RSS

आमची पण समाजसेवा ….. (?)

11 ऑगस्ट

“अयाई गं……आयला सॉलीड दुखतंय बे विशल्या…..” विन्याचं कण्हणं वाढतच होतं.
“गप बे भ**, आम्ही काय फुलं झेलली नाहित!” इति अस्मादिक.
“आयला, विशल्या, या पोलिसांना काही दयामाया नसती का बे ? असं लहान लहान पोरांवर लाठ्या चालवायला काहिच कसं वाटत नाही बे?”……..सुध्या.
(हा लहान मुलगा गेली दोन वर्षे एस. वाय. बी. एस. सी. च्या वर्गाची शान वाढवत होता)
तेवढ्यात विद्या आला बाहेरुन….,” वटवाघळाचं तेल देवु का बे आणुन, चांगलं असतं म्हणे मुक्या मारावर!”
“पळ, बे…जेव्हा गरज होती तेव्हा जी ला पाय लावुन पळाला..आणि आता सहानुभुती दाखवतोय.”..विन्या.
(तो पळाला यापेक्षा आम्हाला संधी मिळाली नाही याचं दुख जास्त सलत होतं प्रत्येकाला)

कसं वाटलं वरील संभाषण वाचुन. पोरांनी सॉलीड राडा केलाय काहितरी आणि पोलिसांनी सणकुन हात धुवुन घेतलेत असंच वाटतंय ना ?
अर्धसत्य आहे ते. पोलिसांनी हात धुवुन घेतले हे सत्य, पोरांनी राडा केला हे अर्धसत्य.
म्हणजे गोंधळ आम्ही घातला होता, पण कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नव्हता हो त्या मागे. पण पोलिसांनी मात्र खुप दिवसांपासुन ठरवुन केल्याप्रमाणे सुड उगवला होता.
(लई तरास दिला होता राव आमीबी त्यांना ! साहजिकच आहे म्हणा ..संधीचा फायदा त्यांनी उचलला)

जास्त उत्कंठा न ताणता मुद्यावर येतो. इंजिनिअरिंगच्या दुसर्‍या वर्षाला असतानाची ही घटना आहे.
त्यावेळी काहितरी वेगळं करायची, देशासाठी, समाजासाठी काहीतरी करायची उर्मी मनात होती. (तशी ती अजुनही आहे, पण उत्साह मात्र थंडावलाय) तशात एकदा श्री. बाळासाहेब भारदे यांना ऐकण्याचा योग आला.
त्या भाषणात त्यांनी युवकांनी कुठल्या ना कुठल्या विद्यार्थी संघटनेत सामील होवुन काहितरी विधायक कार्य करण्याचा उपदेश केला होता. आम्ही सोलापुरचे दहा पंधरा जण तेव्हा शिक्षणासाठी म्हणुन पुण्यात येवुन राहीलो होतो. एस.बी. रोड वर आनंदनगर मध्ये कॉट बेसिसवर………! माझ्यासकट चौघे जण COEP ला होतो, बाकीचे वेगवेगळ्या कॉलेजातुन कुणी बी. ए. , कुणी बी. कॉम. कुणी बी. एस. सी……धमाल होती नुसती. कॉलेज ऐवजी वैशाली किंवा एस. पी. चे बादशाही आणि खिसा रिकामा असेल तर दांडेकर पुल या आमच्या मशिदी होत्या. (चुकला फकीर मशीदीत…असं काहीतरी म्हणतात ना?)

तर ठरलं…………..आता प्रश्न हा की कुठे जॉईन व्हायचं? एन. एस.यु. आय., विद्यार्थी सेना कि अभाविप ? शेवटी बहुमताने अभाविप वर जनमत स्थीर झालं. जनमत म्हणजे आमच्या भाषेत एखाद्याला बकरा बनवायचा ठरलं की त्याला जनमत असायचं. तो ही बिचारा खुशीत यायचा, इतके सगळे सपोर्ट करताहेत म्हणजे काय? आणि पार्टी देवुन टाकायचा. अर्थात आमच्या भुतांपैकी कुणी फसायचे नाही कधी. म्हणुन आम्ही यावेळी विद्याला पकडला. त्याचा बदला त्याने कसा घेतला ते वर आले आहेच. तर आम्ही अभाविप ला चिकटलो. मग एकेक उद्योग सुरू झाले. मोर्चे, आंदोलनं, पथनाट्ये………(राडे सुद्धा !) त्याचा एक छान फायदा झाला होता. बहुतेक पोलीस आम्हाला ओळखु लागले होते…..(चांगलेच..?) व्हायचं काय की कुठलाही मोर्चा असला, सभा असली कि आधी पोलिसांची रितसर अर्ज देवुन परवानगी काढावी लागायची. मग त्यासाठी त्या त्या भागातील पोलीस चौकीच्या सिनिअर इन्स्पेक्टरना भेटुन अर्ज देणे, त्याना सभेची, मोर्चाची किंवा आंदोलनाची निरुपद्रविता पटवुन परवानगी मिळवणे असली कामे माझ्याकडे असायची, इतरही काही जण असायचे बरोबर. (आमचे सहकारी त्याला फुटकळ कामे म्हणत) कारण प्रत्यक्ष फिल्डवर आमचा सहभाग तसा अभावानेच असायचा.

अशातच एकदा बातमी आली किं बार्शीमध्ये एक फॅशन शो होणार आहे. तेव्हा ती बच्चनच्या एबीसीएल ची बंगळुरुची फेल गेलेली “मिस युनिव्हर्स” बरीच गाजत होती. आणि बहुतेक तथाकथीत संस्कृतीरक्षक संघटनांनी त्याला विरोध केला होता. बार्शीचा फॅशन शो याला अपवाद ठरला असता तरच नवल. आणि स्थानिक पातळीवरच्या संघटनांना देखिल काही तरी करण्याची सुरसुरी आली होती. साहजिकच अभाविप देखिल यात उतरली. सोलापुर अभाविप आणि दुर्गा वाहिनी यांनी मिळुन या फॅशन शो च्या विरोधात आन्दोलन करण्याचे ठरवले. आम्ही दहा बारा जण सोलापुरचे असल्यामुळे लगेच गावाचे प्रेम उफाळुन आले आणि आम्ही देखिल बार्शीला पोहोचलो. मी पहिल्यांदाच अशा प्रत्यक्ष ऑपरेशनमध्ये भाग घेत होतो.
शो वेळेवर सुरु झाला..त्यानंतर साधारण पंधरा मिनीटांनी आम्ही शो च्या मुख्य दारावर पोचलो आणि घोषणा द्यायला सुरुवात केली. दुर्गा वाहिनीच्या काही कार्यकर्त्याही बरोबर होत्या. त्यापैकी काहिंच्याकडे बघुन आमचे एकमेकाला ती बघ तुझी वहिनी….असलं पण काहिबाही समाजकार्य चालु होतं.
“आयला अश्मन, मज्जा असती बे अशा आंदोलनात.” इति विन्या.
“थांब, आता थोड्या वेळात पोलीस येतील, मग कळेल मज्जा !” अश्मन फिस्कारला.

आणि ….जळो तो अश्मन, जी धाड आली……
आम्ही चौघे पाच जण इमानदारीत घोषणा देत होतो , मुर्दाबादचे नारे चालु होते. मागची सेना कधी गारद झाली कि गायब झाली ते कळालेच नाही. जेव्हा कळाले तेव्हा कुठल्यातरी नतदृष्ट पोलिसाची लाठी पोटरीवर बसली होती. पहिली लाठी खाल्ली आणि आईच आठवली…….(नंतर आण्णा ही आठवले म्हणा…त्यांना काय सांगायचं हा प्रश्न होता, कारण माझे आण्णाही निष्ठावंत पोलिस होते हो !)
पण त्यानंतर मात्र जसा मार्ग सापडेल तसे पळालो. त्यानंतर सोलापुरच्या अभाविपाच्या कार्यालयात सगळे पडिक, असल्या अवस्थेत घरी जायची पण सोय नाही. तिथेच उपरोल्लेखित एकमेकाच्या सत्काराचा सोहळा चालु होता. अशातच एक खबर आली. पोलिसांनी श्रीप्याला पकडलेय आणि सोलापुरच्याच साउथ सदर बझार पोलिस चौकीत ठेवलंय. सगळ्यांची हवा टाईट…त्याने जर आपलीपण नावे सांगितली तर. पण पुढे काय?

शेवटी असं ठरलं किं काहीही होवो, गोंधळ एकत्र घातलाय, परिणामाला पण सामोरं जायचं. आधी कुणीतरी दोघे जावुन अंदाज घेवुन यायचं असं ठरलं. आंद्या म्हणाला आपण विद्यार्थी असल्याने घरचा डबा अलाऊड असतो. मग आम्ही दोघे श्रीप्यासाठी डबा घेवुन निघालो. चौकीवर पोचलो आणि समोरचे दृष्य भलतेच धक्कादायक होते. श्रीपु श्रेष्ठी चौकीत चक्क राशिनकर साहेबांसह पत्ते खेळत बसले होते.
“ये बे संज्या , रमी खेळतो का?” …संज्या..मी चक्रावलो…, श्रीप्याने डोळा मारला, मी समजुन गेलो.
अशा परिस्थितीतही हा माणुस इतका बिनधास्त राहु शकतो. मला श्रीप्याचा जाम हेवा वाटला.
मी थोडासा चकीतही झालो होतो, राशिनकर साहेब इथे काय करताहेत. त्यांना पुण्यात पाहिलं होतं एकदा …. नशीब त्यांच्याशी प्रत्यक्ष ओळख नव्हती आमची.
आम्ही श्रीप्याला डबा दिला, थोडावेळ गप्पा मारल्या आणि निघालो….
जाता जाता तिथल्या कोन्स्टेबलने बाँब टाकला…ए पोरांनो विशाल कुलकर्णी आणि विनायक देशपांडे जर भेटले तर त्यांना चौकीवर हजेरी लावायला सांगा, त्यांची बी नावं हायेत लिस्टला…..
सांगतो की म्हणत गपचुप बाहेर आलो…..

पण बाहेर आलो आणि मन खायला लागलं. साला तो श्रीप्या आपलं नाव सुद्धा उच्चारत नाहीये आपल्याला वाचवण्यासाठी आणि आपण मात्र पळुन चाललोय….
परत फिरलो आणि त्या कॉन्स्टेबलसमोर जावुन उभा राहिलो.
साहेब, मीच विशाल कुलकर्णी….
त्याने एकदा माझ्याकडे आणि एकदा राशिनकर साहेबांकडे बघितलं आणि मग दोघे ही जोर जोरात हसायला लागले.
माहिती आहे बे, पळ……. उगं भगतसिंग बनायला बघु नको, याला पण सोडतोय आमचा डाव संपला की..
चल सुट आता…!
आता आळीपाळीने त्या तिघांकडे बघायची पाळी माझी होती.

विशाल…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: