RSS

एक पहाट रेंगाळलेली…

 

फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुले
नभात भिजल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले

रंग फुलांवर ओघळतांना असे जुईला लडबडले
गालावरचे निळे गोंदणे पदराभवती घुटमळले

(कविवर्य ना. धों. महानोर)

दातावर दात वाजणे, हाताला बोटे आहेत याची जाणीव नसणे, वाऱ्याची बारीक झुळूक जरी आली तरी सुया टोचल्याचा आभास होणे हे सगळे अनुभव म्हणजे थंडी !

नेरे गाव मागे सोडून धोदाणीच्या दिशेने जाताना मध्येच शांतीवनला जाणाऱ्या रस्त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला एक छोटा रस्ता डोंगराच्या दिशेने जात राहतो. बहुदा सांगटोली गावाकडे जातो तो रस्ता. पहाटेच्या अंधुक उजेडात त्या रस्त्याला लागायचे. समोर लांबचलांब पसरलेल्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून विहरत येणारा गार-गार वारा अंगाशी झोंबायला लागतो. आसमन्तातुन विविध पक्षांची प्रसन्न किलबिल कानावर यायला सुरुवात होते. मग मीही कानातला हेडफोन काढतो. खिश्यातला मोबाइल काढून त्यावर सुरेलपणे झरणारा पंडितजींचा भटियार बंद करतो आणि शांत चित्ताने निसर्गाची नादमधुर साद कानात साठवत पुढे पुढे जात राहतो.

सकाळची शांत वेळ, मंद, मधुर रानफुलांचा वातावरणात पसरलेला आणि समीराने सर्वत्र उधळलेला मंद सुगंध, पूर्वेला उजळु लागलेले भास्कररावांचे रंग, तळ्याचा शांत काठ, त्या काठावरील शिवशंभोच्या देवळातील घंटांचा लांबवर ऐकू येणारा सुमधुर नाद आणि त्यात तो भारदस्त भैरवातील कोमल ‘रे्’; भक्तिरसात चिंब झालेला, एक धीर-गंभीर वातावरण निर्माण करणारा. ‘ग म रे सा’ हा स्वर-समूह एखाद्या भक्कम आधार-स्तंभासारखा उभा. सगळया स्वरांचा आनंद घेत घेत, ‘सा रे् ग, रे् ग म प, ग म ध् ध् प, ध् ध् प म प’ त्यानंतर ‘ग म रे् सा’ जणू वाट बघत, भेटीच्या उत्कंठेने आतुर झालेला!

यासाठी फक्त शास्त्रीय संगीतच ऐकायला हवे असे नाही. बाकी सगळी इंद्रिये काही काळापुरती अडगळीला टाकायची आणि सगळी शक्ती कानात एकवटुन निसर्गाला कान द्यायचा. कुठल्यातरी एका अलवार क्षणी निसर्गराजा समेवर येतो, आपलीही तार जुळते आणि सुरु होते एक अवर्णनीय अशी नितांतसुंदर मैफील. पहाटेचे चित्र विचित्र पण मंजुळ आवाज ऐकण्याचा आनंद,त्ये सुख… त्याची सर कुठल्याच संगीताला नसते हो. वेगवेगळ्या पक्ष्यांचा किलबिलाट , अगदी चिमणीचा चिवचिवाटही मन प्रसन्न करून जातो. मधूनच राघू आपले अस्तित्व जाणवून देतो. मैना आपल्या मंजुळ व कर्णमधुर आवाजाने मन उल्हसित करते. वसंतात कोकिळ पक्षी आपल्या कुहू-कुहूने रवीराजाच्या आगमनाची दवंडी पिटत असतो. पानाच्या सळसळीमधून वाहत्या वाऱ्याचा कानाला एक निसटता स्पर्श करत होणारा आवाज एक वेगळीच अनुभूती देऊन जातो. हिरव्या गवतावरून वहाणारा वारा एक अगदी हळुवार ध्वनी उत्पन्न करून जातो. त्याचप्रमाणे सळसळणाऱ्या पानांचा ध्वनीही सुखावत असतो.

पानगळीच्या दिवसात, पहाटेच्या नीरव शांततेत झाडाची सुकलेली पाने ओघळताना होणारा आवाज ऐकलायत कधी? पायाखालचा वहिवाटीचा रस्ता सोडून नकळत जंगलातल्या वळणदार अनवट पाऊलवाटेवर उतरताना पायाखाली सुकलेल्या गवताची होणारी चरचर ऐकलीय कधी? त्या तृणपर्णावर इतका वेळ तोल सावरून बसलेले दंवाचे थेंब, आपल्या पावलाने त्यांच्या शांत समाधीत आणलेल्या व्यत्ययामुळे विचलीत होवून आपली जागा सोडत नकळत तुमच्या पावलावर ओघळतात तेव्हा त्यांचा तो कोमल, मुलायम स्पर्श अनुभवलाय कधी?

मग हळूहळू भास्करराव डोके वर कढ़ायला लागतात. आसमंताला जाग येवू लागते आणि निसर्गाचा अंमल संपून माणूस नावाच्या प्राण्याचा दिवस चालू होतो.

© विशाल विजय कुलकर्णी

दिनांक : २८/०१/२०१८

 

घनतमी शुक्र बघ राज्य करी – दै. संचार : इन्द्रधनू (२८/०१/२०१८)

IMG-20180128-WA0044

IMG-20180129-WA0008

दै. संचार – इन्द्रधनू पुरवणी , सोलापुर

दिनांक : २८/०१/२०१८

 
 
%d bloggers like this: