RSS

“अश्वत्थाम्याच्या डायरीतले एक पान …….!”

11 ऑगस्ट

दोन घडीचा डाव, त्याला जीवन ऐसे नाव…..
हं..जगणं मरणं, मरणं जगणं सारंच अनाकलनीय, विलक्षण….

माझ्याबाबतीत बोलायचं झालं तर..
जीवन… निरर्थक, वेडेवाकडे, कागदावर रेखाटलेल्या अर्थहिन भौमितिक रेखाकृतींसारखे
कागदावरच्या सर्वच रेषांना…नसतो अर्थ जसा….!

माझं जीवनही तसंच आहे….
मदिरेच्या प्याल्यातील शिल्लक, शेवटच्या, एकुलत्या एक थेंबासारखे …
तृणपर्णावरुन ओघळलेल्या एकाकी दंवबिंदुसारखे …
कपोलावर अलगद, नकळत, रेंगाळलेल्या कढत कढत कदाचित खारट आसवांसारखे …

का जगायचे, कशासाठी जगायचे ?

जगण्यातला अर्थ जाणण्यासाठी? किं जीवनाचे अंतीम सत्य असलेल्या मृत्यूला सामोरे जाण्याचे धैर्य अंगी जुटवण्यासाठी?

गंमत म्हणजे, प्रत्येकाला माहीत असतं, मृत्यू हे अखेरचं सत्य !

पण तरी का असावा, हा जगण्याचा वेडा अट्टाहास ?

का उरी बाळगतो माणुस, जगण्याची ही वेडी आस ?

मानव एक प्रवासी, जीवन एक थांबा. क्षणभर थांबायचं आणि मग निघायचं. अनंताच्या प्रवासावर, अद्वैताच्या मागावर !

जीवन….

क्षणिक, क्षणभंगुर…..पाण्याचा एक बुडबुडा, कधी ना कधी फुटणार तो…

मग त्याच्याबद्दल ही प्रीत …..?

का जगतो आणि कशासाठी जगतो माणुस? सारेच घडीचे प्रवासी. ना मी कुणाचा, ना कुणी माझा ! मग का हा वेडा अट्टाहास…….?

जगणारे जगत राहतात…मरणारे मरत राहतात. जीवन चक्र थांबत नाही…..

माणसाचं जगण्याचं वेड काही संपत नाही….

जगणं..मरणं….! सगळंच विलक्षण…..!

ती नसते केवळ एक घटना……तर ती असते एक प्रवाहधारा, वर्षानुवर्षे चालणारी, कधी न थांबणारी …

बरं जीवन, ते ही तितकं सरळ नाही, त्याला किती पदर, किती रंग,
किती रुपं जीवनाची …

सत्य, स्वप्न..स्वप्न आणि वास्तव… वास्तव आणि ……यातच माणसांचं जीवन पुर्णपणे गुरफटलेलं असतं.
जीवनाच्या दोन मोहक अवस्था शैशव, यौवन ………….. !

कळीकळीने उमलत जाणारं शैशव तारुण्यासारखंच कोमल, नाजुक, तरल, मुलायम आणि संवेदनाक्षम असतं. जीवनाबद्दलची अपार जिज्ञासा, कुतूहल हे शैशवात दडलेलं असतं. यौवन मात्र काहीसं स्वकेंद्रित, स्वत:तच गुरफटलेलं, स्वत:भोवतीच रेंगाळणारं असतं. आपल्याच अस्तित्वाभोवती पिंगा घालीत असतं. हा पिंगा, हा झपुर्झा ज्या धुंदीत, ज्या बेहोषीत चाललेला असतो त्याला भान, अवधान मुळीच नसतं.

आयुष्याची मनसोक्तता, जीवनाचे हे शैशव आणि यौवन असे दोन्ही भावचिंब ओले काठ जन्मभर आपल्याला सुखावत असतात.

त्यांचं हरवलेपण शोधण्याचा माणुस आयुष्यभर प्रयत्न करीत असतो. का ? कशासाठी ?

यातलं वास्तव हे की एकदा गमावलेली अनुभूती मग ती शैशवाची असो किं यौवनाची ती परत कधीच अनुभवास येत नाही.

आणि माणुस ती मग अवास्तवातुन, स्वप्नांतुन शोधायला सुरुवात करतो. या सगळ्या नादात त्याचा कधी अश्वत्थामा होतो त्याचे त्यालाच कळत नाही.

काही म्हणा , तो असतो एक कैफ, ती असते एक धुंदी….प्रत्येकावर चढलेली. जगण्याची..जगवण्याची !
मग मला , माझ्या अस्वस्थ मनाला नेहेमीच एक प्रश्न पडतो…..

कधी ….?
कधी आटोपणार …..?
हा पसारा, जीवनमृत्यूच्या चक्राचा, जीवनाच्या रहाटगाडग्याचा! …..कधी…? ….. केंव्हा?

कशी गंमत आहे बघा ? माझ्याबाबतीत मात्र सगळंच उलटं आहे….

मानवाला हवंहवंसं असणारं, खुणावणारं, वेडावुन टाकणारं..

जीवन…
इथे क्षण ना क्षण जातोय जीवनाचा, त्याची वाट बघण्यात….मृत्यूची…त्याच्या आगमनाची !

जीवन…
क्षणोक्षणी असं मरत मरत जगायचं….!
मृत्यूसाठी, त्याची वाट बघत कणाकणाने जळायचं !
निदान माझ्याबाबतीत तरी किती अर्थहिन ठरलीय …. जन्म मृत्यूची ही सर्वश्रेष्ठ देणगी ?
किती दिवस, किती दिवस जगायचं? कुठपर्यंत कणकण जळायचं? मृत्यू येणार नाहीच !

पण म्हणुन का जगायचंच ?
कुठपर्यंत ? जगाच्या अंतापर्यंत ?
पण जग ? त्यालातरी कुठे अंत आहे ? त्यालातरी कुठे शेवट आहे ?
शाप आहे त्यालाही… अश्वत्थामा असण्याचा ! अश्वत्थामा बनण्याचा ! अश्वत्थामा म्हणुनच जगण्याचा !

माझ्या कपाळावरचं ते अदभुत….स्यमंतक मण्यालाही लज्जा वाटावी असं त्याचं तेज, केवळ त्या कृष्णसख्याचे डोळेच बरोबरी करु शकतील असा तो तेजस्वीपणा…!

द्रौणीमातेला ते वरदान वाटले होते, कुणाची नजर पडु नये म्हणुन सदैव त्यावर पट्टी बांधुन ठेवायची ती ! हं..त्याचीच नजर लागलीय माझ्या जीवनाला !

मी खरेच बहकलो होतो का ? की सुयोधन खरोखरच तेवढा कुटील होता? कुठे चुकलं माझं……..?

लहानच तर होतो तेव्हा. काही कळायचं वय नव्हतंच ते ! सगळ्यांनी टिंगल, चेष्टा करायची हे जणु ठरवुनच टाकलं होतं. अशा वेळी माझी बाजु घेवुन इतरांशी भांडणारा सुयोधन मला माझा जवळचा मित्र वाटला असेल तर त्यात नवल ते कसलं?

मग भले त्यामागे त्याच स्वार्थ दडला असेल ! माझ्या सर्व अस्त्र-शस्त्र विद्यांमध्ये पारंगत असण्याने त्याला माझ्याबाजुने विचार करण्यास भाग पाडले असेल….! कदाचित त्याला असेही वाटले असेल की द्रोणाचार्यांनी आपल्या पुत्रासाठी म्हणुन काही खास अस्त्रे राखुन ठेवली असतील..!

म्हणुनही त्याने माझ्याशी मैत्री केली असेल कदाचित. पण यात चुक ते काय? हा त्याच्या मुत्सद्दीपणाचा एक भाग होता आणि त्यात चुकीचं काय होतं तातांनी मला इतरांच्यापेक्षा जास्त अशी बरीच अस्त्रं शिकवली होतीच की? मग मला आपली मैत्री देवु करणार्‍या आणि पुढे शेवटपर्यंत ती जपणार्‍या सुयोधनाला मी शेवटपर्यंत सोबत केली तर बिघडलं कुठे?

धर्म आणि अधर्म …..?

“नरो वा कुंजरोवा” म्हणुन खोटेपणा करणार्‍या युधिष्ठीराचे कृत्य तरी कुठे सत्याचे, धर्माचे होते? मग शिक्षा मलाच का?
……
……..
……….

पण माझं चुकलंच. पांडवांचा राग त्यांच्या अजुन जन्मालाही न आलेल्या वंशावर काढण्याचा मला काय अधिकार होता?

पण मग ते युद्ध तरी कुठे ‘धर्म-युद्ध’ राहीलं होतं?

एखाद्या कोवळ्या फुलासारख्या अभिमन्युला चक्रव्युहात गाठुन मारलं आम्ही, तथाकथीत महापराक्रमी योद्ध्यांनी (?) तेव्हा कुठे गेला होता युद्धधर्म ?

त्या शिखंडीच्या मागे लपुन भीष्मपितामहांवर वार करताना कुठे गेला होता पांडवांचा धर्म !

जमिनीने रथचक्र गिळलेल्या नि:शस्त्र कर्णावर बाण चालवताना कुठे होता पांडवांचा धर्म ….

आणि भरसभेत कुलवधूला अपमानीत करताना तरी कुठे होता कौरवांचा विवेक, त्यांचा धर्म ?

भिमाला सुयोधनाच्या मांडीवर प्रहार करुन युद्धनियम तोडण्यास भाग पाडणार्‍या माझ्या कृष्णसख्याने तरी कुठे पाळला होता धर्म?

मग शिक्षा फक्त मलाच का ? आणि ती ही इतकी भीषण !

पण ही वेदना कुठे व्यक्त करु, कुणाकडे व्यक्त करु….?

इतकी वर्षे उलटली,

वर्षे ? युगे म्हणायला हवे… नाहीतरी माझ्यासाठी, माझ्यापुरते या कालमापनाला काय अर्थ आहे आता?

माझी वेदना कुणाला सांगु? इथे सगळेच अश्वत्थामा आहेत! रोज एक अश्वत्थामा जन्माला येतोय? प्रत्येकाच्याच माथ्यावर एक भळभळती जखम आहे. त्यांनी कुणाकडे तेल मागायचं?

इथे प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या जखमेचा बळी आहे. प्रत्येकाची स्वत:चीच समस्या आहे. भ्रष्टाचार, हुंडाबळी, दहशतवाद, प्रांतवाद, वंशवाद, दारिद्र्य, निरक्षरता … एक ना दोन हजार समस्या ……..!
या जखमांवर घालण्यासाठी, तेल मिळेल…. कुठे? कुणी फुंकर घालु शकेल…. या जखमांवर?

नाही ! सख्या रे, तु एका अश्वत्थाम्याला शिक्षा दिलीस. मी ती भोगली, भोगतोय आणि भोगत राहीन. पण कृष्णा, परमात्म्या मला चिरंजिव करुन तु कुठे निघुन गेलास? आज या अश्वत्थाम्यापेक्षाही या जगाला तुझी खुप गरज आहे रे !

सखा, कुठे आहेस रे तु?

कुरुक्षेत्रावर आश्वासन दिलं होतस ना “यदा यदा ही धर्मस्य …….” म्हणुन. त्या शिशुपालाचे शंभर अपराध भरले म्हणुन त्याचा लगेच वध केलास…..आजच्या शिशुपालांना कसली सवलत देतोहेस…..?

आता नाही धीर धरवत कृष्णा ! ये आता सखा, आज तुझी खुप गरज आहे रे !!!

विशाल

 

7 responses to ““अश्वत्थाम्याच्या डायरीतले एक पान …….!”

 1. Sahadev

  सप्टेंबर 21, 2010 at 7:46 pm

  you have mentioned that this site is protected by copyscope, but people can copy from it. I have tryued it .
  so check it again!

   
  • विशाल कुलकर्णी

   सप्टेंबर 22, 2010 at 9:43 सकाळी

   धन्यवाद सहदेव ! अर्थात तुम्ही कॊपी करु शकता पण स्वत:च्या नावावर खपवु शकत नाही, कारण हा लेख माझ्या नावावर कॊपीराईट असल्याने पकडले गेल्यास मी सायबर सेलकडे साहित्यचौर्याची तक्रार करु सकतो. 🙂

    
 2. Priya

  नोव्हेंबर 11, 2011 at 2:27 pm

  vishal mi kavita karate ani mala mazya kavita hi copy rights karun ghyayachya ahet….tu mala plz process ani nemka kharch kiti yeto te sangshil ka? tula jr ithe reply dyayala kahi prblm watat asel tar tu mala mail kelas tari chalel

   
  • विशाल कुलकर्णी

   नोव्हेंबर 14, 2011 at 12:20 pm

   तुझा काही ब्लॉग वगैरे आहे का कवितांचा? तो तुला कॉपीराईटसाठी रजिस्टर करता येइल. अनेक फ़्री वेबसाईटस उपलब्ध आहेत त्यासाठी. तुझ्या ब्लॊगची लिंक दे मला असेल तर. माझ्या कविता तुला इथे वाचता येतील…
   माझी सखी

    
 3. Priya

  नोव्हेंबर 15, 2011 at 2:09 pm

  are maza blog waigere nahiye kahi…khup diwasanpasun ahe manat pan jamat nahiye…baghu lawkarch wichar satyat utaravanacha prayatn karanyacha prayant karen 🙂 :d

   
  • विशाल कुलकर्णी

   नोव्हेंबर 15, 2011 at 5:55 pm

   बनव लवकर मग. कुठेतरी ऒनलाईन संग्रह असलेला बरा असतो. कागद किंवा इव्हन हार्ड ड्राईव्हचाही भरवसा देता येत नाही आजकाल. कधीही खराब होवू शकतात. 🙂

    
 4. Priya

  नोव्हेंबर 17, 2011 at 2:06 pm

  घाबरवू नकोस…..आधीच बहुदा माझी वही हरवलीये कवितांची….रूमवर सापडत
  नाहीये….घरी गेलेले मागच्या वेळेस तेंव्हा घरी ठेवलेली असेल तर ठीक आहे नाही तर मग माझ्या नावानी चांगलाच शंख आहे आमच्या आउसाहेबांचा 🙂 🙂

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: