंदात त्यांच्या चेहेर्‍यावर एक कसलीशी वेदना चमकुन गेली. त्यानंतर मात्र माणिकराव माझ्यापासुन फुटभर अंतर राखुनच वावरत होते. मी उगाचच आपल्या दंडाच्या बेटकुळ्या तपासुन बघितल्या. म्हातारा घाबरला वाटतं.

“सन्मित्र, अहो तुमच्या गळ्यात काय आहे ते? असलं कुणीही दिलेलं, काहीही गळ्यात घालत जावु नका. लोकांचा भरवसा देता येत नाही आजकाल.”

माझा फुगा फटकन फुटला. म्हणजे ही सारी करामत आप्पाजींनी दिलेल्या त्या गोफाची होती तर…!

“नाही माणिकराव , तो गोफ मला माझ्या गुरुंनी दिला आहे. ती माझी श्रद्धा आहे, माझा आत्मविश्वास आहे, तो मला काढता नाही येणार.”

माणिकराव चरफडत होते , ते प्रचंड अस्वस्थ झाले होते.

“सन्मित्र, तुम्ही नक्की शेतातच होतात?”

ते वारंवार माझ्या हातात असलेल्या पिशवीकडे पाहात होते. कपाळावर आलेला घाम पुसत होते. आता त्यांची गोची माझ्या लक्षात आली. मी बिनधास्त पुढे सरकलो.

“तुम्हाला खोटे वाटतेय हे घ्या, या पिशवीत माझे आंघोळीचे कपडे आणि एक पुस्तक आहे. इतका वेळ रानातच वाचत पडलो होतो. नाही..आता तुम्ही पिशवी चेक कराच!”

मी रागावल्याचा आव आणत पिशवी पुढे केली. खरेतर मी खुप मोठी रिस्क घेतली होती. जर माणिकरावांनी खरोखरच पिशवी चेक केली असती, तर सगळे बिंग तिथेच फुटले असते. पण माझ्या अपेक्षेप्रमाणेच पिशवी पुढे करताच माणिकराव एखादा फणा काढलेला नाग बघावा तसे दचकुन मागे सरकले.

“नाही, नाही सन्मित्र, तुमच्यावर विश्वास आहे माझा, अहो..म्हणुन तर तुमच्या हातात माझ्या इस्टेटीची सगळी सुत्रं दिलीत ना.”

इथेच माणिकरावांचा या सगळ्या प्रकरणाशी असलेला संबंध सिद्ध होत होता. ते त्या पिशवीला स्पर्षच करु शकत नव्हते ….
पिशवीत “मारुतीरायाची तसबिर आणि पुजेचे सामान होते.”

“ती पिशवी तिकडे ठेवुन द्या, या तुम्हाला वाडा दाखवतो, चला. तुक्या, इकडे ये जरा”, त्यांनी तुकाला बोलवुन काहीतरी त्याच्या कानात सांगितलं. तो नाही, नाही करत होता. तर त्यांनी डोळे वटारले,

” सांगितले तेवढे कर, नाहीतर……लक्षात आहे ना.” तुका घाबरत घाबरत हो म्हणाला.
“काही नाही हो, जेवणाची व्यवस्था इथेच कर म्हणुन सांगितले.तर कुरकुर करत होता म्हणुन दटावलं थोडं. ही आजकालची नोकर मंडळी एवढी उद्दाम झालीत ना.असो, या तुम्हाला घर दाखवतो. ”

हॊलमध्ये आल्यावर साहजिकच मी त्या फोटोबद्दल विचारले.

“ते माझे आजोबा आणि आज्जी. इथली जहागीरदारी होती आमच्याकडे. त्यावेळी छोटीशी वस्ती होती, आताचं जे गाव दिसतय ते आमच्या आजोबांनी वसवलं. मोठा रुबाबदार आणि देखणा होता माणुस, नाही?”

“अर्थात”, मी मनापासुन अनुमोदन दिलं. “माणिकराव वाड्यावर कुठेही तुमच्या आई वडीलांचा किंवा तुमचा फोटो दिसत नाही.” मी पीन मारलीच.

“नाही हो, कधी काढलाच नाही. पंत थोडेसे जुन्या विचाराचे होते. पंत म्हणजे माझे वडील. फोटो काढणे आवडत नसे त्यांना.” माझं लक्ष झोपाळ्याकडे गेलं……

“माणिकराव, हा झोपाळा मात्र मला आवडला बरं, मस्तच आहे.”

असं म्हणत मी झोपाळ्याजवळ गेलो आणि झोपाळ्यावर बसणार तितक्यात माणिकरावांनी मला थांबवलं.

“सन्मित्र, खुप दिवसात स्वच्छ केलेला नाही, तुक्याकडुन स्वच्छ करुन घेतो मग हवा तितका वापर करा झोपाळ्याचा. चला आता निघतो मी.”

………… झोपाळा लख्ख होता, पण “ठिक आहे” म्हणुन मी मागे वळलो आणि त्या क्षणीच….

“कर्रर्रर्र …. कर्रर्रर्र…….जोरात आवाज झाला आणि माणिकरावांनी मला जवळजवळ खेचलंच आणि ते जोरात ओरडले,” नाही, आत्ताच नाही !”

मी बाहेर पडता पडता मागे वळुन पाहीलं, इतका वेळ स्थीर असलेला झोपाळा चक्क कुणीतरी झोका द्यावा तसा मागेपुढे हालत होता. अंगभर भीतीची लाट सळसळत गेली. म्हणजे ते दिवसा देखील कार्यक्षम होते. पण मग माणिकरावांनी त्यांना का अडवलं? मी माणिकरावांना कुठलेही स्पष्टीकरण देण्याच्या किंवा मागायच्या फ़ंदात पडलो नाही. म्हणालं ही पिडा जातेय तर जावुदे. कारण आप्पाजी येणार होते. माणिकराव बाहेर पडले, पडताना त्यांनी मागे वळुन पाहीले, त्यांची नजर वरच्या हॉलवर होती.

मी ही चोरुन तिकडे नजर टाकली…..

क्षणभर त्या खिडकीच्या काचेवर कसलीशी सावली दिसली. कोणीतरी होतं तिथं….!

अचानक…..

तो आवाज कानी आला आणि सगळ्या अंगावरचे केस ताठ झाले माझ्या. हातात आलेली शिकार निसटुन गेल्यावर प्रचंड संतापलेल्या वनराजाने डरकाळी फोडावी तसा काहीसा हुंकार होता तो. माणिकराव मात्र निर्विकार पणे निघुन गेले.

आता मात्र उशीर करुन चालणार नव्हता. आता मला सर्वात आधी योग्य जागा शोधुन मारुतीरायाची प्रतिष्ठापना करायची होती. मी पिशवी काढली ….

आणि…..

आतली तसवीर गायब होती. मघाशी माणिकरावांनी तुक्याला काय काम सांगितले होते ते आत्ता माझ्या लक्षात आलं . माझी हवा टाईट……

विचार करा, इतका वेळ मी जीच्या जोरावर गमजा करत होतो ती मारुतीरायाची तसबीरच गायब होती. नुकतेच नवा शोध लागलेला की ते दिवसादेखील कार्यक्षम आहेत. संपुर्ण वाडा झपाटलेला, वाड्यात मी पुर्णपणे एकटा आणि ज्याच्या विश्वासावर होतो..तो मारुतीराया गायब. अशी तंतरली म्हणता …..

क्षणभर विचार केला आणि मग ठरवले आता वाड्यात राहणे धोक्याचे आहे. आप्पा येतो म्हणाले होते, त्यांचाही पत्ता नव्हता. मी झर्रकन दाराकडे आलो ………
…………………………
…………………………..
पुढचा क्षण प्रचंड धक्का देवुन गेला मला.

अरे, वाड्याचा दरवाजा कुठे गेला? दाराच्या जागी एकसंध दगडी भिंत उभी होती, जणु काही तिथे कधी दरवाजा नव्हताच. आता मात्र उरलंसुरलं धैर्य संपुष्टात आलं………..
मनोमन पुन्हा देवाचा धावा सुरु झाला….

आणि अचानक…..

“दादा, वाचवा दादा, म्या संपलो…” ……हा तुक्याचाच आवाज होता नक्की. पण बाहेर जाणार कसा? दरवाजाच दिसत नव्हता. एकदम लक्षात आलं कि हा आवाज वाड्याच्या आतुन येतोय, किंबहुना वाड्याच्या वरच्या मजल्यावरुन.

मी वर पाहीलं, क्षणभर खिडकी उघडली गेली..खिडकीत तुक्याचा चेहरा डोकावला …..
क्षणभरच आणि कुणीतरी जोरात खेचावं तसा तुक्या खिडकीवरुन नाहीसा झाला…..

कानावर अजुनही त्याचा करुण आवाज येतच होता…..काही सुचेना, भीती तर प्रचंड वाटत होती. पण एकीकडे तुक्याची मदत करण्याची इच्छादेखील प्रबळ होती. काय करु? मी एकटा कसा काय लढणार त्यांचाशी ? ….

एक दुर्बळ , सामान्य माणुस आणि एक महाशक्तिशाली अमानवी शक्ती……अगदीच विषम संघर्ष होता.

शेवटी मनाने निर्णय घेतला. माझ्यातल्या कृतज्ञ माणसाने मनातल्या भीतीवर विजय मिळवला आणि पुढच्या क्षणी मी वरच्या मजल्यावर होतो.

मनातलं द्वंद्व संपलं होतं. मृत्युची भीती संपली होती तिची जागा तुक्याबद्दलच्या आपुलकीने, कृतज्ञतेने घेतली होती. वरच्या हॉलचा दरवाजा बंदच होता. मी मारुतीरायाचे नाव घेतले….
आणि बंद दरवाजावर एक लाथ घातली. तसं दार उघडले गेले…..

जे काही समोर होतं ते खरंच अविश्वसनीय होतं. हॉलच्या मधोमध असलेल्या टेबलावर कुठल्यातरी अदृश्य शक्तीने जखडल्यासारखा तुक्या असहाय अवस्थेत पडलेला होतां, अंगावरच्या कपड्याच्या चिंध्या झाल्या होत्या. मला पाहताच त्याच्या डॊळ्यात एक चमक आली, तोंडातुन आवाज आला, ” मस्नी म्हायीत व्ह्तं दादा, तुमी मस्नी वाचवाया येशीला म्हुन! हेच्यातनं वाचवा, मस्नी सोडवा दादा.”

………….आवाज कुठुनतरी, खुप दुरुन आल्यासारखा येत होता. मी थबकलो, पण क्षणभरच, एका बेसावध क्षणी भावनेने बुद्धीवर मात केली आणि मी पुढे सरकलो. जरा पुढे गेलो आणि….

……………………….
…………………………….

तुका चक्क माझ्या डोळ्यासमोर विरघळुन गेला. ते बघितल्यावर मात्र मीच काय तो पघळुन जायचा बाकी राहीलो. आतुन, मनातुन एक आवाज आला,
“पळ, बेट्या…नाहीतर संपलं सगळं.!” क्षणात गर्रकन मागे वळलो आणि दरवाजा गाठला.

दरवाजा ?

हा पण विरघळला कि काय? अरे देवा पुन्हा तेच, तिथे एकसंध दगडी भिंत उभी होती. आणि पुन्हा तो आवाज कानात घुमला, पण यावेळी मघासारखा फक्त हुंकार नव्हता. कोणीतरी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतं. खरंतर कानाला काहीच ऐकु नव्हतं, तो आवाज थेट मनाच्या पातळीवर घुमत होता…..

“तुक्याच्या मदतीने वाचला होतास ना काल? आज तुक्यामुळेच अडकलास.” आणि त्यानंतर कानी आलं ते एक विचित्र हास्य!

काय नव्हतं त्या हास्यात?……. घृणा, तिरस्कार, उपहास, संताप, स्वतःच्या अमर्याद सामर्थ्याचा अहंकार … ; सगळे विकार शिगोशीग भरले होते त्या हास्यात. माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. तोंडातुन शब्द फुटत नव्हता. मेंदुच जणु ब्लॉक झाला. एकच विचार मनात आला….

“सन्मित्र, संपलं सगळं ! आप्पाजी माफ करा, तुमचं गेली दहा वर्षे वाट पाहणं वाया गेलं. समोर पाहीलं……

टेबलापाशी काहीतरी उभं होतं. त्याला काहीच आकार नव्हता. नुसता धुक्याचा पुंजकाच जणु. एक विलक्षण दुर्गंधी सगळीकडे पसरली होती. ते भयावह हुंकार वाढत चालले होते. जणु काही ते एकटं नव्हतं. त्याच्यासारख्या अनेकांचा तो समुदाय असावा. त्या हुंकारांमधुन त्यांची घाई, त्यांची भुक जाणवत होती.

बहुतेक मृत्युचं बोलावणं आलं होतं. मृत्यु ? पण मला खरोखर मृत्यु येणार होता?

…..की मी देखील त्यांच्यात सामावला जाणार होतो? त्यांच्यातलाच होणार होतो?

हळुहळु धुकं वाढत होतं. थोड्याच वेळात धुकं पुर्ण हॉलमध्ये पसरलं. आता आजुबाजुच्या भिंतीदेखील दिसत नव्हत्या. मी शांतपणे डोळे मिटुन घेतले. मनातल्या मनात हनुमानस्तोत्र म्हणायला सुरुवात केली. आता मी मृत्यु किंवा ते जे काही प्राक्तनात आहे ते स्विकारायला तयार होतो. कधीतरी शुद्ध हरपली. शुद्ध हरपण्यापुर्वी शेवटची जाणिव होती ती म्हणजे……..

अचानक त्या दुर्गंधीत एक वेगळाच, प्रसन्न…आल्हाददायक असा सुगंध दरवळला. कानावर शब्द आले………

“जय जय रघुवीर समर्थ !”

मी मागे वळुन पाहीलं……

मला दिसलं की हॉलचा दरवाजा पुन्हा आपल्या जागेवर आला होता. हे केवळ संमोहन होतं की आधी दाराचं गायब होणं संमोहन होतं. तिथे दारात मी शुभ्र, तेजस्वी आकृती पाहीली. बहुदा आप्पाजी माझ्या मदतीला धावुन आले होते. अचानक सगळीकडे शुभ्र प्रकाश पसरला आणि माझी शुद्ध हरपण्यापुर्वी फक्त एवढेच जाणवले की कुणाच्यातरी मजबुत बाहुंनी मला आधार दिला होता.

किती काळ बेशुद्ध होतो कुणास ठाउक, पण शुद्धीवर आलो तेव्हा वाड्यात नव्हतो एवढं नक्की. डोळे उघडले आणि समोर दिसले ते प्रेमळ नजरेने माझ्याकडे पाहणारे आप्पाजी.

“आत्ता कसं वाटतंय सन्मित्रा, बरा आहेस ना? आणि मग स्वत:च खळखळुन हसले.

“एवढ्या भयानक प्रसंगातुन गेल्यावर बरा कसा असशील म्हणा.”

मी कसनुसा होत हसलो.

माफ कर सन्मित्र, पण तुला त्या वाड्यातल्या शक्तीची, त्याच्या भयानकतेची जाणिव होणं आवश्यक होतं. कारण शेवटी तुझा लढा आहे तो, तुलाच लढायचाय. मी फक्त रिंगणाच्या बाहेर उभे राहुन मदत करु शकतो. असो, तुझी शुद्ध हरपल्यानंतर मी जवळजवळ दोन तास त्या वाड्यात होतो. माझ्यापरीने शोध घेण्याचा प्रयत्न केला.

सन्मित्र, तिथे जे काही आहे ते भयानक तर आहेच. पण खुप जुनाट आहे. गेली कित्येक शे वर्षे ते तिथं सुखेनैव नांदतय. गेल्या काही वर्षापासुन मी या सगळ्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करतोय. साधारणत: दिडेकशे वर्षापुर्वी इथे पहीला बळी गेला होता, म्हणजे उघडकीस आलेला, तसे किती गेलेत हनुमंतच जाणे. एक धनगर आणि त्याची बायको रात्रीच्या मुक्कामाला इथे थांबले होते. त्यावेळेस इथे हा वाडा नव्हता. मोकळा माळ होता. पण रात्रीत बहुदा तो धनगर धुक्यात विरघळुन गेला, ते बघुन त्याची बायको वेडी झाली. त्यानंतर अधुनमधुन या अशा घटना घडतच गेल्या.

कधी माणसे, कधी जनावरे … त्यांना काहीच वर्ज्य नाही. ते आधी तुम्हाला मदत करुन आपल्या ऋणात बांधुन घेतात, एकदा तुम्ही त्यांची मदत घेतली की की तुम्ही त्यांचे गुलाम बनता. असेच कुठल्याशा बेसावध क्षणी माणिकरावांचे कुणी पुर्वज , कदाचित त्यांचे आजोबा त्या शक्तीच्या कह्यात गेले असावेत. त्यानंतर पुढच्या पिढ्या त्यांच्या ताब्यात गेल्या. माणिकरावांच्या वडीलांनी विरोध करण्याचा तोकडा प्रयास केला होता पण ते अचानक गायब झाले, अशा तर्‍हेने की जणु कधी अस्तित्वातच नव्हते.

सन्मित्र, आता तुझ्या मनातल्या शंका…… मीच का ?

तु लहानपणी हिरण्यकश्यपुची गोष्ट ऐकली असशील, किंबहुना कुठल्याही बलशाली दानवाची गोष्ट घे, असं आढळतं की कुठल्याना कुठल्या वरदानामुळे म्हणा किंवा अन्य काही कारणाने असेल पण ते देवांनाही अजिंक्य ठरले होते. मग देवाने मानवरुपात येवुन त्यांचा संहार केला. कदाचित अशीच काही यामागचीही कारणमिमांसा असेल. ती मलाही अज्ञात आहे. मला स्वामींनी सांगितलं होतं एक तरुण येइल आणि या सर्व शक्तीच्या विनाशास कारणीभुत ठरेल.

आणि त्यांनी सांगितलेलं वर्णन तुझ्याशी जुळतय……

सन्मित्र, उद्या रात्री अमावस्या आहे. अमावस्येला त्यांची ताकद प्रचंड वाढते. पण त्यांना त्यांच्या पुर्ण ताकतीसह संपवायचे असेल तर उद्याच्…नाहीतर कधीच नाही. उद्या त्यांना तुझा बळी मिळाला की ते प्रचंड शक्तीशाली बनतील. तुला कल्पना नाही पण तुझ्या पुर्वजांची पुण्याई म्हण किंवा तुझं पुर्वसुकृत म्हण, तुझ्यात एक विलक्षण सामर्थ्य आहे. वेळ आली की तुला त्याची जाणिव होईलच.

सद्ध्या त्यांची शक्ती, त्यांचा वावर वाड्यापुरताच मर्यादीत आहे, पण उद्या जर त्यांना बळी मिळाला… तुझा..! तर मात्र त्यांच्या शक्तीला कसलीच सीमा राहणार नाही. मग बाहेरच्या, म्हणजे आपल्या या जगात प्रलय येइल. प्रचंड उलथापालथ होइल.

आणखी काही शंका….

“आप्पाजी, तसं असेल तर मी माणिकरावांकडुन घेतलेले दहा हजार रुपये वापरलेत. त्यायोगे माझ्यावर देखील त्यांची सत्ता चालायला हवी. मग मी त्यांच्याशी कसा काय लढणार ?

हे युद्धाचे डावपेच आहेत सन्मित्र. प्रत्यक्ष लढत देण्यापुर्वी शत्रुला गाफील करावे लागते. त्यांची बलस्थानं, त्याची कमजोरी जाणुन घ्यावी लागते. वाडा हे त्यांचं बलस्थान आहे. तुझ्या पाठीशी असलेल्या सुष्ट शक्ती हे तुझं बलस्थान. त्यांना आपल्या आमर्थ्याबद्दल प्रचंड आत्मविश्वास आहे, अहंकार म्हण हवं तर. त्यांना असं वाटतय की तु सहजासहजी त्यांच्या जाळ्यात सापडलाहेस. बाकी सगळं तुझ्या मनः शक्तीवर, तुझ्या आत्मविश्वासावर अवलंबुन आहे. मी असेनच पण रिंगणाच्या बाहेरुन, आत मला प्रवेष नाही. काल रात्री जे पाहीलंस ते त्याचे हस्तक होते. जरी मी आलो नसतो तरी तुला काहीही झालं नसतं. पण मग आयताच तु त्यांच्या ताब्यात सापडला असतास.

असो, आता तु आराम कर, उद्या सकाळी तुला पुन्हा वाड्यावर जायचय. सावध राहा, शिकार निसटल्याने ते पिसाळलेले आहेत. ते तुला काहीही करु शकणार नाहीत, कारण तु त्यांच्या मालकाचा बळी आहेस, पण तुला त्रास निश्चीतच देतील. घाबरु नकोस, रात्री मी परत वाड्यावर येइनच तुझ्या मदतीला.

दुसर्‍या दिवशी सकाळी परत वाड्यावर. आप्पांजींनी आधार दिला होता तरीही भीती कमी झाली नव्हती. मनात एकच आशा होती की ते मदतीला येणार आहेत. तो दिवस प्रचंड तणावाखालीच गेला. सतत ते आजुबाजुला वावरत होते. त्यांच्या अस्तित्वाची जाणिव करुन देत होते. त्यांचा संताप, त्यांचा तिरस्कार जणु मला स्पर्षुन जात होता. मनातल्या मनात देवाचे नामस्मरण करत मी वेळ ढकलत होतो.

रात्रीचे आठ वाजले असावेत. एकदम कोणीतरी दरवाजा ठोठावला. “दादा, दार उघडा, आक्रीत झालय दादा, दार उघडा !”

मी दार उघडले, समोर तुका उभा होता……

दाराबाहेरुनच धापा टाकत त्याने सांगितले ,” लई वंगाळ झालय दादा, आक्रीत झालय………! आप्पाजी गेले. मारुतीच्या देवळात त्यांचं प्रेत सापडलय. त्यो गुरवाचा जन्या गेलता पाया पडाय, तर आप्पा देवासमोर पडलेलं दिसलं. हाकंला ओ दिनात म्हुन हात लावुन पगितलं तर समदं संपल्यालं व्हतं ! चला बिगी, बिगी !”

मी मटकन खालीच बसलो. माझी शेवटची आशा लुप्त झाली होती. आता फक्त देवाचा आणि नशीबाचा हवाला. आप्पाजींना ऐनवेळी “तिथुन बोलावणं आलं होतं.”

माझा लढा आता मलाच लढायचा होता. मला पहिल्यांदाच माझ्या एकटेपणाची जाणीव झाली. मनात , कुठल्यातरी कोपर्‍यात दबुन गेलेली भीती पुन्हा उसळी मारुन वर आली. पायातलं बळच सरलं होतं. डोळ्यापुढे अंधारी आली होती. मनात नक्की कुठल्या भावना होत्या नाही सांगता येणार. आप्पाजींसारखा खंदा आधार हरपल्याचे दु:ख, अचानक लादल्या गेलेल्या एकटेपणाच्या भावनेने दाटुन आलेली हताशा, भीती ……..

भीती, बहुदा भीती सगळ्या भावनांवर भारी पडली होती. आप्पाजींचं जाणं एक जबरद्स्त धक्का देवुन गेलं होतं. खरं सांगु, मी त्यांचं शेवटचं दर्शनही घ्यायला गेलो नाही. कुठल्या तोंडाने जाणार होतो. माझ्या मनात दाटुन आलेली भीती आप्पाजींची, त्यांच्या विश्वासाची हार होती. मी तिथुनच हात जोडले, मनोमन त्यांची क्षमा मागितली.

असं कसं झालं ? इतके दिवस आप्पाजी ज्या कार्यासाठी इथे थांबले होते. ते कार्य सिद्धीस जाण्याची वेळ आली आणि ……?

नक्की काय घडले असेल? तुक्याच्या बोलण्यातुन काही नीट कळाले नव्हते पण आप्पाजींच्या मृतदेहाचे डोळे विस्फारलेले होते. काहीतरी वेगळं, भयानक असं पाहील्यावर माणसाच्या डोळ्यात जी भीती दाटते तसच काहीसं.

भीती…आणि आप्पाजी….? पण कसं शक्य आहे ते?

इथे या महाभयंकर वाड्यातुन त्या सामर्थ्यशाली, विनाशकारी शक्तीच्या हातातुन माझी सुटका करणारे, हनुमंताचे परमभक्त असणारे आप्पाजी त्यांना कशाची भीती वाटु शकते? भीती….., वाटु …शकते?
वेड लागायची पाळी आली होती. जसजसा विचार करत होतो तसतशी मनातली भीती अजुन वर येत होती, वाढत होती. तुक्याच्या बोलण्यातुन एवढेच कळाले की आप्पाजींचा मृत्यु झाला आणि तासाभरात सज्जनगडावरुन काही भक्तमंडळी येवुन त्यांचे शव घेवुन गेली. म्हणजे आप्पाजींना त्यांचा शेवट कळाला होता का? म्हणुनच ते म्हणत होते की हा तुझा लढा आहे, तुलाच लढायचा आहे.

पण अचानक असे………

काहीही समजत नव्हते. काहीतरी अघटित घडलं होतं एवढं मात्र नक्की? पण काय ? का यामागे त्या शक्तीचा काही…….

आप्पाजी म्हणाले होते, बोलविता धनी कुणी वेगळाच आहे. तो महाशक्तिशाली आहे. पण त्याच्यापुढे आप्पांजींच्या भक्तीचे सामर्थ्यही कमी पडावे? इतका शक्तिशाली होता तो? मग मी कसा काय लढणार आहे त्याचा बरोबर? माझ्याकडे तर देवाच्या नावाशिवाय दुसरी कुठलीच शक्ती नाही. मी प्रचंड घाबरलो होतो.

तेवढ्यात आपोआप वाड्याचा दरवाजा उघडला गेला आणि दार उघडुन माणिकराव आत आले.

आज माणिकराव काही वेगळेच होते. त्यांच्या डोळ्यात विजयाचा उन्माद काठोकाठ भरलेला होता. आता सगळेच पत्ते उघडे पडलेले असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं औपचारिक सौजन्य त्यांच्या चेहेर्‍यावर दिसत नव्हतं. उलट तिथे एक विलक्षण खुनशी हास्य होतं. जणु काही मला विचारत होते,”आत्ता, आता कोण येणार तुझ्या मदतीला?”

“श्रीयुत सन्मित्र भार्गव, बोला अजुन किती वेळ काढणार तुम्ही ? नाही माहीती? मी सांगतो……..

आज रात्री बरोबर १२ वाजता ! खेळ खल्लास !! गेली कित्येक वर्षे मी या दिवसाची, अहं … रात्रीची वाट पाहतोय. आज रात्री धनी तृप्त झाले की ते मला सगळ्या शक्ती प्रदान करतील. मग मी…..मी….मीच भरुन उरेन सगळीकडे. तुला माहीत नाही सन्मित्र, मी काय काय गमावलय या रात्री साठी. माझं स्वातंत्र्य, माझं सर्वस्व, माझा बाप.

माझा बाप……मुर्खच होता बिचारा. सगळ्या विश्वावर राज्य करण्याची संधी मिळत असताना कुठल्या फालतु स्वातंत्र्याची आस धरुन बसला होता. साक्षात धनींशी टक्कर घ्यायला निघाला होता. त्याच्याच मुर्खपणामुळेच तो सज्जनगडावरचा जोगडा इथे आला, नाहीतर खुप पुर्वीच मी सर्वशक्तिमान झालो असतो.”

उन्मादाच्या भरात माणिकराव खुप काही बडबडत होते. मी डोळे विस्फारुन त्यांच्याकडे बघत होतो. माणिकरावांच्या अंगात जणु वारं शिरलं होतं. ते पुढे बोलत होते…….

“माणिकराव, तुमचे हे धनी म्हणजे नक्की आहेत कोण? कुठुन आले आहेत? त्यांना काय हवं आहे?” मी हळुच विचारलं.

माणिकरावांनी मान वर करुन माझ्याकडे बघीतलं आणि मग वेड्यासारखे खळखळुन हसले.

“तुला ते सांगायलाच हवं,…… नाही? तु का आणि कुणाला बळी जातोयस ते तुला कळायलाच हवं. ठिक आहे तर ऐक….

“साधारण सातशे ते आठशे वर्षापुर्वी, जेव्हा इथे ’शिलाहार’ राजे राज्य करीत होते तेव्हाच या सगळ्याला सुरुवात झाली. म्हणजे धनी त्या आधीच कित्येक हजार वर्षापासुन या पृथ्वीवर आहेत. पण त्यांच्या सगळ्या शक्ती सुप्तावस्थेत होत्या. शिलाहारकालीन पाचवा आदित्यवर्मन याचा अनौरस पुत्र कपालवर्मन याने राज्य ताब्यात घेण्यासाठी म्हणुन धनींची आराधना सुरु केली. त्याही पुर्वी हजारो वर्षापुर्वी जेव्हा श्रीकृष्णाने सहस्त्रार्जुनाचा वध केला तेव्हा त्याचे हजार हात आधी आपल्या सुदर्शन चक्राने छाटुन टाकले होते. सहस्त्रार्जुनाची सगळ्या जगाचे अधिपत्य मिळवण्याची आसुरी वृत्ती त्याच्या या हातात उतरली होती. कृष्णाने त्याचा वध केला तेव्हा ती आसुरी वृत्ती मुक्त झाली आणि तिने एका विनाषक शक्तीचे रुप घेतले. पण कृष्णाने आपल्या सामर्थ्याने तिला निष्प्रभ करुन बंदिस्त करुन ठेवले. कारण ती एकप्रकारची उर्जाच असल्याने तिला नष्ट करणे सर्वथा अशक्य होते. त्यानंतर कित्येक हजार वर्षे ही शक्ती निद्रावस्थेत होती. पण राजा कपालवर्मनने आपल्या इप्सित प्राप्तीसाठी अनेक बळी आणि आहुत्या देवुन तिला पुन्हा जागृत केले. या वाड्यात जिथे तु आज उभा आहेस तिथे कपालवर्मनाचे साधनास्थळ होते. इथेच कपालवर्मनाने शेकडो पशु आणि मानव बळी देवुन त्या शक्तीला म्हणाजे माझ्या धन्याला जागवले होते. सध्या जेथे प्रतापनगर आहे तिथे पुर्वी राजा आदित्यवर्मनची राजधानी होती. धनी जागे झाले आणि आदित्यवर्मनच्या शेवटास सुरुवात झाली. राजवाड्यात एका मागुन एक अपमृत्यु व्हायला लागले तसा आदित्यवर्मन खचायला लागला. राज्यात कधी नव्हे ते अवर्षणाचे संकट घोंघावु लागले. खरेतर त्याच वेळी धनी या मर्त्य जगावर स्थापीत झाले असते, पण कुठुन तो भटुकडा कडमडला आणि सुत्रे हातातुन निसटत गेली. तो स्वत:ला शिवभक्त म्हणायचा. त्याने काय केले कोणास ठाऊक पण धन्यांना पुन्हा एकदा सुप्तावस्थेत जावे लागले. पण जाताना धन्यांनी कपालवर्मनला वचन दिले होते की मी परत येइन आणि तुला या जगाचा अधिपती करीन. तेव्हापासुन कपालवर्मनची प्रत्येक पिढी धन्यांना पुन्हा जागृत करण्याचा प्रयत्न करते आहे.

मी माणिकराव जमदग्नि, कपालवर्मनचा सध्याचा वंशज, तुझे स्वागत करतोय सन्मित्र, आतापासुन काही काळानंतर तुझा बळी मी धन्यांना देइन आणि खुष होवुन धनी मला अपरंपार शक्ती आणि सिद्धी देतील. मग मी, मी या जगावर राज्य करेन. जगातल्या सर्व सुंदर स्त्रीया माझ्या गुलाम असतील. मी हवे तेव्हा, हवे तसे, हवे त्याला आपल्या इच्छेनुसार वाकवु शकेन. मला अंत नसेल..कोणीही मला हरवु शकणार नाही.
“मी ….. मी माणिकराव जमदग्नि, या जगाचा सम्राट, सर्वसत्ताधीष तुला आज्ञा करतो सन्मित्र, चल मृत्युला तय्यार हो. बरोबर बारा वाजता या वाड्यात असलेल्या तळघरात मी तुला धन्यांच्या चरणी अर्पण करेन………!”

मला आता माणिकरावांचीच भीती वाटायला लागली. हे इतकी वर्षे या रात्रीची वाट पाहताहेत. त्यांच्याकडे त्यांच्या धन्याचे प्रचंड सामर्थ्य आहे.आणि मी हा असा एकटा, मी काय लढणार यांचाबरोबर ? घशाला कोरड पडली होती. तोंडातुन शब्द फुटेनात. हात पाय थरथर कापायला लागले. मी कसेबसे सगळी शक्ती एकवटुन माणिकरावांना विचारले,

” माणिकराव, गेली कित्येक वर्षे तुम्ही, तुमचे पुर्वज त्या अघोरी शक्तीला बळी देताय. मग आता माझ्यातच असे काय विशेष आहे की मला बळी दिल्याने तुमचा धनी तृप्त होइल, तुम्हाला सगळ्या शक्ती प्रदान करेल? आणि मुळातच तुमच्या धन्यालाच जिथे जगावर अधिपत्य गाजवण्याची इच्छा आहे तेव्हा त्याचे सामर्थ्य जागृत झाल्यावर तो तुम्हाला देखील संपवणार नाही कशावरुन?

मी हळुच एक काडी टाकुन दिली. “आणि आप्पांचं काय झालं, त्यांना कुणी मारलं? की ते पण तुमच्या आसुरी लालसेचाच बळी ठरले?

माणिकरावांनी चमकुन माझ्याकडे पाहीले,” नाही, नाही…एकदा दिलेले वचन धनी मोडत नाहीत? त्यांनी वचन दिलय आम्हाला? तो जोगडा मध्ये मध्ये करत होता, त्याला मीच संपवलं. फक्त एका ब्रह्मसंमंधाला सोडावं लागलं त्याच्यावर. मुर्ख जोगडा, म्हणे मी ब्राह्मणावर हात उचलत नाही. एकदा मेल्यावर कोण ब्राह्मण राहतो..?… ते केवळ एक पिशाच्च असतं. त्या ब्रह्मसंमंधाने अगदी सहज संपवलं त्या जोगड्याला. मुर्ख लेकाचा !

मला आप्पाजींबद्दल खुप आदर वाटला. अगदी मृत्य समोर असताना देखील त्यांनी आपली तत्वे सोडली नव्हती.

पण मला आता माणिकरावांची कमजोर नस सापडली होती. जरी अघोरी शक्तीचे उपासक असले तरी तरी माणिकराव होते माणुसच. त्यांच्या मनात फक्त त्यांच्या धन्याबद्दल शंका निर्माण करणे जमले की झाले.

“आणि असं बघा ना, त्यांनी वचन दिलं होतं ते कपालवर्मनला, तुम्हाला नाही. शेकडो वर्षापुर्वी एका सामान्य भटुकड्याने तुमच्या धन्याचा पराभव केला होता. आता तुम्हाला आपल्या सर्व शक्ती देवुन आपला प्रतिस्पर्धी आपणच निर्माण करण्याइतका तुमचा धनी मुर्ख आहे काय?

“नाही, धनी असे करणार नाहीत आणि आता तर माझ्यावर ते प्रचंडच खुष होतील. कारण आजचा जो बळी मी त्यांना देणार आहे तो त्यांच्या सर्वात कट्टर शत्रुचा, ज्याने पुर्वी त्यांना पुन्हा सुप्तावस्थेत जाण्यास भाग पाडले होते त्या “अनिरुद्धशास्त्री भार्गव”चा शेवटचा वंशज आहे…..”सन्मित्र भार्गव”!

माणिकराव पुन्हा एकदा विक्षिप्तासारखे हसले. पण यावेळी त्यांच्या बोलण्यात ठामपणा नव्हता.

अच्छा, म्हणुन या कामासाठी माझी निवड झाली होती तर. माझ्याच कुणा शिवभक्त पुर्वजाने पुर्वी या अघोरी शक्तीचा पराभव केला होता. आणि आज शेकडो वर्षानंतर पुन्हा माझ्यावर ती वेळ आली होती.

तेच तिघे, ती अघोरी शक्ती, तो कपालवर्मन (त्याचे वंशज माणिकराव) आणि अनिरुद्धशास्त्री भार्गव (त्यांचा वंशज म्हणाजे मी, सन्मित्र भार्गव) पुन्हा एकदा एकमेकासमोर उभे राहणार होतो. शेवटची, अटीतटीची लढाई लढण्यासाठी. पण परिस्थिती नक्की तीच होती?

नाही, परिस्थिती निश्चितच खुप बदलली होती. त्या संघर्षाच्या वेळी “अनिरुद्धशास्त्री भार्गवांसोबत” त्यांच्या शिवभक्तीचं बळ होतं आणि माझ्याबरोबर माझं मृत्युचा भीतीने गलितगात्र झालेलं मन. त्याउलट शत्रु गेल्या शेकडो वर्षात खुप शक्तीशाली झालेला होता. खुपच …. खुपच विषम संघर्ष होता हा !!!

पण मला लढणे भाग होते. अनिरुद्धशास्त्रींना तर मी ओळखत नव्हतो, पण आप्पाजी…..
त्यांनी माझ्यासाठी, किंबहुना या पवित्र कार्यासाठी आपले प्राण अर्पण केले होते. त्यांचे बलिदान मी असे वाया जावु देणार होतो? या क्षुद्र, स्वार्थी माणिकरावांच्या हातुन मृत्यु येण्याइतके क्षुद्र नक्कीच नव्हते आप्पाजी! नाही मला लढायलाच हवे……..

आता मृत्यु येवु दे अन्यथा काही होवु दे आता मी थांबणार नाही. आज बोलावणे निश्चित येइल……..मृत्युचे…अंताचे….विनाषाचे.

त्याला एकतर मी ओ देइन किंवा माणिकरावांचा तो बोलविता धनी …… तो तरी नष्ट होईल.

माझ्या मनातली भीती आता एक वेगळेच रुप घेत होती. तिला एक वेगळीच धार चढली होती. मनाची द्विधा परिस्थिती संपली आणि त्याच क्षणी एका जिद्दीने, ध्येयाने माझ्या मनात जन्म घेतला. मनातली भीती आता आत्मविश्वासात रुपांतरीत झाली होती. आता तिच्याबरोबर माझ्या मनातील आप्पाजींवर, जगातल्या सुष्ट शक्तीवर असलेल्या विश्वासाचे, श्रद्धेचे पाठबळ होते. “सन्मित्र भार्गव” त्याच्या आयुष्यातल्या अखेरच्या युद्धाला तयार झाला होता. माझ्या मनातली आंदोलने चेहेर्‍यावर उमटणार नाहीत याची काळजी घेत प्रकटपणे मात्र अगदी निराष अवस्थेत माणिकरावांना म्हणालो…..

“ठिक आहे, माणिकराव ! शेवटी तुम्ही जिंकलात. माझी सगळी मदार आप्पाजींवर होती. तुम्ही त्यांनाही संपवलंत. चला मी तयार आहे. निदान एक विनंती आहे, माझा शेवट तर निश्चित आहे, निदान शेवटी तरी तुमच्या धन्याचं दास्यत्व पत्करण्याची मला संधी द्या.कदाचीत तेच मला एखादी संधी देतील.”

“जरुर, जरुर माणिकराव, खुशीत होते. धनी खुप दयाळु आहेत, एकदा का तु तुझं हे शरीर सोडलंस की तुझ्या आत्म्याला ते आपल्या सेवकांमध्ये समाविष्ट करुन घेतील अशी मी तुला ग्वाही देतो. चल आता तळघराकडे, वेळ झालीय!”

मी मनोमन मारुतीरायांचे स्मरण केले, आप्पाजींना, त्या कधीही न पाहिलेल्या माझ्या पुण्यवान पुर्वजाला मनोमन वंदन केले आणि माणिकरावांच्या मागे निघालो.

आता मनातला सगळा संघर्ष संपला होता. कदाचित ती भीतीसुद्धा. मला आठवलं बोलता बोलता एकदा आप्पाजी म्हणाले होते….

“सन्मित्र, प्रत्येकाच्या अंगी एक मुलभुत सामर्थ्य असतं, एक शक्ती असते. ती जागृत होण्यासाठी, उफाळुन बाहेर येण्यासाठी एका प्रचंड धक्क्याची गरज असते. बंदुकीची गोळी झाडण्यासाठी जसा तीचा घोडा दाबावा लागतो, तसंच मनाचंही असतं. पन मनाचा घोडा दाबणं इतकं सोपं नसतं. माणसाच्या मनात दडलेली शक्ती बाहेर काढण्यासाठी त्याला एका जबरदस्त धक्क्याची, आजच्या भाषेत बोलायचं तर ट्रिगरची आवश्यकता असते. माणसाची आंतरिक शक्ती फ़क्त तेव्हाच बाहेर येते जेव्हा त्याच्यापुढचे सर्व मार्ग संपतात. जेव्हा त्याला जाणिव होते की आता तो सर्वस्वी एकटा आहे. आता त्याची मदत फक्त तोच करु शकतो. तो पुर्णपणे एकाकी आहे. बाहेरची रसद पुर्णपणे तुटलेली आहे. त्या एकाकी परिस्थितीतुन निर्माण होणारी भीती, ती वैफल्याची भावना त्याच्यातल्या तळात जावुन बसलेल्या उर्जेला जागृत करते. फक्त तो क्षण त्याला पकडता आला पाहीजे. तो क्षण त्याने पकडला की मग त्याला काहीच अशक्य राहत नाही. मग त्याला अडवण्याचे सामर्थ्य कळिकाळातही नसते.”

मी तो क्षण पकडला होता का? की मुद्दाम मला त्या पराकोटीच्या अनुभवातुन जावे लागावे म्हणुनच आप्पाजींनी आपलं अस्तित्व संपवलं होतं? आप्पाजी, तुम्ही केवढं मोठं दिव्य केलय. खरच, ’जगाच्या कल्याणा संताच्या विभुती’ या आपल्या ब्रिदाला जागले होते आप्पाजी. माणिकरावांचा हात धरुन ते जे काही गलिच्छ, विषारी या जगात येवु पाहत होतं, त्याला थांबवण्यासाठी त्या महापुरुषाने आपल्या प्राणांची आहुती दिली होती. आता हळु हळु लक्षात येवु लागलं होतं सारं.

मुळात अनिरुद्धशास्त्री भार्गव, माझे पुर्वज यात गुंतलेले असल्याने त्या क्षणी त्यांचा प्रतिनिधी म्हणुन मी, कपालवर्मनाचा वंशज म्हणुन माणिकराव आम्हा दोघांचे त्या ठिकाणी असणे अपरिहार्यच होते. म्हणजे याचा एक अर्थ असाही होती की लढाई आर या पार अशी असणार होती. इथे लढा जीवनमृत्युचा होता. सुष्ट आणि दुष्ट , प्रकाश आणि अंधार, धर्म विरुद्ध अधर्म !

म्हणजेच मी एकटा नव्हतो. त्यांचं सामर्थ्य, त्यांचं पुण्य , त्यांची समग्र शक्ती माझ्या पाठीशी होती. किंबहुना तेच सर्व काही करणार होते , मी केवळ निमित्तमात्र होतो. एक माध्यम होतो. मी एकटा नाही या कल्पनेनेच सगळं औदासिन्य कुठल्या कुठे पळुन गेलं आणि मी एका नव्या विश्वासाने, श्रद्धेने त्याला सामोरे जायला तयार झालो. आणि त्याच क्षणी ……

कानात कुठुन तरी मंदीरातल्या घंटाचा नाद ऐकु येवु लागला. कानावर मंत्रघोष ऐकु येवु लागले. त्या मंत्रघोषांच्या गजरातच मी माणिकरावांच्या त्या तथाकथीत तळघरात पोहोचलो. बापरे, वरुन काहीच अंदाज येत नव्हता. हे तळघर जवळपास एक ते दिड एकराच्या परिसरात पसरलेले असावे. मधोमध एक मोठी दालनवजा गुफा होती. त्या गुफेतच ते होतं. त्याला नक्की कसला आकार होता नाही सांगता येणार. पण एका एकसंध शिळेतुन कोरलेलं ते शिल्प, पाहताक्षणीच मनात धडकी भरत होती. खरंतर त्याला चेहराही नव्ह्ता आणि हात पाय तत्सम काही अवयवही नव्हते. पण तरीही त्या काळ्याशार दगडाला पाहिल्या पाहिल्या अंगावर काटा उभा राहत होता. मी सगळं धाडस एकवटुन उभा होतो. माणिकरावांनी त्यांचे विधी सुरु केले. त्याचं वर्णन करण्यात मी वेळ नाही घालवणार, कुठलाही अघोरी कापालिक आपल्या दैवताला जागृत करण्यासाठी जे करतो तेच प्रकार होते.

सगळीकडे एक घाणेरडा दर्प पसरला होता. सडलेल्या मासाचा तो दर्प जीव नकोसा करत होता. मी कसाबसा नाक मुठीत धरुन उभा होतो. माणिकराव मात्र व्यवस्थितपणे कसलाही अडथळा न येता समोरच्या धुनीत कसकसल्या आहुत्या देत होते. आजुबाजुच्या कुबट हवेत आता पुन्हा ते भयानक आवाज जाणवायला लागले होते. त्यांचे ते हुंकार वाढत चालले होते. बहुदा पिलावळ जागी होत होती. हवेतला दुर्गंध वाढत चालला होता. अचानक कसलासा प्रचंड आवाज झाला, एखादा कडा कोसळल्यावर किंवा वीज कोसळल्यावर होतो तसा. मी चमकुन पुढे पाहीले. त्या काळ्याशार दगडी शिल्पाला तडा गेला होता, त्यातुन काहीतरी बाहेर येवु पाहत होतं. काहीतरी हिरवट, काळसर रंगाचं, अगदी लिबलिबीत, किळसवाणं असं अस्तित्व आता त्यातुन बाहेर पडत होतं. माणिकराव डोळे मिटुन भराभर मंत्र म्हणत होते.

एकदम……

माझ्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला…..

…………………………………………………..

मी दचकलो, अंगावर साप पडावा तसा तो हात मी झटकला आणि गर्रकन वळुन मागे पाहीलं…..

आश्चर्याचा आणखी एक धक्का…

तिथे आप्पाजी उभे होते, मी काही बोलायच्या आत त्यांनी त्यांच्या हातातली तलवार माझ्या हातात दिली आणि माणिकरावाकडे बोट केलं……

” घाव असा घालायचा की मस्तक थेट समोरच्या धुनीत पडले पाहीजे. लक्षात ठेव तुझ्या मस्तकाऐवजी ते अपवित्र मस्तक, अपवित्र रक्त जर धुनीत पडले तर हा यज्ञ भ्रष्ट होईल आणि ती शक्ती कधीच मुक्त होवु शकणार नाही आणि परत लपुही शकणार नाही, नष्ट होवुन जाईल. ही शेवटचीच संधी आहे.
जय जय रघुवीर समर्थ ! ” आप्पाजी माझ्या कानात कुजबुजले.

मी तलवार घेतली आणि माणिकरावांकडे वळलो, पण आमचा हेतु बहुदा त्या शक्तीच्या लक्षात आला असावा. ते लिबलिबीत काळंबेंद्रं आता पुर्णपणे बाहेर आलं होतं, बाहेर येताच त्याने थेट माझ्याकडे झेप घेतली. अगदी हवेतुन उडत यावं तसं, अतिषय वेगाने ते माझ्यापर्यंत येवुन पोहोचलं. कुठल्याही क्षणी ते मला विळखा घालणार तेवढ्यात…..

अचानक सगळीकडे एक लख्ख प्रकाश पसरला, अचानक घंटानाद सुरु झाला, बहुदा जगात येवु पाहणार्‍या त्या अमंगलाला विरोध करण्यासाठी या जगातलं मांगल्य आपल्या सर्व शक्तीनिशी त्या अमंगलासमोर उभे ठाकले होते. आणि आप्पाजींच्या खणखणीत आवाजातले शब्द कानी आले ,

” जा सन्मित्र, वेळ दवडु नकोस!”

मी तलवार सरसावली, जगात जे जे काही पवित्र आहे, मंगल आहे त्याचं स्मरण केलं आणि त्वेषाने माणिकरावांवर धावुन गेलो, त्यांना कसलीही संधी न देता तलवार फिरवली….एका घावातच ते अपवित्र, अमंगल मस्तक समोरच्या धुनीत होतं. त्या रक्ताचा धुनीला स्पर्ष झाला मात्र तो भयानक आकार प्रचंड वेगाने त्या शिळेकडे परत झेपावला. पण तो आकार शिळेपर्यंत पोहोचायच्या आतच एका प्रचंड स्फोटासह त्या शिळेचे तुकडे तुकडे झाले. त्याचा परतीचा मार्गच आम्ही उध्वस्त केला होता. तसं ते प्रचंड संतापाने माझ्याकडे वळलं, वेगाने माझ्या अंगावर चालुन आलं. आता मात्र इतका वेळ सावरुन धरलेलं माझं त्राण, माझा धीर संपला. माझी शुद्ध हरपत होती. शुध्द हरपताना मी एवढंच पाहीलं की तो काळा आकार माझ्या पर्यंत पोहोचुच शकला नव्हता. त्याला चारी बाजुनी एका तेजस्वी प्रकाशाने घेरा घातला होता. आता त्याच्या त्या गर्जनांचं रुपांतर करुण किंकाळ्यात झालं होतं. त्या तेजस्वी प्रकाशात तो अमंगल अंधार विरघळुन गेला आणि माझी शुद्ध हरपली.

शुद्धीवर आलो तेव्हा आप्पाजी समोर होते. मी आश्चर्याने एकदम उठायला गेलो तशी पाठीतुन एकदम कळ आली. मी पुन्हा बिछान्यावर पडलो. “आप्पाजी..तुम्ही तर……!”

“तु फार उतावळा आहेस सन्मित्र, असो…ऐक… मी तुला सांगितलं होतं ना एकदा, तुला जोपर्यंत पुर्णपणे एकटेपणाची जाणीव होते नाही, जोपर्यंत मनात टोकाची भीती निर्माण होत नाही, तोपर्यंत तुझ्यात दडलेलं ते धैर्य बाहेर येणार नाही. खरेतर तुला त्या धैर्याचीच आवश्यकता होती, कारण तिथे तळघरात जे काही घडणार होतं ते पाहण्यासाठी, पेलण्यासाठी तुझं मन तेवढं कणखर, तेवढं सक्षम बनणं आवश्यक होतं. नाहीतर कचकड्याच्या बाहुलीसारखा मोडुन पडला असतास तु. त्या धैर्याला बाहेर काढण्यासाठी, तुझं स्वत्व जागृत करण्यासाठी तुझा एकमेव आधार काढुन घेण्याशिवाय मला पर्याय नव्हता, म्हणुन माझे गुरुबंधु कल्याण आणि दिपांजन यांच्या साह्याने मी हे नाटक रचलं. माणिकरावाने जेव्हा त्या ब्रह्मसमंधाला माझ्यावर सोडलं होतं तेव्हा त्याला नष्ट करणं मारुतीरायाला काहीच कठिण नव्हतं, पण मी ती संधी घ्यायची ठरवलं. वर्षानुवर्षे माणिकरावांच्या गुलामीत सडणार्‍या त्या आत्म्यासाठी मुक्तीचं आमीष त्याला माझ्या बोटावर नाचवण्यासाठी पुरेसं होतं. ते परत गेलं आणि माणिकराव समजले की मी संपलो.

अर्थात हा सगळा बनाव मी तुझ्या विश्वासावरच रचला होता. सगळे मार्ग संपलेत म्हणल्यावर, विशेषत: माझाही मृत्यु झालाय हे समजल्यावर तु आधी भीतीने आणि मग त्वेषाने पेटुन ऊठशील याची खात्री होती मला. तु जर उलट वागला असतास आणि पळुन गेला असतास तर मात्र सगळंच मुसळ केरात गेलं असतं. असो. आता वादळ ओसरलय. गेली कित्येक शतके प्रतापनगरात थैमान मांडणारं वादळ आता कायमचं शमलय. तु आराम कर काही दिवस. एकदा का नीट बरा झालास की आमच्याबरोबर राहुन असंच समाजोपयोगी काम करीत राहायचं की पुढच्या मार्गाने निघुन जायचं, निर्णय तुझा असेल.

मला माझ्या आयुष्याची दिशा सापडली होती.

“जय जय रघुवीर समर्थ !”

समाप्त.

 

6 responses to ““बोलावणे आले की …..!”

 1. Manish

  सप्टेंबर 21, 2011 at 1:15 pm

  Khupach Chan aahe story.

   
 2. Ganesh

  सप्टेंबर 23, 2012 at 12:32 सकाळी

  too good Vishal, hya story war mast marathi picture howu shakato. Sanmitra- subodh Bhave/Ankush Choudhary,Upendra limaye
  Appaji- Sachin/Anand abhyakar,
  Manik rao- Kuldeep pawar/Girish oak
  Tukya- satish tare /
  🙂 i ll be very happy to see this movie 🙂

   
 3. Vaibhav Joshi

  जानेवारी 6, 2014 at 9:00 pm

  जबरदस्त , जबरदस्त , थरारक , पार शेवट पर्यंत खिळवून टाकणारी गोष्ट . वर्तुळ ला सुद्धा मागे टाकते . धन्यवाद . विशाल . देव करो तुला अशा कथा लिहायला भरपूर वेळ मिळो .

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: